चालू घडामोडी : २१ ऑक्टोबर

गुजरातमधील रो-रो नौका सेवेचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात ‘रोल ऑन, रोल ऑफ (रो-रो)’ नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
  • या प्रकल्पासाठी ६१५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. भारतातील तसेच दक्षिण आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच सेवा आहे.
  • घोघा (भरूच) व दाहेज दरम्यान हा प्रकल्प असून, रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील ३१० किमी असलेले अंतर या नौका सेवेमुळे घटून ३० किमी इतके होईल.
  • या फेरीसेवेमुळे रस्त्यावरून होणारा आठ तासांचा प्रवास फेरी बोटीने समुद्रमार्गे केवळ एका तासात होऊ शकतो.
  • तसेच जी वस्तू रस्ते मार्गाने नेण्यासाठी दीड रूपये खर्च येत होता. तेच साहित्य जल मार्गाने नेण्यासाठी फक्त २० ते २५ पैसे खर्च येईल.
  • याशिवाय या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रवास व वाहतूक खर्च कमी झाल्याने व्यापारवाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राचा विकास हे फायदेदेखील गुजरातला मिळणार आहेत.
  • रो-रो फेरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात समुद्र मार्गाने जोडले जाणार आहेत. यामध्ये एका फेरीत ५०० हून अधिक लोक आणि सुमारे १०० कार आणि ट्रक नेता येतील.
  • भविष्यात मुंबई आणि दक्षिणेतील राज्ये यांनाही या सेवेद्वारे जोडण्याचा सरकारचा विचार आहे.

श्रीकांतकडून सायना नेहवालचा विक्रम मोडीत

  • भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत एका वर्षात चौथ्या सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • उपांत्य फेरीत श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • याचसोबत त्याने भारताच्या सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे. सायनाने २०१० तसेच २०१२ या दोन्ही वर्षी प्रत्येकी तीन सुपरसिरीज स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. या सर्व स्पर्धांमध्ये सायना विजेतीही ठरली होती.
  • अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली ह्यूनविरुद्ध होणार आहे. 
  • या सामन्यात श्रीकांतने विजय मिळवल्यास, एका वर्षात ३ सुपर सिरीज स्पर्धांची अंतिम फेरी जिंकण्याच्या सायना नेहवालच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल.

सरकार देशात ७.५ लाख इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित करणार

  • डिजिटल इंडियाचे ध्येय साध्य करण्यासाठी, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायद्वारे कमीत कमी ७.५ लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. 
  • निमशहरी तसेच ग्रामीण भागांत हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी ही योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.
  • रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया व सरकारी कंपनी बीएसएनएल यांच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे.
  • हायस्पीड व स्वस्त इंटरनेटद्वारे ई-गव्हर्नन्स तसेच डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे.
  • जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे मूळ हे वायफाय सुविधा आहे. पण भारत त्यात खूपच मागे आहे.
  • भारतात २०१६पर्यंत केवळ ३१ हजार हॉटस्पॉट होते. याउलट तर फ्रान्समध्ये १.०३ कोटी, अमेरिकेमध्ये ९८ लाख तर ब्रिटनमध्ये ५६ लाख हॉटस्पॉट आहेत. 
  • देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत ७५ हजार ग्रामपंचायतींमध्ये हे काम पूर्ण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा