देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणासाठीच्या भारतमाला महामार्ग योजनेच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे.
या योजेनेंतर्गत ३५ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येतील. यासाठी ५.३५ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
३५ हजार किलोमीटर लांबीचे हे महामार्ग येत्या पाच वर्षांत (२०१७ ते २०२२) बांधण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
यामुळे आर्थिक घडामोडीला चालना देत देशभरात येत्या ५ वर्षांत किमान १४.२ कोटी मनुष्यदिन रोजगार निर्माण होतील.
या योजनेत दोन मुख्य ठिकाणांदरम्यान चारपदरी रस्ते बांधून प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
या नवीन महामार्ग विकास कार्यक्रमात रस्ते तयार करून गतिमानतेत सुधारणा करून वाहतुकीचा खर्च कमी करण्याचा समावेश आहे.
रस्त्यांचे उत्तम जाळे आणि नीटनेटके चिन्हाधारित रहदारीमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात लक्षणीय बदल होतील.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामुळे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होईल.
केंद्रीय रस्ते महामार्ग, जहाजबांधणी आणि जलसंपदामंत्री: नितीन गडकरी
बिहारमधील छोटीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
बिहारमधील मुशाहर या मागास समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीस वर्षीय छोटी कुमारी सिंह या मुलीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
भोजपूर जिल्ह्याच्या छोटीला स्वित्झर्लंडच्या विमेन्स वर्ल्ड समिट फाउंडेशनने ‘विमेन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ पुरस्कार जाहीर केला आहे.
हा पुरस्कार सर्जनशीलता, धैर्य व निश्चय दाखवून ग्रामीण समुदायांचा विकास करणाऱ्या महिलांना दिला जाते.
गरीब राजपूत कुटुंबातील छोटीने तिच्या रतनपूर खेडय़ातून २०१४मध्ये मुशाहर लोकांना मदत करण्यास सुरूवात केली.
ती माता अमृतानंदमयी यांच्या मठाने आयोजित केलेल्या एका योजनेत सहभागी झाली. १०१ खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट होते.
मुशाहर समुदायातील लोक भूमिहीन असून ते दारिद्र्याला तोंड देत आहेत. त्यांच्यात निरक्षरता अधिक असून व्यक्तिगत आरोग्याकडे दुर्लक्ष जास्त आहे. बालविवाहाचे प्रमाण जास्त असून शाळेतील हजेरीही कमी आहे.
छोटीने या समुदायातील लोकांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगितले. महिलांसाठी स्वमदत गट सुरू करून दिले, त्यात प्रत्येक महिला महिन्याकाठी २० रूपये वाचवू लागली.
तिने तिची शाळा सुटल्यानंतर मुलांच्या मोफत शिकवण्या घेतल्या. तिने घेतलेल्या वर्गातून १०८ मुले शिकली. केवळ १००० लोकवस्तीच्या गावात हे प्रमाण लक्षणीय होते.
मुशाहार लोक दारू-गांजा पित असत, शिवीगाळ करीत. पण छोटीच्या प्रयत्नांमुळे आता त्यांच्यात सकारात्मक बदल झाले आहेत.
नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबॉट सोफिया
धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली सोफिया ही एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळवणारी पहिली कृत्रिम बुद्धिमान यंत्रमानव (Humanoid Robot) बनली आहे.
सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केले आहे. यामुळे एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश बनला आहे.
विशेष म्हणजे, नागरिकत्व मिळाल्यानंतर तिचा इंटरव्यू देखील घेण्यात आला. यामध्ये देशाचे नागरिकत्व मिळविणारी जगातील पहिली रोबोट बनणे हे ऐतिहासिक आहे असे सोफिया म्हणाली.
निर्णय घेण्याची तसेच विचार करायची क्षमता असलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली सोफिया यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसेच अनेक मीडिया चॅनल्सना इंटरव्यू देण्यासाठीही ती ओळखली जाते.
हॅन्सन रोबोटीक्स कंपनीने सोफियाची रचना केली आहे. हॅन्सन रोबोटिक्सचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी रोबोट सोफियाला बनवले आहे.
सिंगापूर पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली
ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीनुसार सिंगापूरच्या पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्टठरला आहे.
जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत १९३ देशांच्या पासपोर्टची एकमेकांशी तुलना केली गेली. यामध्ये सिंगापूर पहिल्या, जर्मनी दुसऱ्या तर स्वीडन आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानी आले.
यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, यापूर्वीच्या ७८ क्रमांकावरून त्याने ७५व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
या यादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशांचंच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
गेल्या काही वर्षांपासून नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असून, काही अंशी त्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
शिक्षण, नोकरी यासारख्या गोष्टींसाठी लोक परदेशी जात असतात. त्यामुळे अनेकांना तात्काळ व्हिसा मिळणेही गरजेचे असते.
सिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्ध होतात.
स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना १५७ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. तर भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.
गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
रोनाल्डो व मार्टिन्स यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
फिफाच्या २०१७ च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडची लिके मार्टिन्स यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोनाल्डोने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे.
जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आले.
याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो, जियानलुकी ब्युफॉन, मेस्सी व नेमार यांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा