भारतीय सैन्य दल दिवस
- १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
- या ऐतिहासिक क्षणानिमित्त दरवर्षी १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.
- सीमा रेषेवर देशाचे रक्षण करणे असो किंवा नैसर्गिक आपत्ती, हे जवान देशसेवेसाठी सज्ज असतात.
- देशातील १२५ कोटी नागरिकांना शांततेत राहता यावे यासाठी सैन्याचे जीव स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
- हिमालयातील गोठविणाऱ्या थंडीत, थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्येकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात.
देशातील सर्व जवान आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या शौर्याला व देशसेवेला MPSC Toppersचा सलाम.
मुंबई मॅरेथॉन २०१७
- १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने सुवर्णपदकावर नाव कोरले. ४२ किलोमीटरचे अंतर सिम्बूने २ तास ९ मिनिटे २३ सेकंदांमध्ये पूर्ण केले.
- या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात खेता रामने बाजी मारली. खेता रामने २ तास १९ मिनिट ५१ सेकंदांमध्ये मॅरेथॉन पूर्ण केली.
- पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गावतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले.
अमेरिकेने ‘वेट फूट, ड्राय फूट’ धोरण थांबविले
- क्यूबामधून अमेरिकेमध्ये स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना एका वर्षानंतरच नागरिकत्व देण्याचे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले अमेरिकेचे धोरण अध्यक्ष बराक ओबामा यांनी थांबविले आहे.
- अमेरिकेमध्ये ‘वेट फूट, ड्राय फूट’ या नावाने हे धोरण राबविले जात होते. क्यूबाबरोबरील संबंध अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय बराक ओबामा यांनी घेतला आहे.
- आधीच्या धोरणानुसार, क्यूबामधून अमेरिकेमध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना एक वर्ष अमेरिकेमध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली होती.
- आता मात्र इतर स्थलांतरितांप्रमाणेच बेकायदा प्रवेश असल्यास त्यांना तातडीने माघारी पाठविले जाणार आहे. क्यूबानेही परत पाठविलेल्या नागरिकांना परत घेण्याचे मान्य केले आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सूरजितसिंग बर्नाला कालवश
- पंजाबात हिंसाचाराने टोक गाठलेले असताना, राज्याची धुरा सांभाळणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री सूरजितसिंग बर्नाला यांचे १५ जानेवारी रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
- अकाली दलाचे मध्यममार्गी नेते असलेल्या बर्नाला यांनी १९८५ ते १९८७ या काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.
- त्यांनी तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व अंदमान-निकोबारचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले.
- मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात बर्नाला कृषिमंत्री तर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते रसायने व खते मंत्री होते.
बरखा दत्त एनडीटीव्हीमधून बाहेर
- प्रसिध्द पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीच्या सल्लागार संपादक पदावरून राजीनामा दिला आहे.
- गेली २१ वर्ष एनडीटीव्हीमध्ये पत्रकार असणाऱ्या बरखा दत्त आता स्वत:ची मीडिया कंपनी सुरू करणार असल्याची चर्चा आहे.
- १९९५साली एनडीटीव्हीमध्ये पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात करणाऱ्या बरखा दत्त यांनी त्यांच्या आक्रमक शैलीने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले.
- इंग्लिश पत्रकारितेमध्ये आघाडीच्या मोजक्याच नावांमध्ये बरखा दत्त यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात.
- महिलांसाठी त्या एक आयकॉन तर होत्याच पण निर्भिडतेने पत्रकार करू पाहणाऱ्या अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या.
- १९९९सालच्या कारगिल युध्दाच्या वेळेस बरखा दत्त यांचे थेट रिपोर्टिंग देशभर पहिले गेले.
- तर २६/११च्या हल्ल्यांच्या वेळेस ताज आणि ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर केलेल्या लाईव्ह रिपोर्टिंगवरून त्यांच्यावर टीका झाली.
- या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या लाईव्ह रिपोर्टिंगमुळे दहशतवाद्यांना माहिती कळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
नवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
- पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
- पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह सिद्धू कॉंग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असतील.
- सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा