केंद्रीय गृहमंत्रालयाने निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाने जवानांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.
या व्हिडिओनंतर खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी करण्याचे आदेशही पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला दिले होते. तसेच अहवालही मागवला होता.
त्यामुळे लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हे दिशानिर्देश जारी केले आहेत.
नव्याने जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही जवानाला विनापरवानगी छायाचित्र अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही.
जवानाला सोशल मीडियावर छायाचित्र अथवा व्हिडिओ शेअर करायचा असल्यास संबंधित दलाच्या महासंचालकांकडून परवानगी घ्यावी लागेल. खासगी मेसेज पाठवण्यावर मात्र कोणत्याही प्रकारचे बंधन नसेल.
जो बायडेन यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
अमेरिेकेचे मावळते उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते ‘फ्रीडम मेडल’ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
गेली आठ वर्षं ओबामांना साथ देणाऱ्या बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला.
अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक जीवनात, अमेरिकेच्या संस्कृतीत अतिशय मोलाची भर घालणाऱ्या तसेच जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्याच लोकांना अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो.
त्यांना हे मेडल ‘डिस्टिंक्शन’च्या सन्मानासहित दिले गेले असून, फ्रीडम मेडल प्रदान करताना देण्यात आलेला हा वेगळा सन्मान फक्त काही मोजक्या व्यक्तींनाच मिळाला आहे. पोप जॉन पॉल दुसरे यांना हा बहुमान अमेरिकन सरकारने दिला होता.
बायडेन यापुढेही राजकारणात सक्रिय राहणार असून, कॅन्सरविषयक संशोधनाला चालना मिळावी यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. बायडेन यांच्या मुलाचे २०१५साली कॅन्सरमुळे निधन झाले होते.
लालूप्रसाद यादव यांना मिळणार निवृत्तिवेतन
जेपी सन्मान निवृत्तिवेतनासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव पात्र ठरले असून, त्यांना आता दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
जयप्रकाश नारायण यांनी १९७४मध्ये सुरु केलेल्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनात विद्यार्थिदशेत असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी सहभाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २०१५मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण निवृत्तिवेतन योजना आणली.
या योजनेअंतर्गत ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनात ज्यांनी १ ते ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे, त्यांना ५,००० रुपये तर ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेल्यांना १०,००० रुपये निवृत्तिवेतनास पात्र ठरविण्यात आले आहे.
नितीशकुमार स्वत: जयप्रकाश नारायण यांच्या जवळचे होते आणि आंदोलनाच्या काळात त्यांनीसुद्धा तुरुंगवास भोगला होता.
या योजनेचा सुमारे लाभ सुमारे ३,१०० जणांना होत असून, त्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचाही समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा