चालू घडामोडी : १७ ऑक्टोबर

युनेस्कोच्या महासंचालकपदी ऑड्री आझूले

  • संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोच्या महासंचालक पदावर फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक ऑड्री आझूले यांची नियुक्ती झाली आहे.
  • या पदासाठी झालेल्या निवडणुकीत, आझूले यांनी अंतिम टप्प्यात कतारचे उमेदवार हमाद बिन अब्दुल अझीझ अल कवारी यांचा ३० विरुद्ध २८ अशा केवळ दोन मतांनी पराभव केला.
  • युनेस्कोच्या विद्यमान महासंचालक आयरिना बोकोव्हा (बल्गेरिया) यांच्याकडून  ऑड्री आझूले पदभार स्वीकारतील.
  • २००९पासून युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना त्यांच्या कारकिर्दीत आर्थिक संकटे तसेच पॅलेस्टाइनला युनेस्कोचे दिलेले पूर्ण सदस्यत्व यामुळे टीकेला सामोरे जावे लागले.
  • तसेच युनेस्को इस्राईलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत अमेरिकेने १३ ऑक्टोबर २०१७ रोजी युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 ऑड्री आझूले यांच्याबद्दल 
  • पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि डाव्या विचारांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेल्या ऑड्री आझूले या युनेस्कोचे प्रमुखपद भूषवणाऱ्या पहिल्या ज्यू आहेत.
  • तसेच रेने महेऊ (युनेस्को महासंचालक १९६१-७४) यांच्यानंतर युनेस्कोच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या फ्रेंच नागरिक आहेत. 
  • त्यांचे वडील अँड्रे हे मोराक्कोचे राजे मोहम्मद यांचे सल्लागार होते. त्यांच्या आई कटिया बरामी या लेखिका असून मोरक्कन आहेत.
  • फ्रान्समधील प्रसिद्ध अशा ‘ईएनए’ विद्यापीठातून त्या विशेष प्रावीण्याने पदवीधर झाल्या. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम केले आहे.
  • फ्रान्सच्या चित्रपट उद्योगातील प्रमुख अशा सीएनसी (नॅशनल सेंटर फॉर सिनेमा अँड दि मूव्हिंग इमेज)च्या अर्थविषयक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
  • समाजवादी विचारांचे फ्रान्सिस्को ओलांद हे फ्रान्सचे अध्यक्ष असताना आझूले यांनी सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.
  • कलाकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे तसेच फ्रान्समधील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण व्हावे यासाठी आझूले यांनी कायदा केला.
 युनेस्को 
  • UNESCOThe United Nations Educational, Scientific and Cultural Organization (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था)
  • युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. तिची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५मध्ये करण्यात आली.
  • ही संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
  • युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून जगभरात ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देणारी संस्था म्हणून ती जगाला परिचित आहे.

फेडररला शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद

  • जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या राफेल नदालला (स्पेन) पराभूत करत रॉजर फेडररने (स्वित्झर्लंड) शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
  • फेडररचे हे दुसरे शांघाय विजेतेपद आहे. फेडररने याआधी २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली होती, तर २०१०मध्ये तो उपविजेता होता.
  • त्याचे कारकिर्दितील हे ९४वे विजेतेपद आहे. या विजयासह त्याने इव्हान लेंडलच्या विजेतेपदांची बरोबरी केली आहे.
  • आता विजेतेपदांच्या बाबतीत केवळ अमेरिकेचा जिमी कॉनर्स त्याच्या पुढे आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष एकेरीत कॉनर्सने सर्वाधिक १०९ विजेतीपदे मिळविली आहेत.
  • २०१४च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून फेडररचा नदालविरुद्धचा हा सलग पाचवा विजय होता.
  • यापूर्वी हे दोघे ३७ वेळा आमनेसामने आले होते. त्यात नदालने २३, तर फेडररने चौदा वेळा बाजी मारली होती.

लक्ष्मी मित्तल यांच्याकडून हार्वर्ड विद्यापीठाला देणगी

  • प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांच्या मित्तल फाऊंडेशनने ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे.
  • भारतासह दक्षिण अशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी असून, विद्यापीठातील साऊथ अशिया इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरूपी निधी या देणगीतून निर्माण होईल.
  • यामुळे हार्वर्ड विद्यापीठाची दक्षिण अशिया इन्स्टिट्यूट यापुढे लक्ष्मी मित्तल साऊथ एशिया इन्स्टिट्यूट अँड हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाईल.
  • लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी आर्सेलर मित्तलचे ते अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

पनामा पेपर्सशी संबंधित महिला पत्रकाराची हत्या

  • पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणाऱ्या महिला पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
  • दक्षिण युरोपातील माल्टा देशात स्थायिक झालेल्या डॅफनी कारमधून जात असताना त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला व या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला.
  • पत्रकार डॅफनी यांच्या मृत्यूनंतर माल्टातील ३ हजार नागरिक रस्त्यावर उतरले असून, हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी कँडल मार्चसुद्धा काढला आहे.
  • डॅफनी या स्वतंत्र ब्लॉग लिहित होत्या. ब्लॉगमधून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. त्यामुळे त्यांची लेडी विकिलिक्स नावाने देखील निर्माण झाली होती.
  • डॅफनी यांनी २०१६मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते.
  • या गौप्यस्फोटांमध्ये आइसलँड, युक्रेनचे राष्ट्रपती, साऊदी अरेबियाचे शाह आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश होता.
  • तसेच रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन, अभिनेता जॅकी चेन आणि फुटबॉलपटू लायनल मेसी यांच्याबाबतही अनेक खुलासे केले होते.

  • दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाचे उद्घाटन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा