चालू घडामोडी : ५ नोव्हेंबर
भारतीय महिला संघ आशिया चषक विजेता
- भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर ५-४ ने मात करत आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
- या विजेतेपदाबरोबरच या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघ २०१८साली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
- जपानमधील काकामिगाहारा येथे महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.
- नवजोत कौरने पहिल्या हाफमध्ये गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये चीनच्या तिआन लुओने गोल मारत संघाला बरोबरी मिळवून दिली.
- पेनल्टी शूटआऊटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी भारताची गोलरक्षक सविता हिला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले.
- भारतीय महिला संघाचे आशिया चषक स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. भारताने सुमारे १३ वर्षानंतर आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे.
- भारताच्या महिला संघाने यापूर्वी २००४मध्ये जपानवर १- ० अशी मात करत आशिया चषक स्पर्धा जिंकली होती.
- भारतीय संघ याआधी २००९मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव
- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली.
- सोलापूर जिल्ह्यासाठी २००४मध्ये सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली. या विद्यापीठाशी ११८ महाविद्यालये जोडलेली आहेत.
- २०१३साली धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले होते.
- या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यापैकी एकाचे नाव द्यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात आली होती.
- यासाठी शिवा वीरशैव युवक संघटनेने पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचा अखिल भारतीय शिवा संघटनेने विरोध केला आहे.
- सिद्धेश्वरांच्या नावासाठी आग्रही असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळून आपला संताप व्यक्त केला.
नेपथ्यकार पार्सेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
- राज्य सरकारतर्फे दिला जाणारा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना जाहीर झाला आहे.
- तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला आहे.
- महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. ५ लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.
- बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही रंगभूमीच्या क्षेत्रांमध्ये बाबा पार्सेकर यांनी ठसा उमटवला आहे.
- जे जे कला महाविद्यालयातून अप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पार्सेकर यांचे दामू केंकरे हे पहिले गुरु होते. यानंतर त्यांना विजया मेहता गुरु म्हणून लाभल्या.
- साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. बाबा पार्सेकरांनी ४८५ नाटकांचे नेपथ्य केले आहे.
- निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रो. बी. आर. देवधर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.
- सुरुवातीला महिला कलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या.
- भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या आहेत.
व्यंगचित्रकार जी बाला यांना अटक
- व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारविरोधात आवाज उठवला म्हणून मुक्त व्यंगचित्रकार जी बाला यांना तामिळनाडूच्या पोलिसांनी अटक केली आहे.
- तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, नेल्लाईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्र जी बाला यांनी काढले होते.
- या व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांसह इतर दोघांचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे कारण देत जी बाला यांना अटक करण्यात आली आहे.
- एका कुटुंबाने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती. याच घटनेचा संदर्भ घेत जी बाला यांनी व्यंगचित्र काढले होते.
- यंत्रणेतील त्रुटी दाखवण्यासाठी हे व्यंगचित्र काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाला यांनी हे व्यंगचित्र २४ ऑक्टोबर रोजी पोस्ट केले होते.
- ३८ हजार लोकांनी हे व्यंगचित्र शेअर केले. त्याचमुळे या व्यंगचित्राची दखल घेत जी बाला यांना अटक करण्यात आली.
- जी बाला यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा समोर आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा