२०१६ मध्ये १ ते १५ जानेवारी आणि १५ ते ३० एप्रिलपर्यंत सम-विषम योजना दोन टप्प्यांत लागू करण्यात आली होती.
दुचाकी वाहनांना या सम-विषम योजनेतून वगळण्यात येणार आहे. मागील दोन वेळेसही दुचाकी वाहनांना या नियमांमधून सवलत देण्यात आली होती.
दिल्लीतील प्रदूषणाने सलग तिसऱ्या दिवशी धोक्याची पातळी गाठल्याने राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकार, महापालिका आणि शेजारी राज्यांच्या सरकारांना फटकारले आहे.
प्रदूषणावर अंकुश आणणे ही संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगत लोकांच्या जीवनाशी हा खेळ सुरू असल्याबद्दल हरित लवादाने नाराजीही व्यक्त केली.
मुंबईचा ५००वा ऐतिहासिक रणजी सामना
देशातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि जुनी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी चषक स्पर्धेत बलाढ्य मुंबई संघ आपल्या कारकिर्दीतला ५००वा ऐतिहासिक सामना खेळणार आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक ४१ वेळा जेतेपद जिंकणारा मुंबई संघ ५०० रणजी सामना खेळणारा पहिला संघ ठरणार आहे.
आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ १० नोव्हेंबरपासून वानखेडे मैदानावर बडोद्याविरोधात हा ऐतिहासिक सामना खेळणार आहे.
मागच्या हंगामात रणजी स्पर्धेचे उप-विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ यंदा १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय वंशाच्या ब्रिटीश मंत्री प्रीती पटेल यांचा राजीनामा
भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्रालयाच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौऱ्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला आहे.
इस्रायलमधील राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी गुप्त बैठका घेतल्याबद्दल आणि त्याबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल प्रीती पटेल यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये इस्रायलभेटीमध्ये काही राजकीय व्यक्तींबरोबर बैठका घेतल्या अशी माहिती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली होती.
या भेटीनंतर पटेल यांनी इस्रायली सैन्याद्वारे गोलन हाईटसमध्ये चालवलेल्या मानवतेच्या दृष्टीकोनातून चालवलेल्या मोहिमेत इंग्लंड मदत करेल असे संकेत दिले होते. याबाबत पटेल यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
त्यानंतर इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री बोरीस जॉन्सन यांना आपल्या भेटींबाबत माहिती होती अशी आपण चुकीची माहिती दिल्याचेही पटेल यांनी कबूल केले.
त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात सरकारला अंधारात ठेवून पटेल यांनी इस्रायली राजकीय नेते व अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती.
त्यामुळे पटेल यांच्यावर मंत्र्यांनी पाळायची सभ्यता व नियम तोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना आपले पद गमवावे लागले.
थेरेसा मे यांना एका आठवड्यात दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावे लागल्यामुळे त्यांच्यावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे.
थेरेसा मे यांनी निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर विविध प्रश्नांवरुन टीका सुरु आहे.
मंत्र्यांकडून झालेले लैंगिक दुर्वर्तन, ब्रेक्झिट बाबत केलेल्या तडजोडी, मंत्र्यांनी नियमांचा भंग करणे अशा विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी थेरेसा मे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिका आणि चीनदरम्यान अनेक करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये २५० अब्ज डॉलरच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
दक्षिण चीन समुद्रावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद असूनही दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचे करार झाले आहेत.
यात बोईंग विमान खरेदी करण्यापासून अलास्कामध्ये संयुक्तपणे द्रवरुप नैसर्गिक गॅस निर्मितीचाही करार करण्यात आला.
दक्षिण आशियातील दहशतवादाचा मुकाबला करून शांतता आणि स्थैर्य स्थापित करण्याबाबत ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात मतैक्य झाले आहे.
दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या मतैक्याला महत्त्व आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा