आशिया खंडातील हॉकीवर भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करत आशिया चषक जेतेपदावर आपले नाव कोरले.
बांगलादेशमधील ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषक जिंकला.
रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर मलेशियाकडून शाहरिल सबाहने एकमेव गोल केला.
भारतीय संघाने २०१७ आशिया कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. सहापैकी पाच सामने भारताने जिंकले, तर एका सामन्यात भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनदा हरविले. सुपर फोर लढतीत भारताने पाकिस्तानचा ४-० ने धुव्वा उडवला होता.
भारताचे हे तिसरे आशिया चषक विजेतेपद ठरले. याआधी भारताने २००३ (मलेशिया येथे) आणि २००७ (भारतात) ही स्पर्धा जिंकली आहे.
तर १९८२, १९८५, १९८९, १९९४ आणि २०१३मध्ये भारताला आशिया चषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
तमिळ चित्रपट ‘मेर्सल’ वादाच्या भोवऱ्यात
तमिळ भाषेतील ‘मेर्सल’ चित्रपटवस्तू व सेवा कराविषयी (जीएसटी) काही वादग्रस्त संवादांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
अटाली दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशीच कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असले, तरी या चित्रपटातील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणी भाजपने केली आहे.
भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांनी या चित्रपटातील संवादांचे समर्थन केले आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी वेळ पडल्यास गैरसमज पसरवणारे हे संवाद काढून टाकण्याची तयारी दर्शवली आहे.
दलाई लामांना भेटणे गुन्हा : चीन
कुठल्याही विदेशी नेत्याने किंवा देशाने तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना निमंत्रित करणे किंवा त्यांना भेटणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.
दलाई लामा हे फुटीरवादी नेते आहेत, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. धार्मिक नेते या नात्याने दलाई लामा यांना भेटण्याचा कुठल्याही देशाने केलेला दावा चीनला मान्य नाही.
दलाई लामा यांना भेटणाऱ्या जागतिक नेत्यांचा चीनकडून सातत्याने निषेध केला जातो.
तिबेट हा चीनचा भाग असून, बीजिंगच्या माध्यमातूनच जगाने तिबेटशी राजनैतिक संबंध ठेवायला हवेत, अशी सक्तीही चीनकडून करण्यात आलेली आहे.
यावर्षी अरुणाचल प्रदेशसह इशान्य भारतातील काही ठिकाणांना भेटी देण्यास दलाई लामा यांना भारताने परवानगी दिली होती, त्यालाही चीनने तीव्र विरोध केला होता.
स्पेनमध्ये घटनात्मक पेच
कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताने देशातून स्वतंत्र होण्यासाठी लढा सुरु केला आहे.
परंतु स्पेनचे पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने हा लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
कॅटलोनियाची स्वातंत्र्याची मागणी घटनाबाह्य असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी राज्यघटनेतील विशेष तरतुदींचा वापर करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे रजॉय यांनी सांगितले.
त्यानुसार कॅटलोनियाच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जातील. तसेच तेथील सरकार बरखास्त करून केंद्रीय राजवट लागू केली जाईल.
येत्या सहा महिन्यांत तेथे प्रांतिक कायदेमंडळासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील. अर्थात येत्या २७ आॅक्टोबर रोजी भरणाऱ्या अधिवेशनात स्पेनच्या संसदेने यास मंजुरी दिली तरच पंतप्रधान हे खास अधिकार वापरू शकतील.
केंद्र सरकारचा विरोध डावलून दोन आठवड्यांपूर्वी कॅटलोनियात स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते.
त्यात बहुसंख्य लोकांनी कौल दिल्याचा दावा करून प्रांतिक कायदेमंडळाने स्वतंत्र होण्याचा ठरावही मंजूर केला होता.
स्पेनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घटनात्मक पेच मानला जात आहे.
भारत आणि रशियाचा संयुक्त युध्दसराव
भारत आणि रशियादरम्यान तिन्ही सेनादलांचा संयुक्त युध्दसराव ‘इंद्र-२०१७’ २० ऑक्टोबर पासून रशियामध्ये सुरु झाला.
आतापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे. यंदा प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभाग घेत आहेत.
या सर्वमध्ये भाग घेण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट या युद्धनौका रशियामध्ये पोहचल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा