ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
विद्यमान चेअरमन गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी या वर्षी मार्चमध्ये संपला होता. त्यांची जागा आता अनुपम खेर घेतील.
चौहान यांचा अध्यक्षपदाविरोधात विद्यार्थ्यांनी, तेथील शिक्षकांनी आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध केला होता व १३९ दिवसांचा संप पुकारला होता.
अनुपम खेर हे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पदवीधर झाले आहेत. सन १९८२मध्ये त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी ५००हून अधिक चित्रपट व अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.
त्यांचे कर्मा, चायना गेट, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है असे चित्रपट विशेष गाजले होते.
यापूर्वी खेर यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक म्हणून आणि ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेंसॉर बोर्ड)चे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री (२००४) आणि पद्मभूषण (२०१६) या पुरस्कारांनी गौरवले आहे.
डोकलाम वादाच्या अभ्यासासाठी संसदीय समिती
चीनबरोबरचा ७३ दिवसांचा डोकलाम वाद व रोहिंग्या शरणार्थीचा प्रश्न या दोन्ही मुद्दय़ांचा अभ्यास परराष्ट्र खात्याअंतर्गत नेमण्यात आलेली संसदीय समिती करणार आहे.
या समितीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश असून, या समितीचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करीत आहेत.
या समितीची बैठक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. यात परराष्ट्र धोरणातील अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे.
चीन व भारत यांच्यातील सीमा प्रश्न व डोकलाम मुद्दयावरून असलेले वाद, तसेच म्यानमारशी संबंध व रोहिंग्या शरणार्थीचा भारतातील प्रवेशाचा मुद्दा यावर यात विचार केला जाणार आहे.
याबरोबरच अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क, युरोपीय समुदायातील ब्रेक्झिटमुळे असलेला पेच तसेच त्याचे भारतावर परिणाम, पासपोर्ट प्रणाली यावरही त्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारत व चीन यांच्यात ऑगस्टमध्ये एक समझोता झाला असून त्यानुसार दोन्ही देशांनी सैन्य डोकलाममधून माघारी घेतले आहे.
चीनमधील ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार होते त्या आधी चीनने सैन्य माघारी घेतले व तो भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जातो.
तरी नंतर पुन्हा चीनने कुरापती काढण्यास सुरूवात केली असून रस्ते बांधणीचे काम पुन्हा सुरू केल्याच्या बातम्या आहेत.
सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी टुंडाला जन्मठेप
हरयाणातील सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने टुंडाला दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सोनीपतमध्ये २८ सप्टेंबर १९९६ रोजी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये १२ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचे समोर आले होते.
टुंडा हा ‘लष्कर- ए- तोयबा’ या संघटनेचा दहशतवादी असून १९९४ ते १९९८ या कालावधीत दिल्लीसह भारतातील विविध शहरांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये टुंडा सहभागी झाला होता.
टुंडाचा एकूण ३३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. त्याच्याविरोधात दिल्लीत २२ तर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ११ खटले प्रलंबित आहेत.
दिल्लीत १९९७ साली झालेल्या दोन वेगवेगळ्या बाँबस्फोटांप्रकरणी अब्दुल करीम टुंडाला दोन वर्षांपूर्वी दोषमुक्त करण्यात आले होते.
स्फोटके तयार करण्यात पटाईत असलेल्या टुंडाने १९८५मध्ये आयएसआयमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्याला ऑगस्ट २०१३मध्ये दिल्ली पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केली होती.
अब्दुल करीम टुंडा हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा निकटचा साथीदार म्हणून ओळखला जातो.
तेलगु नाटककार हरनाथा राव यांचे निधन
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित तेलुगुतील सामर्थ्यशाली लेखक, नाटककार, चित्रपट कथालेखक व अभिनेते एम. व्ही. एस. हरनाथा राव यांचे ९ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे २७ जुलै, १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कारकून होते, तर आई सत्यवती देवी यांनी कर्नाटक संगीतात पदविका घेतलेली होती.
लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. तिसऱ्या इयत्तेत असताना त्यांनी एका नाटकात काम केले आणि तरुणपणी नाट्यलेखनास सुरुवात केली.
चित्रपट निर्माते टी. कृष्णा यांच्या माध्यमातून ते चित्रपट क्षेत्रात आले व सुरुवातीला पटकथा व संवादलेखक म्हणून काम केले. ‘रक्षासुडू’ व ‘स्वयमकृषी’ चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला.
त्यांनी ‘प्रतिघटना’, ‘भारत नारी’, ‘अमायी कापूरम’ अशा जवळपास दीडशे चित्रपटांसाठी संवादलेखन करून तेलुगु चित्रपटसृष्टीवर छाप स्वतःची पाडली. एकूणच त्यांचे लेखन हे आधुनिकतेकडे झुकणारे होते.
‘रक्ताबाली’ हे त्यांचे पहिले नाटक चांगलेच गाजले. त्यांच्या ‘कन्यावर सुल्कम’ या नाटकास आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार मिळाला.
‘क्षीरसागर मंथनम’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आंध्रातील प्रतिष्ठेचा नंदी पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाला होता. आंध्र नाट्य परिषदेच्या स्पर्धेत १९८०मध्ये त्यांच्या ४ नाटकांना २० पुरस्कार मिळाले होते.
‘अंचम कडीडी आरंभम’, ‘यक्षगानम’, ‘रेडलाइट एरिया’, ‘मी परिमिती’, ‘प्रजाकवी वेमना’, ‘जगन्नाथ रथ चक्रालू’ ही त्यांची इतर नाटके.
त्यांच्या ‘लेडी चंपिना पुली नेटुरू’ व ‘अरण्य रोदनम’ या दोन नाटकांचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले.
राव हे डाव्या विचारसरणीकडे झुकणारे लेखक होते. त्यांनी समकालीन स्त्रियांची पात्रे व्यवस्थेविरोधात बंडखोरी करताना दाखवली.
ते एक चांगले नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने या क्षेत्रातील पुरोगामी चळवळीला धक्का बसला आहे.
तृतीयपंथी व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड
ट्रान्सजेंडरर्सच्या (तृतीयपंथी) हक्कांसाठी लढणाऱ्या दिल्लीच्या जोइता मंडल या तृतीयपंथीची पश्चिम बंगालमधील इस्लामपूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे.
यामुळे शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये या एका नव्या प्रयत्नाची भर पडली आहे.
जुलै महिन्यात लोक अदालतीसाठी इस्लामपूरच्या सब डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीतर्फे जोईता मंडल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
याच लोक अदालतीसमोर २०१०साली जोईता यांना त्या ट्रान्सजेंडर असल्याच्या कारणावरून एका हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार देण्यात आला होता व त्यांना रात्र फूटपाथवर काढावी लागली होती.
या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी दिली. या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जोईता यांनी मग पुढे तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढा सुरू केला
त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांना न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले.
ट्रान्स वेल्फेअर इक्विटीच्या संस्थापक अभीना यांच्यामते, या समाजघटकातील एका व्यक्तीला असा मान मिळण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा