कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ७ ते ९ जानेवारी दरम्यान ‘१४ वे प्रवासी भारतीय दिवस’ संमेलनभरवण्यात आले आहे.
अनिवासी तरुण भारतीयांना आपल्या मातृभूमीतील संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
स्टार्ट अप, पर्यटन आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांत कार्यरत सव्वा तीन कोटी अनिवासी भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस संमेलन भरविण्यात येते.
या संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सूरीनामचे सर्वात तरुण उपराष्ट्रपती मायकल अश्विन अधिन यांच्या हस्ते झाले.
संमेलनातील ‘भारत को जानो’ या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जवळपास १६० तरुण सहभागी झाले आहेत.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे २५० विद्यार्थी आणि बंगळुरूतील विविध महाविद्यालयांतील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
सँडफर्ड फ्लेमिंग यांची १९०वी जयंती
आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा शोध लावणाऱ्या सँडफर्ड फ्लेमिंग यांना गुगलकडून डूडल स्वरूपात मानवंदना देण्यात आली आहे.
७ डिसेंबर रोजी सँडफर्ड फ्लेमिंग यांची १९०वी जयंती आहे. त्यासाठी गुगलने त्यांच्या यशाची महती सांगणारे डुडल तयार केले आहे.
या डुडलमध्ये वाफेच्या इंजिनासह आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ दर्शविणारी २४ घड्याळे दाखविण्यात आली आहेत.
स्कॉटिश वंशाचे असणारे सँडफर्ड हे पेशाने डिझायनर होते. सँडफर्ड यांचा जन्म स्कॉटलंडच्या किक्रॅलडी येथे झाला होता.
सँडफर्ड यांनी १८४७मध्ये रॉयल कॅनेडियन इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा सिद्धांत मांडला.
जागतिक प्रमाणवेळेचे केंद्र इंग्लंडमध्ये ग्रीनिचला असावे असे त्यांनी सुचविले आणि प्रमाणवेळेच्या गणितांची रचना केली.
यासाठी त्यांनी रेखावृत्तानुसार १५ अंशांच्या फरकाने जगाची २४ भागांमध्ये विभागणी केली. या सिद्धांतामुळे आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ निश्चित झाली.
१८८४च्या इंटरनॅशनल मेरिडियन परिषदेत त्यांची कल्पना अमान्य झाली पण ही पध्दत सोयीची असल्याने १९२९पर्यंत ती जगभर रूढ झाली.
याशिवाय, सँडफर्ड यांनी कॅनेडियन पॅसिफिक ही आंतरखंडीय रेल्वे उभारण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
फ्लेमिंग यांच्याकडे व्यापारी दृष्टीही होती. १८८२ साली त्यांनी कॅनडामध्ये कापूस उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली.
तसेच त्यांनी कॅनडाच्या पहिल्या पोस्ट स्टॅम्पचेही डिझायनिंग केले. २२ जुलै १९१५ रोजी सँडफोर्ड यांचे निधन झाले.
त्यांच्या या सगळ्या कामगिरीमुळे १८९७साली इंग्लंडच्या राणीने त्यांचा ‘सर’ ही पदवी देत सन्मान केला.
पेन्शनधारकांना आधार कार्ड क्रमांक बंधनकारक
पेन्शनधारक आणि सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) १९९५नुसार, लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ५० लाख पेन्शनधारक आणि जवळपास ४ कोटी भागधारकांना जानेवारी महिन्याअखेरीस आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे.
त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर, या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपण आधार कार्डसाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
ईपीएफओने देशभरातील १२० वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा