चालू घडामोडी : ११ नोव्हेंबर
अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात
- सुमारे १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
- याशिवाय ५ टक्के कर असलेल्या ६ वस्तूंवरील जीएसटी हटवण्यात आला आहे. आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे.
- जीएसटीवरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत सरकारला जीएसटीचा फटका बसण्याची चिन्हे होती.
- या पार्श्वभूमीवर, अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये १० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या २३व्या बैठकीत हा जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला.
- यामध्ये एसी हॉटेलवर १८ टक्के तर नॉन एसी हॉटेलवर १२ टक्के असलेल्या जीएसटीमध्ये कपात करत, तो आता थेट ५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णयही घेण्यात आला.
- पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये मात्र १८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.
- याशिवाय च्युइंगगम, चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, डिओडोरन्टस, कपडे धुण्याचा साबणचुरा, ग्रॅनाइट, संगमरवर आदी उत्पादनांवरही २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अनेक वस्तुंवरील जादा करामुळे ग्राहक तसेच व्यापारी, उद्योजक नाराज होते आणि त्यांनी त्यात कपात करण्याची मागणीही केली होती.
- या निर्णयानंतर २८ टक्के जीएसटी करकक्षेत आता फक्त ५० वस्तू व सेवा राहिल्या आहेत. आधी ही संख्या २२८ होती.
- आता केवळ चैनीच्या वस्तू आणि सिगारेट व पानमसालासारख्या घातक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागेल.
- जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडातही कपात झाली आहे. याआधी दिवसामागे २०० रुपये दंड आकारला जात होता तो आता दररोज २० रुपये एवढाच राहणार आहे.
प्रसिद्ध हिंदी लेखक मनू शर्मा यांचे निधन
- हिंदीतील सर्वात मोठी कादंबरी लिहिणारे प्रसिद्ध हिंदी लेखक, भाष्यकार, कवी, नाटककार मनू शर्मा यांचे ८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.
- ‘कृष्ण की आत्मकथा’ ही त्यांची आठ खंडांची कादंबरी हिंदीतील सर्वात मोठी कादंबरी मानली जाते.
- मनू शर्मा यांचा जन्म १९२८मध्ये फैजाबादमधील अकबरपूर येथे झाला. ते सुरुवातीला हनुमान प्रसाद शर्मा या नावाने लेखन करीत होते.
- कर्ण की आत्मकथा, द्रोण की आत्मकथा, द्रौपदी आत्मकथा, के बोले मां तुमि अबले, छत्रपति, एकलिंग का दीवाना, गांधी लौटे या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या.
- याशिवाय त्यांच्या मरीचिका, लक्ष्मणरेखा, शिवानी का आशीर्वाद, गुनाहों का देवता या कादंबऱ्या व पोस्टर उखड गया हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला.
- भगवान श्रीकृष्णाला पौराणिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून त्याचे एक वेगळे व्यक्तित्व वाचकांसमोर मांडले.
- केवळ कृष्णच नव्हे तर द्रौपदी, द्रोण, गांधारी, कर्ण या महाभारतातील तमाम पात्रांवर त्यांनी लेखन केले.
- याशिवाय राणा बंगा, बप्पा रावल आणि छत्रपती शिवाजी या महानायकांच्या जीवनकथेलाही त्यांनी नवी ओळख दिली.
- त्यांच्यावर गुरू कृष्णदेव प्रसाद गौड यांचा प्रभाव होता. अठरा कादंबऱ्या, दोनशे कथा व सात हजार कविता ही त्यांची साहित्यसंपदा.
- त्यांचे साहित्य हे मनोरंजनापेक्षा आत्मिक सबलता वाढवणारे होते. भारतीय समाज व साहित्यातील प्रत्येक स्पंदन अचूकपणे टिपणाऱ्या साहित्यिकांपैकी ते एक होते.
- त्यांनी वाराणसीतील ‘जनवार्ता’ नावाच्या वृत्तपत्रात दैनंदिन विषयांवर लेखन केले. त्यावर आणीबाणीत बंदी घालण्यात आली होती.
- त्यांना व्यास सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, उत्तर प्रदेश सरकारचा यशभारती सन्मान आदी पुरस्कार तसेच गोरखपूर विद्यापीठाची डीलिट पदवीही मिळाली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी मनू शर्मा यांची नवरत्न म्हणून निवड केली होती.
- त्यांनी साहित्य क्षेत्रातील त्यांचा दबदबा बघून त्यांना वाराणसीच्या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व करण्यासाठी आवाहन केले, त्यांनीही ते स्वीकारले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा