वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार २०१७, जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे.
‘Molecular mechanisms controlling the circadian rhythm’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
१०८व्या नोबेल पुरस्काराची स्टॉकहोम, स्वीडन येथील कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून घोषणा करण्यात आली.
या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले आहे.
या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.
सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर होणारा परिणामही त्यांनी सिद्ध केला आहे.
या तिन्ही शास्त्रज्ञांच्या टीमने सजीवांमधील या अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुके आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.
हॉल हे सध्या निवृत्त झाले असले तरी ते अजूनही आपला बराच वेळ वालथम येथील ब्रँडिज विद्यापीठातील संशोधनासाठी देतात.
रोसबाश हे देखील ब्रँडिज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, यंग हे न्युयॉर्क येथील रॉकेफेलर विद्यापीठात संशोधनाचे काम करीत आहेत.
प्रसिद्ध लेखक ह मो मराठे यांचे निधन
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे १ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७७व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
हनुमंत मोरेश्वर मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपण नावाने ते ओळखले जात होते. 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले.
सुरुवातीला त्यांनी कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी केली. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले.
त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका.
त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येतो.
चिपळूणला भरणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
ह. मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते. नंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक, नवशक्ती या अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
अखेरच्या काळात मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर बेतलेले जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक यांच्या भूमिका असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक रंगभूमीवर गाजले.
आसामी पत्रकार व लेखक भगवती यांचे निधन
आसाममधील नावाजलेले पत्रकार व लेखक राधिका मोहन भगवती यांचे ३० सप्टेंबर रोजी निधन झाले.
भगवती यांचा जन्म सोनितपूर जिल्ह्यात जामगुरीहाट येथे १९ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती.
त्यांनी १९५८ मध्ये ‘नातून आसामिया’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कारकीर्द सुरू केली. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी तिंदिनिया बाटोरी, अजिर आसाम व सेंटीनेल (हिंदी) या वृत्तपत्रांत काम केले.
नंतर ते ‘दैनिक आसाम’मध्ये रुजू झाले. आसामातले हे सर्वात जुने वृत्तपत्र मानले जाते. १९८७ ते २००४ या काळात त्यांनी ‘दी सेंटीनेल’ ग्रुपमध्ये काम केले. २०१०मध्ये ते ‘दैनिक आसाम’चे संपादक झाले.
१९६०च्या दशकात ते ‘रामधेनू’ या आसाममधील साहित्य नियतकालिकाचे संपादक होते, त्यातून त्यांनी आसामी लेखकांची एक नवी पिढी घडवली.
रक्तजबा, एजन राजा असिल, बनारिया फूल अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. आसाममधील पत्रकारिता समृद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
‘द स्टोरी ऑफ अवर न्यूजपेपर्स’ या चंचल सरकार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी त्यांना १९९१मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
शिवप्रसाद बारुआ नॅशनल मीडिया अॅवॉर्ड, बिरेंद्र कुमार भट्टाचार्य अॅवॉर्ड, सादिन पत्रकारिता पुरस्कार, आर एन बारुआ व प्रतिभा बारुआ जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
गेली पन्नास वर्षे त्यांनी त्यांच्या लेखणीतून आसाममधील लोकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न करतानाच त्यांच्या जाणिवा जागत्या ठेवल्या.
आसामच्या पत्रकारितेला दीडशे वर्षे पूर्ण होत असताना नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. आधुनिक आसामी साहित्याचे शिल्पकार म्हणून त्यांची गणना केली जाते.
त्यांच्या साहित्यात नवीन सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब उमटत होते, त्याचबरोबर त्यांचे लेखन वाचून एक पिढी त्यातून समृद्ध झाली.
पत्रकार म्हणून त्यांनी आसामच्या समाजजीवनाशी निगडित अनेक प्रश्नांना वाचा फोडली व सामान्य लोकांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
भगवती यांचे लेखन हे आसामचा वाङ्मयीन वारसा अधिक समृद्ध करणारे आहे. त्यांचे लेखन आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा