भारताची सर्वात मोठी युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या जवानांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही मशिन बसवली जाणार असून सॅटेलाईटच्या मदतीने ही मशिन चालणार आहे. अशी सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.
ईडन गार्डन्समधील स्टॅंडला गांगुलीचे नाव
माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टॅंडला त्यांचे नाव दिले जाणार आहे. सध्या गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
गांगुली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टॅंडला दिले जाणार आहे.
याव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू पंकज रॉय आणि बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बी.एन. दत्त, ए.एन. घोष आणि स्नेहांशू आचार्य यांचेही नाव ईडन गार्डन्समधील स्टॅंडला दिले जाणार आहे.
ईडन गार्डन्स हे मैदान आणि त्याचा परिसर हा लष्कराच्या अधिपत्याखाली असल्यामुळे येथे कोणताही बदल करण्यासाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्यक असते.
ईडन गार्डन्सवरील काही स्टॅंडची दुरुस्ती आणि त्यांचे नाव बदलण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने लष्कराकडे गेल्या वर्षी मागितलेली परवानगी मंजूर झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे राष्ट्रपती
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून देशाचे ४५वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
तर माइक पेन्स यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ लाख अमेरिकन नागरिक उपस्थित होते.
यावेळी मावळते अध्यक्ष बराक ओबामा, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर हे देखील उपस्थित होते.
राष्ट्राध्यक्षाने २० जानेवारीला शपथ घेण्याची परंपरा गेल्या २०० वर्षांपासून अमेरिकेत पाळली जात आहे. यावेळीही ही परंपरा कायम राहिली.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा