अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्यूनवर २१-१०, २१-०५ अशी एकतर्फी मात करत श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा प्रकाश पडुकोण (१९८०) आणि सायना नेहवाल (२०१२) यांच्यानंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
श्रीकांतचे २०१७ या वर्षातील हे तिसरे सुपरसिरीज विजेतेपद आहे. याआधी त्याने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या सुपरसिरीज स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
तसेच श्रीकांतचे कारकिर्दीतील हे पाचवे सुपरसिरीज विजेतेपद ठरले. श्रीकांतने २०१४मध्ये चीन ओपन, २०१५मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
या विजेतेपदासह श्रीकांतने सायना नेहवालच्या एकाच वर्षात तीन सुपरसिरीज विजेतेपदाच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
दिनेश्वर शर्मा काश्मीरमध्ये संवादक म्हणून नियुक्त
काश्मीरमधील शांतता प्रक्रियेअंतर्गत स्थिर संवादासाठी गुप्तचर विभागाचे (आयबी) माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची संवादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शर्मा यांना कॅबिनेट दर्जा दिला असून, शांतताप्रक्रियेअंतर्गत कोणत्या गटाशी अथवा संघटनेशी चर्चा करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.
ते १९७९च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, डिसेंबर २०१२ ते डिसेंबर २०१६ दरम्यान ते गुप्तचर विभागाचे संचालक होते.
ते काश्मीरमधील सर्व स्तरावरील लोकांशी आणि संघटनांशी चर्चा करतील. हा मुद्दा संवेदनशील असल्याने या संदर्भात कालमर्यादा आखून देण्यात आलेली नाही.
जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शर्मा यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
जपानमध्ये पुन्हा शिंझो आबे यांचे सरकार
जपानमध्ये २२ ओकॉत्बर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंझो आबे यांनी विजय मिळवला.
शिंझो आबे यांच्या नेतृत्त्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आणि कोमितो या पक्षांच्या युतीने संसदेत दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत.
या निवडणुकीत विजयासाठी संसदेतील एकूण ४६५ जागांपैकी २३३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, आबे यांच्या युतीला सुमारे ३११ जागा मिळाल्या.
या विजयामुळे आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते हा मान मिळाला आहे.
तसेच या विजयामुळे जपानवर अमेरिकेने लादलेल्या राज्यघटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार आबे यांना मिळेल.
सध्याच्या राज्यघटनेअंतर्गत जपानला स्वसंरक्षणाव्यतिरिक्त अन्य उद्देशांसाठी लष्कर बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संसदेचा एक वर्षाचा बाकी असतानाही आबे यांनी जपानमध्ये मध्यावधी निवडणूक घोषणा केली होती.
उत्तर कोरियाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने सध्या आबे जनतेचा पाठिंबा मिळत असून, विरोधक कमकुवत झाले होते. मध्यावधी निवडणुकांमध्ये याचाच फायदा आबे यांना झाला.
आबे यांच्यासमोर टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी गेल्या महिन्यात स्थापन केलेल्या ‘पार्टी ऑफ होप’चे आव्हान होते.
याशिवाय काही आठवड्यांपूर्वीच स्थापन झालेली कॉन्स्टिट्युशनल डेमोकॅट्रिक पार्टीदेखील (सीडीपी) निवडणुकीच्या रिंगणात होती.
मात्र, या दोन्ही पक्षांना आबे यांना टक्कर देता आली नाही. या निवडणुकीत आबे यांना दुबळ्या विरोधकांचा फायदा झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा