मेट्रो ५ आणि मेट्रो ६ प्रकल्पांना मंजुरी
- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मेट्रो ५ आणि मेट्रो ६ या दोन्ही प्रकल्पांना परवानगी दिली असून, यामुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.
- मेट्रो-५ द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडले जाणार आहे तर मेट्रो-६ प्रकल्पाने समर्थनगर, जोगेश्वरी, कांजूरमार्ग व विक्रोळी ही शहरे जोडली जातील.
- या दोन्ही प्रकल्पांना सुमारे १५ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच हे दोन्ही प्रकल्प २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
आग्रा द्रुतगती मार्गावर हवाईदलाचा सराव
- उत्तर प्रदेशमधील आग्रा द्रुतगती मार्गावर हवाई दलाच्या विमानांचा सराव २४ ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे.
- युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हवाई दलाकडून हा सराव केला जात आहे. या सरावामध्ये एकूण २० विमानांचा समावेश आहे.
- हवाई दलाच्या या सरावासाठी आग्रा एक्स्प्रेस वेवरील उन्नवजवळील अरौल ते लखनऊ दरम्यानची वाहतूक २० ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात आली आहे.
- या सरावादरम्यान मिराज २०००, जॅग्वार, सुखोई ३० आणि एएन-३२ विमाने एक्स्प्रेसवर वेवर उतरविण्यात आली.
- या सरावादरम्यान, हवाई दलाचे आवाढव्य मालवाहतूक विमान सी-१३०जे सुपर हर्क्युलिस हेदेखील आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरले आहे.
- यंदा पहिल्यांदाच हवाई दलाच्या अशा प्रकारच्या अभ्यासात वाहतूक विमानांचा समावेश करण्यात आला.
- गेल्या वर्षीही आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांनी सराव केला होता. त्यावेळी ८ लढाऊ विमाने सरावात सहभागी झाली होती.
- २०१५मध्ये पहिल्यांदा दिल्लीजवळ यमुना द्रुतगती मार्गावर मिराज हे विमान उतरवण्यात आले होते.
- आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्गांचाही धावपट्टीसारखा वापर होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी हवाई दलाकडून या सरावाचे आयोजन केले होते.
‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवी यांचे निधन
- ठुमरी गायनावर विलक्षण हुकूमत असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे २४ ऑक्टोबर रोजी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
- गिरिजा देवी यांचा जन्म ८ मे १९२९ रोज उत्तर प्रदेशातील बनारस येथे झाला. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
- गिरिजा देवी बनारस आणि सेनिया घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी शास्त्रीय गायनाचे पूर्ण शिक्षण वाराणसीतच घेतले.
- शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. त्यामुळेच ‘ठुमरीची राणी’ अशीही त्यांची ओळख झाली होती.
- गिरिजा देवी यांनी 'ऑल इंडिया रेडिओ अलाहाबाद'वर १९४९मध्ये पहिला कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्यांच्या गायनाचा प्रवास अखंड सुरू राहिला.
- संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने गिरिजा देवी यांना १९७२मध्ये पद्मश्री त्यानंतर १९८९मध्ये पद्मभूषण तर २०१६मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले.
पंजाबमध्ये प्राणी पाळण्यासाठी विशिष्ट कर
- पंजाबमध्ये कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरिण यासारखे पाळीव प्राणी पाळायचे असल्यास विशिष्ट कर भरावा लागणार आहे.
- पंजाबचे पर्यटनमंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या खात्याने याबाबत एक परिपत्रक जरी केले आहे.
- पाळीव प्राणी पाळायचे असतील तर त्याकरिता प्रत्येक प्राण्यासाठी वर्षाला विशिष्ट कर भरावा लागणार आहे.
- यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या छोट्या प्राण्यांसाठी २५० रुपये प्रतिवर्ष आणि गाय, म्हैस, बैल, घोडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांसाठी ५०० रुपये प्रतिवर्ष इतका कर संबंधित मालकाला भरावा लागणार आहे.
- त्याचबरोबर पंजाबमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांना संबंधित यंत्रणेकडून परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. या परवान्याचे त्यांना दरवर्षी नव्याने नुतनीकरण करावे लागणार आहे.
- ही करवसुली योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी प्रत्येक जनावराला एक ब्रँडिंग कोड दिला जाणार आहे. तसेच, जनावरांची ओळख पटविण्यासाठी विशिष्ट क्रमांक किंवा मायक्रो चीपचा वापर करण्यात येणार आहे.
- पंजाबमध्ये गो सेसच्या नावाने आधीपासूनच कर घेतला जातो. परंतु अशा प्रकारचा कर भारतात पहिल्यांदाच आकारण्यात येणार आहे.
मल्याळी दिग्दर्शक आय व्ही शशी यांचे निधन
- अवलुडे रावूकल आणि देवासुरम यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी परिचित असलेले ज्येष्ठ मल्याळी दिग्दर्शक आय व्ही शशी यांचे २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
- आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत शशी यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील सुमारे १५०हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
- मोहनलाल, कमल हसन आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले.
- २८ मार्च १९४८ रोजी केरळमधील कोझिकोडे येथे जन्मलेल्या शशी यांनी कला दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
- १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उल्सावन’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
- १९७८मध्ये ‘अवलुडे रावूकल’ चित्रपटाने शशी यांना मळ्याळी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक ओळख दिली.
- २०१४ साली त्यांना केरळ राज्यातर्फे चित्रपटकर्मीना दिला जाणारा सर्वोच्च कारकीर्दगौरव जे सी डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा