भारताच्या ६८व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजधानी दिल्लीत राजपथावर तसेच देशभरात उत्साहाने साजरा झाला.
यावेळी भारतीय सैन्याने जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. शिस्तबद्ध संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
युएईचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह इतर नेतेही हजर होते.
संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचलन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (ब्लॅक कॅट्स) पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग घेणार आहेत.
यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले.
यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.
वैज्ञानिक पी के के नायर यांचे निधन
पॅलिनॉलॉजी (परागकणशास्त्र) या शास्त्रातील भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक पी के के नायर यांचे २१ जानेवारी रोजी निधन झाले.
भारतात परागकणशास्त्राचा विकास व प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी एकूण २० पुस्तके लिहिली व २५० शोधनिबंध प्रकाशित केले.
सपुष्प वनस्पतींमध्ये अँजियोस्पर्मस असतात, त्याबाबतचा ‘ट्रायफायलेटिक सिद्धांत’ त्यांनी मांडला होता.
हवेत असणाऱ्या कणांचा डेटाबेस त्यांनी एरोस्पोरा नावाने तयार केला होता. या कणांमुळे मानवाला अॅलर्जी होऊन श्वासाचे विकार जडत असतात.
जैवतंत्रज्ञान अभ्यासतंत्रे वापरून त्यांनी काही नर जनुके शोधून काढली होती, ती वनस्पतींच्या उत्पादनात सुधारणा करणारी होती.
नायर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९३० रोजी केरळातील चांगनासेरी येथे झाला. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी पॅलिओबॉटनीत पीएचडी केली.
त्यांनी पर्यावरण, बगीचा नियोजन, पोलन मॉर्फोलॉजी, एरोबायोलॉजी, इकॉनॉमिक बॉटनी अशा अनेक विषयांत संशोधन केले.
ते लखनऊ येथील कौल सायन्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व द एनव्हायर्नमेंट रीसोर्स रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक होते.
सीएसआयआरमध्ये त्यांना ‘सुप्रतिष्ठ (तहहयात) वैज्ञानिक’ हे पद देण्यात आले होते.
तिरूअनंतपुरम येथील ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेचे ते उपसंचालक होते.
त्यांनी १९६४मध्ये सुरू केलेली पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही परागकण संशोधन शास्त्रास वाहिलेली संस्था हा त्यांचा फार मोठा वारसा आहे.
त्यांनी लिहिलेले ‘इसेन्शियल्स ऑफ पॅलिनोलॉजी’ हे पुस्तक परागकणशास्त्रावरील रूढार्थाने पहिले क्रमिक पुस्तक होते.
ब्रिटिश कौन्सिलचे अभ्यागत, रशियाच्या अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त होते.
राहूल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार
बंगळूर विश्वविद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी घेण्यास माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याने नकार दिला आहे.
बंगळुरु विश्वविद्यापीठाने २७ जानेवारीला होणाऱ्या ५२व्या दीक्षांत समारंभात द्रविडला डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता.
डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.
यापूर्वी २०१४साली गुलबर्गा विद्यापिठाकडूनही त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.
२०१२मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो भारत 'अ' आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे.
भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात घट
बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती समोर आले आहे.
जागतिक आर्थिक मंच आणि इतर संघटनांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे या संघटनेने जगातील सर्वाधिक पारदर्शक आणि कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे.
ही यादी तयार करताना देशांमधील सार्वजनिक जीवनात नेमका किती भ्रष्टाचार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे.
भ्रष्टाचार मोजताना ० ते १०० असे गुण देण्यात आले आहेत. शून्य गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक पारदर्शकता असे या गुणांचे स्वरुप आहे.
या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी आहे.
भारत, चीन आणि ब्राझीलला लाचविरोधी संघटनेने ४० गुण दिले आहेत. त्यामुळे भारतसाह चीन आणि ब्राझीलचा समावेश मध्यम भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या गटात झाला आहे.
२०१५मध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारताला ३८ गुण मिळाले होते. यंदा त्यामध्ये २ गुणांची वाढ झाली आहे.
न्यूझीलंड आणि डेन्मार्क देशांनी प्रत्येकी ९० गुण मिळवत यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
न्यूझीलंड, डेन्मार्क पाठोपाठ फिनलंड, स्वीडन, स्विझर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, नेदरलँड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे हा अहवाल सांगतो.
सोमालिया देशातील सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
याशिवाय भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान आणि इराकचा समावेश आहे.
एकाही देशाला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढता आलेला नाही, हे लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
यासोबतच जवळपास दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे जगभरात भ्रष्टाचार मोठी समस्या असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे.
या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या १७६ देशांची स्थिती विचारात घेता भ्रष्टाचाराची जागतिक सरासरी ४३ इतकी आहे.
त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.
बोल्टला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक गमावावे लागणार
जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ४x१०० मीटर रिले शर्यतीत मिळालेले सुवर्णपदक काढून घेण्यात येणार आहे.
उसेन बोल्टचा साथीदार नेस्टा कार्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. मेथीलहेक्सानेमाईन हे द्रव्य कार्टरच्या नमुन्यात आढळले आहे.
२००८सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या चमुने ४x१०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
पण त्या संघाचा सदस्य असलेल्या नेस्टा कार्टरने प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केलेल्या पुनर्तपासणीत स्पष्ट झाले आहे.
यामुळे जमैकाच्या संघाचे रिलेचे सुवर्णपदक काढून घेतले जाणार आहे. त्याऐवजी ट्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाला सुवर्णपदक देण्यात येईल. तसेच जपानला रौप्य तर ब्राझिलला कांस्यपदक बहाल केले जाईल.
बोल्टकडे एकूण नऊ ऑलिम्पिक सुवर्णपदके होती, मात्र त्यापैकी एक परत करावे लागल्याने ती संख्या आठवर पोहचली आहे.
बोल्टने २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन) आणि २०१६ (रिओ) ऑलिम्पिकमध्ये १००, २०० आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.
श्रमभूषण पुरस्कार २०१५
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने २०१५साठीचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना जाहीर केला आहे . एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उपक्रम आणि ५००हून अधिक कर्मचारी असलेले खासगी कारखाने यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमधून दरवर्षी ‘श्रमरत्न’, ‘श्रमभूषण’, ‘श्रमवीर /श्रम विरांगना’ आणि ‘ श्रमश्री/ श्रमदेवी’ अशा विविध वर्गातील पुरस्कारांचे विजेते निवडले जातात.
सन २०१५साठी ‘श्रमरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणालाही जाहीर झालेला नाही.
चौघांना ‘श्रमभूषण’, २४ जणांना श्रमवीर /श्रम विरांगना’ व २८ जणांना ‘श्रमश्री/ श्रमदेवी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा