चालू घडामोडी : २७ ऑक्टोबर

वारसा दत्तक योजना

  • पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक योजने’अंतर्गत देशातील १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
  • दिल्लीत आयोजित ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या ‘स्मारक मित्र’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.
स्मारक स्मारक मित्र
जंतरमंतर (दिल्ली) एसबीआय फाऊंडेशन
कोणार्क सुर्यमंदिर (ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
राजा-राणी मंदिर (भुवनेश्वर, ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
रत्नागिरी (ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
हंपी (कर्नाटक) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
लेह पॅलेस (जम्मू-कश्मीर) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
कुतुबमिनार (दिल्ली) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
अजिंठा लेणी (महाराष्ट्र) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय (केरळ) ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
सफदरगंज मशिद (दिल्ली) ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख (जम्मू-कश्मीर) ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया
माऊंट स्टोकंग्री (जम्मू-कश्मीर) ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया
अग्रसेन की बावली (दिल्ली) स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.
पुराना किला (दिल्ली) एनबीसीसी

काश्मीरमध्ये हिंसक आंदोलकांवर होणार कारवाई

  • जम्मू काश्मीरमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचे करणाऱ्या आंदोलकांविरोधात कडक कारवाई सरकार करणार आहे.
  • जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांनी राज्य सरकारच्या ‘जम्मू अॅण्ड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज) ऑर्डिनन्स २०१७’ या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे.
  • सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु नसल्याने मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शिफाशीनंतर राज्यपालांनी हा अध्यादेश लागू केला आहे.
  • त्यानुसार आता उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.
  • आंदोलकांकडून फक्त दंड आकारला जाणार नाही, तर त्यांना जवळपास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • बंद, उपोषण, निदर्शन यासारख्या आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे नुकसान झाले तर बंद किंवा आंदोलनासाठी उकसवणाऱ्यांना दोन ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • याशिवाय त्यांना बाजारमूल्याप्रमाणे नुकसान झालेल्या संपत्तीची दंड म्हणून भरपाई द्यावी लागणार आहे. 
  • याआधी खासगी संपत्तीचे नुकसान झाल्यास कारवाई करण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. मात्र या अध्यादेशात ही तरतूद करण्यात आली आहे.

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगीचा मृत्यू

  • बनावट मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करिम तेलगीचा बंगळुरुमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना २६ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून तेलगीची प्रकृती गंभीर होती. शरीरातील विविध अवयवांनी (मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) काम थांबवल्याने त्याचा मृत्यू झाला.
  • त्याला वीस वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५६ वर्षांच्या तेलगीवर गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.
  • महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीला २००१मध्ये अजमेरमधून अटक करण्यात आली होती.
  • तेलगीने बोगस स्टॅम्प पेपर छापून ते अनेक बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते.
  • या प्रचंड मोठ्या घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा झाली होती. तसेच या घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधींची कमाई केली होती.
  • त्याच्या या महाघोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
  • या प्रकरणात तेलगीला जानेवारी २००६मध्ये ३० वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला सुमारे २०२ कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता.
  • तेलगीचा मुद्रांक घोटाळा व हर्षद मेहताचा रोखे घोटाळा या दोन्ही गाजलेल्या घोटाळ्यांच्या सूत्रधारांचा मृत्यू तुरुंगात झाला आहे.

डब्ल्यूबीसीएसडीच्या अध्यक्षपदी सन्नी व्हर्गिस

  • ‘शाश्वत विकासविषयक जागतिक व्यापार परिषदे’च्या (वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट - डब्ल्यूबीसीएसडी) अध्यक्षपदी सिंगापूर येथील भारतीय वंशाचे उद्योगपती सन्नी व्हर्गिस यांची नियुक्ती झाली आहे.
  • या परिषदेची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली असून त्याच्या अध्यक्षपदी प्रथमच एका आशियाई व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी पॉल पोलमन यांच्याकडून ते नवीन पदाची सूत्रे घेतील
  • डब्ल्यूबीसीएसडीचे जगभरात २००हून अधिक सदस्य असून शाश्वत विकासाच्या दृष्टीने परिषदेने लक्षणीय काम केले आहे.
 सन्नी व्हर्गिस यांच्याबद्दल 
  • या परिषदेचे नेतृत्व करणारे सन्नी व्हर्गिस हे सिंगापूर येथील ओलम इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
  • १९७९मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बीएस्सी (कृषी) ही पदवी घेतल्यानंतर असलेल्या आयआयएम, अहमदाबाद या संस्थेतून त्यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतली.
  • काही वर्षे युनिलिव्हर या भारतीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर १९८६मध्ये ते नायजेरियात गेले.
  • केवलराम चनराय समूहाच्या कापूस उत्पादन प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. शेतीत अनेक प्रयोग करून त्यांनी कापसाचे दर्जेदार उत्पादन बनवले. नंतर या समूहाचे ते महाव्यवस्थापक बनले.
  • १९८९मध्ये ते कंपनीची कृषी उत्पादने निर्यात करणाऱ्या विभागाचे ते प्रमुख बनले. दोन दशके केवलराम चनराय (केसी) समूहात ते होते.
  • त्यानंतर व्हर्गिस ओलम समूहात गेले आणि ओलम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक बनले.
  • कंपनीच्या विस्तार योजना आखून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात व्हर्गिस यांचे योगदान मोलाचे राहिले.
  • उद्योगजगतातील असामान्य कामगिरीबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तरुण उद्योजकांसाठी दिला जाणारा पुरस्कार २००८मध्ये त्यांना मिळाला.
  • सिंगापूरच्या कंपन्यांमधील सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २०११मध्ये व्हर्गिस यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • सिंगापूर सरकारतर्फे दिले जाणारे व तेथे अत्यंत मानाचे समजले जाणारे ‘पब्लिक सर्व्हिस मेडल’ही त्यांना मिळाले आहे.
 शाश्वत विकास 
  • १९८७मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि वैश्विक आयोगाने आपले समान भवितव्य या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात शाश्वत विकास ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली होती.
  • शाश्वत विकास या शब्दात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संसाधनांचा जपून वापर करणे अपेक्षित आहे. सौर व पवनऊर्जा यांसारख्या स्रोतांचा जास्तीत जास्त वापर हा शाश्वत विकासाचा पाया आहे.
  • आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून आपल्याकडे जी मर्यादित संसाधने आहेत त्यांचा नियंत्रित वापर हेही या संकल्पनेत अभिप्रेत आहे.

जॉन केनेडी हत्या प्रकरणातील फाईल्स प्रसिद्ध

  • अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे २८०० फाईल्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध केल्या आहेत.
  • अर्थात एफबीआय आणि सीआयएने सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर इतर फाईल्स जाहीर करणे थांबवण्यात आले.
  • २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सास राज्यातील डल्लास येथे केनेडी यांची हत्या करण्यात आली होती.
  • गेल्या सहा दशकांमध्ये केनेडी यांच्या हत्येमध्ये नेमका कोणाचा सहभाग असेल याबाबत अमेरिकन जनमानसात याबाबत नेहमीच तर्कवितर्क उपस्थित केले जात होते.
  • मात्र या फाईल्स उघड केल्यानंतरही फारसे काही मिळण्याची शक्यता नाही असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
 जॉन केनेडी यांच्याबद्दल 
  • केनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म २९ मे १९१७ रोजी मॅसॅच्युसेटसमधील ब्रुकलिन येथे झाला.
  • अमेरिकन नौदलात लेफ्टनंट पदावरती असणाऱ्या केनेडी यांनी दुसऱ्या महायुद्धासह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता.
  • केनेडी हे १९४७ ते १९५३ याकाळात संसदेच्या कनिष्ठ सभागृहात तर १९५३ ते १९६० या काळात वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून कार्यरत होते.
  • १९६१साली ड्वाईट आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर उपराष्ट्राध्यक्ष असणारे लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष झाले.
  • केनेडी यांच्या हत्येनंतर अनेक सरकारांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पण सर्व तपास आयोगांनी केनेडी यांची हत्या ली हार्वे ऑस्वल्डने टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन तीन गोळ्या झाडून केली असा निष्कर्ष मांडला होता.
  • मात्र याशिवाय या हत्येमध्ये आणखी कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा, कटाचा सहभाग असावा असे अमेरिकन लोकांना वाटते.
  • ऑस्वल्ड हा स्वयंघोषित मार्क्सवादी होता. त्याने रशियामध्ये रेडिओ आणि टिव्ही कंपनीमध्ये काम केले होते.
  • या हत्येसंदर्भात १९७९साली नेमलेल्या हाऊस सिलेक्ट कमिटीने या हत्येत दोन शूटर्सचा समावेश असावा अशी शक्यता असल्याचे निरीक्षण मांडले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा