भारताचे दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी फेरनिवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची ही दुसरी टर्म आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते.
मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती.
भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत असून, भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते.
न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते.
परंतु अखेरच्या क्षणी ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.
न्यूयॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत १९३पैकी १८३ मते मिळाली, तर सुरक्षा परिषदेत सर्व १५ सदस्यांची मते मिळाली.
नासकॉमच्या अध्यक्षपदी देबजानी घोष
‘नासकॉम’ (NASSCOM / National Association of Software and Services Companies) या संस्थच्या अध्यक्षपदी देबजानी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि आऊटसोर्सिग उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नासकॉम’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
देबजानी घोष या येत्या मार्च २०१८पासून नासकॉमच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. चंद्रशेखर यांच्याकडून स्वीकारतील.
घोष या भारतीय असल्या तरी त्या इंटेल या अमेरिकी कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून नासकॉमवर कार्यरत होत्या.
इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिकापदावरून फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
इंटेलमधून बाहेर पडल्यानंतर घोष सध्या येस बँकेच्या संचालक मंडळावर तसेच सिस्कोच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत.
नवोद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वर्गदूत गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर) म्हणूनही त्या भूमिका बजावत आहेत.
इनक्लोव्ह या गतिमंद, विशेष सक्षम व्यक्तींसाठी अनुरूप जोडीदार शोधणाऱ्या संकेतस्थळाची त्या आर्थिक पाठराखण करीत आहेत. फिक्कीच्या ‘इनोव्हेशन समिती’चे प्रमुखपदही त्यांच्याकडे होते.
चीनकडून अत्याधुनिक डीएफ ४१ची चाचणी
जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘डाँगफेंग ४१’ (डीएफ ४१) या अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चीनने नुकतीच चाचणी घेतली आहे.
या क्षेपणास्त्राचा पल्ला १२ हजार ते १५ हजार किलोमीटर असल्याने ते अमेरिका, युरोपसह जगातील कोणत्याही भागात पोहचू शकते.
एकावेळी अनेक अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही भागात डागण्याची त्याची क्षमता आहे. त्याला ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेईकल’ असे म्हणतात.
त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दहापट (१० मॅकहून अधिक) असल्याने ते क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रांना व अन्य क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देऊ शकते.
चीनच्या ताफ्यात यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असून, हे क्षपणास्त्र पुढील वर्षी चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
अत्याधुनिक डाँगफेंग ४१ हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम तेथे १९९०च्या दशकापासून सुरू आहे. या क्षेपणास्त्राच्या २०१२पासून ८ चाचण्या झाल्या आहेत.
‘डाँगफेंग-४१’ हे जगातील सर्वात आधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी एक असल्याचे मानले जाते. या क्षेपणास्त्रामुळे चीनच्या अण्वस्त्र व संरक्षणसज्जतेत मोठी वाढ होणार आहे.
दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत उत्तर कोरिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकल्याची घोषणा केली आहे.
२००८मध्ये उत्तर कोरियाचे नाव या यादीत टाकण्यात आले होते. परंतु जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आले होते.
ट्रम्प यांनी आण्विक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांच्या कारवाईचे समर्थन केल्याप्रकरणी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकले आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्राने घातलेले निर्बंध झुगारून स्वतःचा आण्विक कार्यक्रम आणि अणुचाचणी सुरूच ठेवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा