‘वर्तनाधारित अर्थशास्त्रा’शी (Behavioral Economics) संबंधित सिद्धांत मांडणारे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
त्यांना हे पारितोषिक ‘अंडरस्टँडिंग द सायकॉलॉजी ऑफ इकॉनॉमिक्स’ या प्रबंधासाठी देण्यात येणार आहे.
अर्थशास्त्रामधील मानसिकतेचा सखोल अभ्यास करून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी थॅलर यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
थॅलर हे वर्तनाधारित अर्थशास्त्राचे जनक आहेत. या शाखेत मानवी वर्तनाचा अर्थशास्त्रावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.
एखादी व्यक्ती आर्थिक निर्णय घेताना कसा विचार आणि वर्तन करते याचे विश्लेषण या शाखेत केले जाते.
मानवी स्वभावाचा व्यक्तीच्या आर्थिक निर्णयांवर आणि बाजाराच्या उलाढालीवर कसा परिणाम होतो, हे थॅलर यांनी दाखवून दिले.
थॅलर सध्या अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांना त्यांनी या संशोधनातून एकत्र आणले आहे. वर्तन अर्थशास्त्रावर त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
थॅलर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ‘द डिक्टेटर गेम’ हे टूल विकसित केले आहे. जगभरातील लोकांचे वर्तन याद्वारे मोजता येणार आहे.
संशोधनामुळे पेन्शन अथवा इतर ठिकाणी सेव्हिंग्ज करताना स्वनियंत्रण अधिक करता येणार आहे. तसेच व्यक्तींना वित्तीय नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.
तसेच या संशोधनामुळे सरकारलाही धोरणे ठरवताना लोकांचे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांची सांगड घालणे सोपे जाणार आहे.
डॉ. थॅलर हे ‘Nudge’ (२००८) या बेस्ट सेलर पुस्तकाचे सहलेखकही आहेत. कास आर. सनस्टेन यांच्यासोबत त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
यात त्यांनी वर्तनीय अर्थशास्त्राचे सिद्धान्त वापरून समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक कशी केली जाऊ शकते, याचे विवेचन केले होते.
अर्थशास्त्रासाठी दिला जाणारा हा पुरस्कार नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जात असला तरी इतर पुरस्कारांप्रमाणे सर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार दिला जाणारा तो मूळ नोबेल नाही.
‘स्वेरिग्ज रिक्सबँक स्मृती पुरस्कार’ असे अधिकृत नाव असलेला हा पुरस्कार इतर नोबेल पुरस्कारांनंतर सात दशकांनी म्हणजे सन १९६९पासून सुरू केला गेला.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराराठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही नाव चर्चेत होते.
सर्वात कमी वयाचे (४०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.
दिल्लीत फटाका विक्रीवर बंदी
राजधानी दिल्लीत फटाका विक्रीवर घातलेली बंदी १ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
या निर्णयामुळे दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) भागात दिवाळी दरम्यान फटाके विक्री करता नाही.
दिल्लीत आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटक्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते.
म्हणूनच ११ नोव्हेंबर २०१६पासून दिल्लीमध्ये फटाके विक्रीवर आणि ते वाजवण्यावर सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे.
त्यानंतर फटाक्यांचे उत्पादक, विक्रेते व परवानाधारक यांनी केलेली विनंती मान्य करून न्यायालयाने विक्रीवरील ही बंदी तहकूब केली होती.
दिल्लीत थंडीच्या महिन्यांत हवेचे प्रदूषण, श्वास घेणेही मुश्कील व्हावे, एवढे वाढते. दिवाळीत फटाक्यांच्या धुराने परिस्थिती आणखी बिकट होते.
याची दखल घेत, काही नागरिकांनी केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार केला आणि बंदी तहकूब करण्याचा आधीचा निर्णय १ नोव्हेंबरनंतर लागू होईल, असा आदेश दिला आहे.
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शहा यांचे निधन
थोर विचारवंत तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुरलीधर बन्सीलाल शहा यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
शहा यांनी हिंदी, साहित्य, राष्ट्रभाषा प्रचार, राष्ट्रसेवादल समाजवादी चळवळी, नर्मदा बचाव, महात्मा गांधी तत्वज्ञान संस्था या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.
त्यांनी ५०पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन तसेच हिंदीतील उत्तम साहित्याचे मराठीत आणि मराठीतील साहित्याचे हिंदीत अनुवाद केले.
समाजकार्य, भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वावरील पकड यामुळे अनेकांना आपलेसे करून घेण्याची अनोखी शैली शहा यांच्याकडे होती.
शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.
हिंदी भाषा आणि साहित्य तसेच गांधीजींच्या विचारांचा प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले.
आयुष्यातील सुमारे ४५ वर्षे हिंदीच्या प्रचारासाठी कार्यरत राहिलेल्या शहा यांनी प्रारंभी धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
संशोधनातील आवडीमुळे त्यांनी धुळे येथील इतिहासाचार्य वि का राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले.
त्यातूनच मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले.
छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक दायित्वाची जाणीव करून देण्याचे काम केले.
मराठीतील साहित्य हिंदी भाषेत गेल्यास ते अधिक वाचकांपर्यंत पोहोचू शकेल, या हेतूने त्यांनी मराठीतील अनेक पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदीतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले.
अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’ पुस्तकाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष गाजला.
मराठीतून हिंदीत अनुवादित साहित्यात रजिया पटेल यांचे ‘चाहूल’, पु ल देशपांडे यांचे ‘मातृधर्मी सानेगुरुजी’, नरहर कुरुंदकर यांचे ‘विचार तीर्थ’, साधनाताई आमटे यांच्या ‘समिधा’ या पुस्तकांचा समावेश आहे.
याशिवाय त्यांनी ‘खानदेशचे गांधी - बाळूभाई मेहता’, ‘सत्यशोधक कुंभार गुरुजी’, ‘श्यामची आई’ (नाट्य रूपांतर), ‘यदुनाथ थत्ते’ (चरित्र), ‘निबंध कौमुदी’, ‘संस्कृति’, ‘अक्षरयात्रा’, ‘नवजागरण और हिंदी साहित्य’, ‘भारतीय समाज क्रांती के जनक महात्मा जोतिबा फुले’ आदी पुस्तकांचे लेखन केले.
राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती या संस्थांमध्ये महत्त्वाची कामगिरी सांभाळताना त्यांनी या संस्थांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला.
भारतातील चौदा भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱ्या २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ची स्थापना केली.
शहा यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य क्षेत्राची तर हानी झालीच, पण समाजात बदल होण्यासाठी नि:स्वार्थ वृत्तीने झटणारे व्यक्तिमत्त्वही लोपले.
पनामा पेपर्सप्रकरणात शरीफ यांच्या जावयास अटक
पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांचे जावई मोहम्मद सफदर यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने अटक केली आहे.
पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात खटले दाखल करण्याचे आदेश पाकमधील सुप्रीम कोर्टाने जुलैमध्ये दिले होते. यानंतर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
सफदर यांना पनामा पेपरप्रकरणात न्यायालयाने समन्स बजावले होते. मात्र यानंतरही न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.
पनामा पेपर्समध्ये शरीफ यांनी लंडनच्या उच्चभ्रू वस्तीत मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले होते.
तसेच शरीफ यांच्या मुलांच्या परदेशात कंपन्या असून शरीफ कुटुंबाच्या चार महागड्या सदनिका असल्याची माहिती उघड झाली होती.
याप्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. जुलैमध्ये सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात निकाल दिला होता.
त्यात शरीफ यांचे पुत्र हुसेन आणि हसन, कन्या मरियम, जावई मोहम्मद सफदर, शरीफ यांचे विश्वासू साथीदार इसाक दार यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा