४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) गोव्यातील दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर २० नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता इराणमधील निर्माता मजिद मजिदी याचा ‘बियाँड दि क्लाऊड्स’ हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाला लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
दहा दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात एूकण ८२ देशांचे १९५ चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत.
इफ्फीचे यावर्षीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दाखविण्यात येणाऱ्या एकूण चित्रपटांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
एकूण १० जागतिक प्रिमियर, १० आशियाई चित्रपट प्रिमियर होतील काही हिंदी चित्रपटांचेही प्रिमियर होणार आहेत.
इंडियन पॅनोरमा विभागात ९ चित्रपट दाखवले जातील. ऑस्करसाठी भारतातून नामांकन मिळविलेला ‘न्युटन’ हा सिनेमाही प्रदर्शित केला जाणार आहे.
कॅनडियन सिने दिग्दर्शक अॅटॉम इगोनॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १५ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले असून अनेक टीव्ही मालिका त्यांच्या नाववर आहेत.
‘नेक्स्ट ऑफ कीन’ या त्यांच्या चित्रपटास मानहेम, हिदेलबर्ग येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
यंदाच्या इफ्फीत बॉलिवूड सुपरस्टर अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्कार यांना दिला जाणार आहे.
बच्चन यांची चित्रपट कारकीर्द जवळपास अर्धशतकाची असून, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ४ वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
सिने जगताशी संबंधित देश, विदेशीतील सुमारे ७००० प्रतिनिधींनी इफ्फीसाठी नोंदणी केली आहे.
झिम्बाब्वेत सत्तापालट
झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवत त्यांचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे.
मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांनी देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी मुगाबे यांची इच्छा होती. परंतु ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे.
ग्रेस यांच्याविरुध्द उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले होते. त्यामुळे मुगाबे यांनी म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते.
त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते. मुगाबेंना जनरल, झिम्बाब्वेची जनता आणि सत्तारूढ पक्षाकडून मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत होता.
स्वातंत्र्यानंतर (१९८०) देशातील जनता पहिल्यांदाच उत्साहित झाल्याचे दिसून आली. त्यांनी मुगाबेंच्या निरंकुश सत्तेला विरोध सुरू केला होता.
३७ वर्षे झिम्बाब्वेच्या सत्तेमध्ये राहिलेल्या रॉबर्ट मुगाबे (जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते) यांच्याजागी आता उपाध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची शक्यता आहे.
एमरसन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात. ते गेली अनेक दशके मुगाबे यांना राजकीय क्षेत्रात मदत करण्याचे काम करत होते. २०१४ साली एमरसन झिम्बाब्वेचे उपराष्ट्राध्यक्ष बनले.
अत्यंत कठोर नेता म्हणूनही ते ओळखले जातात. मुगाबे यांनी घेतलेले निर्णय कठोरपणे राबवण्यासाठीच त्यांनी या शक्तीचा वापर केला.
जनतेमध्ये लोकप्रियता मिळवण्यापेक्षा सुरक्षा दले आणि सैन्यामध्ये त्यांनी स्वतःचे पाठिराखे तयार केले. त्याचाच उपयोग त्यांना या लष्करी बंडाच्या वेळेस होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा