देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून अहवाल सादर केला असून, त्यात हा दावा करण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान द्रमुककडे ७७.६३ कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती. तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे.
सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५४.९३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे २०१५-१६मधील उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते.
एडीआरच्या मते २०१५-१६ दरम्यान ३२ प्रादेशिक पक्षांना एकूण २२१.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यातील ११० कोटी रूपये खर्च करण्यात आले नाही. हे एकूण उत्पन्नाच्या ४९ टक्के इतके आहे.
या अहवालानुसार २०१५-१६मध्ये सर्वांत जास्त खर्च करणाऱ्या पक्षांमध्ये संयुक्त जनता दल (२३.४६ कोटी रूपये खर्च), टीडीपी (१३.१ कोटी रूपये खर्च), आणि आप (११.१ कोटी रूपये खर्च) आघाडीवर आहे.
एडीआरच्या मते, यावर्षी ४७ पैकी ३२ प्रादेशिक पक्षांनी आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली होती.
१५ पक्षांनी आपला लेखापरिक्षण अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही. सर्व राजकीय पक्षांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपला लेखापरिक्षण अहवाल सादर करायचा होता.
श्रीकांत फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत
भारताच्या एच एस प्रणॉयची झुंज मोडून काढत किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशीमोटोशी होणार आहे.
श्रीकांतने प्रणॉयचा १४-२१, २१-१८, २१-१९ असा पराभव करत २०१७या वर्षात सलग पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्रीकांतने या वर्षांत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
तर सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याचा भारताच्या साई प्रणीतकडून पराभव झाल्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
१७ वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडला
इंग्लंडने स्पेनचा ५-२ असा धुव्वा उडवून पहिल्यांदा फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात इंग्लंडने १७ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले.
प्रथमच फायनलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडकडून फोडेनने २ गोल केले तर रेयान ब्रेवस्टर, मॉर्गन गिब्स व्हाईट आणि मार्क ग्युही याने प्रत्येकी १ गोल केला. स्पेनकडून दोन्ही गोल सर्जियो गोमेजने केले.
स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ब्रेव्हस्टरला गोल्डन बूटच्या पुरस्कारने गौरवण्यात आले तर फिलिप फोडेनला गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी ब्राझिल आणि माली या संघांमध्ये रंगलेल्या सामन्यात ब्राझिलने मालीवर २-० अशी मात करत ब्राँझपदक पटकावले.
१९६६नंतर इंग्लंडला फिफाची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. त्यामुळे हा विजय इंग्लंडचा फुटबॉलमधला महत्वाचा विजय ठरला.
आजवर इंग्लंडला एकदाही १७ वर्षाखालील फिफा विश्वचषकाच्या अंतिम चार संघांमध्येही स्थान मिळवता आले नव्हते.
यावर्षी क्रोएशियात झालेल्या युरो १७ वर्षाखालील चषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.
त्यानंतर इंग्लंडच्या अंडर २० संघाने यावर्षी कोरियात अंडर २० विश्वकप जिंकला होता. तसेच त्यांचा अंडर १९ संघही युरोपियन चॅम्पियन बनला होता.
स्पेन संघाने याआधी १९९१, २००३ आणि २००७च्या फायनलमध्ये धडक मारली होती आणि तिन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक फुटबॉल चाहत्यांनी पाहण्याचा नवीन विक्रम रचला गेला आहे.
ब्राझील आणि माली या दोन संघांत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या शेवटच्या सामन्यानंतर ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या १२,८०,४५९पर्यंत पोहोचली आहे.
यापूर्वी १२,३०,९७६ प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहण्याचा विक्रम १९८५मध्ये चीन येथील फिफा अंडर १७ वर्ल्डकपदरम्यान बनला होता.
पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद
प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर मात करत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे.
अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचे आव्हान ५५-३८ असे मोडून काढत पाटण्याने प्रो-कबड्डीत सलग तिसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले.
प्रदीप नरवालने सामन्यात चढाईत १९, मोनू गोयतने चढाईत ९ तर विजयने बचावफळीत ७ गुणांची कमाई करत पाटण्याचा विजय सुकर केला.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्रामला रौप्य
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या संग्राम दहियाने पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदक पटकावले.
तसेच अमनप्रीत सिंगने पदार्पणातच कांस्यपदक मिळविले. जितू रायला मात्र खराब कामगिरीमुळे सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
वरिष्ठ गटात संग्रामचे हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने २००९मध्ये ज्युनियर आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
या स्पर्धेत संग्रामने ८० लक्ष्यांपैकी ७६ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. सुवर्णपदक विजेत्या हू बिनयुआनने (७९) त्याच्यापेक्षा तीन लक्ष्ये अधिक साधली.
विश्वचषकाचा रौप्य विजेता असलेल्या अमनप्रीतने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०२.२ गुण मिळवून कांस्यपदक पदक जिंकले.
सर्बियाच्या दमिर किमेच २२९.३ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. तर युक्रेनच्या ओलेह ओमेलचक २२८ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
याचप्रमाणे जितू राय आणि हिना सिंधू यांनी १० मीटर मिश्र एअर पिस्तूल प्रकारात पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा