आयसीएएन (ICAN) म्हणजेच ‘इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबॉलिश न्यूक्लीअर वेपन्स’ या स्वयंसेवी संस्थेला यंदाचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, महासंहारक अण्वस्त्र नष्ट व्हावीत म्हणून आंतरराष्ट्रीय मोहीम चालविणाऱ्या आयसीएएनला हा सन्मान देण्यात आला आहे.
आयएसीएन जगातील १०१ देशांमध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अण्वस्त्रांचा वापर सर्व देशांनी बंद करावा या ध्येयासाठी ही संघटना काम करते.
१० डिसेंबर रोजी ओस्लो येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात ‘आयसीएएन’ला ११ लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहेत.
गौरी लंकेश यांना अॅना पोलित्स्काया पुरस्कार
कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अॅना पोलित्स्काया या रशियाच्या निर्भीड शोध पत्रकार होत्या. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या.
रशियातील भ्रष्टाचार आणि जनतेवर होणारे अन्याय यांना त्यांनी वाचा फोडली होती. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांची मॉस्कोमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
त्यानंतर त्यांच्या पत्रकारितेची आणि सामाजिक कार्याची जाणीव म्हणून शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्यात येतो.
जे पत्रकार लढतात, भूमिका मांडतात त्यावर ठाम राहतात आणि निर्भीड लेखन करतात, त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे.
मागील महिन्यात ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. तसेच विविध वर्तमानपत्रांमध्येही त्या स्तंभलेखनही करत.
अॅना पोलित्स्काया पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या आहेत.
किसान सभेच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक ढवळे
हरियाणा राज्यात हिस्सार येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या ३४व्या अधिवेशनात डॉ. अशोक ढवळे यांची किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
१९३६ साली लखनौच्या अधिवेशनात या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून स्वामी सहजानन्द सरस्वती यांची तर पहिले महासचिव म्हणून प्रो. एन. जी. रंगा यांची निवड करण्यात आली.
२५ राज्यांत दीड कोटीहून अधिक शेतकरी सभासद असलेली अखिल भारतीय किसान सभा ही देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी आणि सामर्थ्यशाली संघटना आहे.
महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले डॉ. अशोक ढवळे हे तिसरे नेते आहेत.
यापूर्वी १९५५ साली डहाणूच्या १३व्या अधिवेशनात क्रांतिसिंह नाना पाटील व त्यानंतर १९८६साली पाटण्याच्या सुवर्ण महोत्सवी २५व्या अधिवेशनात गोदावरी परुळेकर यांची किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा