सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली.
टाटाच्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदी बिगर-पारशी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
टाटा सन्सकडून २४ ऑक्टोबर २०१६ला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीमुळे रिक्त होणाऱ्या टीसीएसच्या सीईओपदी राजेश गोपीनाथन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आयएनएस खांदेरीचे लोकार्पण
स्कॉर्पिअन श्रेणीची दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचे १२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. ही पाणबुडी उष्णकटिबंधीय वातावरणासह कोणत्याही परिस्थितीत सक्षमपणे कार्य करू शकते.
स्कॉर्पिअन पाणबुड्या या डिझेल आणि विजेवर चालतात. प्रामुख्याने याचा उपयोग युद्धात केला जातो.
यावरून शत्रूवर क्षेपणास्त्र अचूकपणे डागता येते. हल्ला करण्यासाठी यामध्ये पारंपारिक टोरपॅडो शिवाय ट्यूब लाँच जहाजविरोधक क्षेपणास्त्रही आहे. जे पाण्यातून व पाण्याबाहेरूनही प्रक्षेपित करता येऊ शकते.
माझगाव डॉकयार्ड येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदलप्रमुख सुनील लांबा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
संवाद साधण्यासाठी या पाणबुडीत अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले आहे.
भारतीय नौदलात स्कॉर्पिअन श्रेणीची पहिली पाणबुडी ही ६ डिसेंबर १९८६ साली सामील झाली होती.
एमसीएच्या अध्यक्षपदी आशिष शेलार
मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींना सुप्रीम कोर्टाने पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा स्वत:हून राजीनामा दिला होता.
त्यानंतर माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे रिक्त झालेल्या या अध्यक्षपदावर शेलार यांची एमसीएच्या कार्यकारिणीने नियुक्ती केली. तर विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी देखील मान्य केल्या असून, त्यामुळे आगामी काळात एमसीएमधील आणखी काही अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.
लोढा समितीच्या शिफारशींनुसार नऊ वर्षांहून अधिक काळ कोणत्याही व्यक्तीला संघटनेवरील पद सांभाळता येणार नाही.
क्रीडा संघटनेचा पदाधिकारी किंवा सभासद ६० वर्षांहून अधिक वयाचा नसावा अशी सुधारणाही लोढा समितीने सुचविली होती.
त्यामुळे वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय ते २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमनही होते.
दुसऱ्या महायुद्धाची बातम्या देणाऱ्या महिला पत्रकाराचे निधन
दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी जगाला देणाऱ्या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे १०५व्या वर्षी हॉगकाँग येथे निधन झाले.
ऑगस्ट १९३९मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले, तेव्हा क्लेअर या 'दि टेलिग्राफ' या ब्रिटीश वृत्तापत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करत होत्या.
युद्धाच्या काही दिवस आधी त्यांनी जर्मन रणगाडे चाल करुन जाताना पाहिले होते. मात्र नवोदित पत्रकार असल्याने या युद्धाची जाणीव झाली नव्हती.
जर्मनी, व्हिएतनाम आणि चीनमधील बहुतेक युद्धांमध्ये त्यांनी आघाडीवर जाऊन वार्तांकन केले होती. अन्य देशांसहित क्लेअर यांनी भारतातही काम केले होते.
युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडमधील कॅटोवाईस शहरातून ब्रिटनमध्ये जाण्यासाठी त्यांनी ३५०० ज्यू नागरिकांना मदत केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा