‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या उत्कृष्ट अमलबजावणीसाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार प्रदान केला.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन व राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातंर्गत देशभरातील जळगाव व उस्मानाबादसह १० जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले.
युएईच्या राजपुत्रांचे भारतात आगमन
२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख अतिथी आणि संयुक्त अरब इमिरातचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल निहान हे २४ जानेवारी रोजी दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
२४ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान संयुक्त अरबच्या शिष्टमंडळासह ते भारत दौऱ्यावर आले आहेत.
राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद यांचा फेब्रुवारी २०१६नंतरचा हा दुसरा भारत दौरा आहे.
पंतप्रधान मोदींच्या २०१५नंतरच्या संयुक्त अरब इमिरात भेटीपासून दोन्ही देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.
संयुक्त अरब इमिरात हा देश भारताच्या विदेशी गुंतवणुकीतील महत्वाचा देश असून, भारताला उर्जा सुरक्षा पुरवणारा महत्वाचा देश मनाला जातो.
तसेच २०१५-१६ या कालखंडात भारताला इंधन पुरवठा करण्यात ५व्या क्रमांकावर हा देश होता.
शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ होणार
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे नोंव्हेंबर आणि डिसेंबर २०१६मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे पीककर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नाही.
महाराष्ट्राच्या तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
देशभरातील एकूण ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे.
याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या स्पेशल फोर्सच्या १९ जवानांनाही शौर्यदपक जाहीर झाले आहे.
या जवानांच्या एका तुकडीचे नेतृत्व केलेल्या मेजर रोहित सुरी यांना किर्तीचक्र (शौर्यासाठी देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च मानाचा पुरस्कार) जाहीर झाला.
गोरखा रायफल्सच्या हवालदार प्रेम बहादूर रेसमी मगर यांनाही मरणोत्तर किर्तीचक्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तामिळनाडूमध्ये जलिकट्टू विधेयकाला मंजुरी
२३ जानेवारी रोजी तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
तामिळनाडूनमध्ये अनेक ठिकाणी जलिकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टू विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात आले.
तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्या २१ जानेवारीलाच जलिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती.
शेष भारत इराणी करंडक विजेता
प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या गुजरातचे ३७९ धावांचे आव्हान चार मोहऱ्यांच्या मोबदल्यात पार करत शेष भारताने इराणी करंडक जिंकला.
आव्हानाचा पाठवलाग करणाऱ्या शेष भारताचे चार मोहरे ६३ धावांत माघारी परतले होते.
मात्र चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा यांनी पाचव्या विकेटसाठी ३१६ धावांची भागीदारी रचून शेष भारताचा विजय निश्चित केला.
साहाने २७२ चेंडूंत २६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद २०३, तर पुजाराने २३८ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद ११६ धावांची खेळी केली. साहाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
सीआयएच्या संचालकपदी माईक पॉंपेओ
अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदी माईक पॉंपेओ यांची निवड झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.
पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना पॉंपेओ यांची निवड महत्त्वाची मानली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा