चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर
७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.
- ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती.
- या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे.
- कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले.
- तसेच ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
- परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली.
- म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते.
- डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्याव्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.
- आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे.
- शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे शासनाने जाहीर केले आहे.
- शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय स्तरावर ७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे.
सलाहउद्दीनच्या घरावर एनआयएचा छापा
- राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनच्या घरावर छापा टाकला.
- एनआयएने दोन दिवसांपूर्वी सलाहउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसूफ याला २०११मध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्याच्या प्रकरणात अटक केली होती.
- जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सलाहउद्दीनचे घर असून, एनआयएने सलाहउद्दीनच्या घरावर छापा टाकला.
- त्याच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, कागदपत्रे हाती लागताच एनआयएचे पथक तिथून निघून गेले.
- हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जागतिक दहशतवादी जाहीर केले होते. सलाहउद्दीन हा युनायटेड जिहाद काऊन्सिलचाही अध्यक्ष आहे.
आरकॉमची टूजी सेवा बंद
- कर्जात आकंठ बुडालेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) अखेर आपला टूजी मोबाइल सेवेचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- साधारणपणे ३० नोव्हेंबरपर्यंत कंपनी आपला टूजी व्यवसाय बंद करेल. मात्र थ्रीजी आणि फोरजी मोबाइल सेवा सुरू राहणार आहेत.
- थ्रीजी आणि फोरजी मोबाइल सेवा तसेच कंपनीचा मोबाइल टॉवर व्यवसायही नफ्यात चालेपर्यंत सुरू राहणार आहे. बाकी सर्व व्यवसाय कंपनी बंद करणार आहे.
- रिलायन्स कम्युनिकेशन्सवर सध्या सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातून सावरण्यासाठी कंपनीने एअरसेलचे अधिग्रहण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस अपात्र
- ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस यांच्यासह संसदेच्या चार सदस्यांना तेथील उच्च न्यायालयाने दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविले आहे.
- यामुळे एका मताचे बहुमत असलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचे आघाडी सरकार सत्तेवरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेनुसार दुहेरी नागरिकत्व असलेली व्यक्ती संसदेची सदस्य राहण्यास अपात्र आहे.
- उपपंतप्रधान जॉयस यांनी वडिलांकडून जन्माने मिळालेल्या न्यूझीलंडच्या नागरिकत्वाचा त्याग न करता संसदेची निवडणूक लढविली होती.
- आता त्यांनी ते नागरिकत्व सोडून दिले असल्याने ते त्याच मतदारसंघातून पुन्हा संसदेची निवडणूक लढवू शकतात.
- मात्र त्यांना पराभूत करून विरोधी मजूर पक्ष टर्नबूल यांचे सरकार त्याआधारे सत्तेवरून खाली खेचू शकेल.
- स्कॉटिश वडिलांमुळे ब्रिटिश नागरिकत्त्व मिळालेल्या मंत्री फियोना नॅश यांचाही पात्रता गमावलेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा