चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

इवांका ट्रम्प भारत दौऱ्यावर

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इवांका ट्रम्प आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
  • ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करत आहेत. अमेरिकेच्या ३८ राज्यांतील ३५० प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.
  • या शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे.
  • जागतिक उद्योजकता शिखर परिषद २०१७ (जीईएस) हैदराबाद येथे २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे.
  • यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करण्यात येणार आहे.
  • तरुण तसेच नवोन्मेषक अनुभवी उद्योजक आणि गुंतवणुकदार यांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करत असते.
  • विविध देशातील तरुण या परिषदेत जमतात, आपले अनुभव आणि कल्पना इतरांना सांगतात तसेच जमलेल्या इतर तरुणांच्या कल्पनांवरही चर्चा करतात.
  • भारतातर्फे नीती आयोग भारत सरकारचे प्रतिनिधित्व या परिषदेत करणार आहे. (नीती आयोगाचे सीईओ: अमिताभ कांत)

प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे सीएमडी

  • वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे.
  • खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.
  • रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती.
  • यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती.
  • बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे आता त्यांच्या जागी या पदावर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत.

पंकज अडवाणीला १८वे विश्वविजेतेपद

  • भारताचा बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.
  • पंकजने १८वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत इराणच्या आमिर सरखोशला पराभूत केले.
  • बिलियर्ड्स व स्नूकरमध्ये अठरा विश्व अजिंक्यपदे जिंकलेला अडवाणी ह्या खेळामधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू आहे.
  • २००९साली पद्मश्री, २००४साली अर्जुन पुरस्कार, २००६साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले आहे.

सीबीआय विशेष संचालकपदी अस्थाना कायम

  • सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
  • अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला.
  • आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती अवैध आणि नियमबाह्य असल्याचा दावा कॉमन कॉजने केला होता.
  • इन्कम टॅक्स खात्याला छाप्यामध्ये सापडलेल्या डायरीमध्ये राकेश अस्थाना यांच्यावर आरोप होते. त्यामुळे अस्थाना यांची निवड रद्द करावी अशी याचिका कॉमन कॉजने दाखल केली होती.
  • अस्थाना हे १९८४च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर होते.
  • ऑगस्टा वेस्टलँड, बिहारमधील चारा घोटाळा, किंगफिशर, मोईन कुरेशी आणि हसन अलीसारख्या अनेक हायप्रोफाईल घोटाळ्यांची ते चौकशी करत होते.
  • अस्थांनांनी फेब्रुवारी २००२च्या गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्त्वही केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा