चालू घडामोडी : २४ नोव्हेंबर

विधिज्ञ हबिबुल्लाह बादशा यांचे निधन

  • मद्रास बार कौन्सिलचे प्रसिद्ध वकील आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे विधिज्ञ हबिबुल्लाह बादशा यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • सरकारतर्फे देऊ करण्यात आलेले आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद त्यांनी विनम्रपणे नाकारले व तामिळनाडूमध्येच वकिली व्यवसायाबरोबरच विविध संस्थांच्या उभारणीत आपले आयुष्य खर्ची घातले.
  • ८ मार्च १९३३ रोजी एका धनाढय़ व प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नामांकित कॉन्व्हेंट शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.
  • पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे कायद्याचा अभ्यास केला. १९५७मध्ये ते मद्रास बार कौन्सिलचे सदस्य बनले.
  • १९७०मध्ये ते ३७ वर्षांचे असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे पद स्वीज्कार्ण्यास त्यांनी नकार दिला.
  • पुढे अनेक प्रकरणांत केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही बाजू त्यांनी प्रभावीपणे विविध न्यायालयांत मांडली. नंतर ते काही काळ तामिळनाडूचे महाधिवक्ताही होते.
  • करुणानिधी यांच्यावर घटनेची प्रत जाळल्याचा खटला उभा राहिला तेव्हा त्यांच्या वतीने बादशा यांनीच युक्तिवाद केला.
  • १९८६मध्ये त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद देऊ करण्यात आले होते, पण तेही त्यांनी विनम्रपणे नाकारून राज्यात वकिलीच करण्यात रस असल्याचे सरकारला कळवले.
  • वकिली व्यवसायाबरोबरच विविध शैक्षणिक संस्थांच्या विकासातही ते सक्रिय होते. प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे ते एक संस्थापक-संचालक होते.

इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला

  • इजिप्तमधील उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे असून, जवळपास १०० जण जखमी झाले आहेत.
  • उत्तर सिनाई हा इजिप्तमधील अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागाच्या पश्चिमेला साधारण ४० किलोमीटर अंतरावर अल-अरिश शहरात अल रॉदाह मशीद आहे.
  • या मशिदीत नमाज सुरु असताना दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. त्यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. यानंतर दहशतवाद्यांनी मशिदीतील लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
  • इजिप्तचे सैन्य उत्तर सिनाई प्रांतात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात धडक कारवाई करत असताना हा हल्ला झाला आहे.
  • या भागात आधीही दहशतवाद्यांनी अनेक पोलीस कर्मचारी आणि सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. याशिवाय प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्याही आयसिसच्या दहशतवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आल्या आहेत.
  • इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष : अब्देल फतह अल सीसी

सुनील मित्तल यांचे ७ हजार कोटींचे दान

  • सुनील मित्तल यांनी सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के भाग म्हणजे सुमारे ७ हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे.
  • याशिवाय त्यांनी एअरटेल कंपनीतील आपले ३ टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दिले आहेत.
  • सुनील मित्तल जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ‘भारती एअरटेल’चे चेअरमन आहेत.
  • दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे.
  • हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. २०२१साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मित्तल यांचा मानस आहे.
  • उत्तर भारतात हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उद्देश आहे.
  • २००७साली सुनील मित्तल यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले.
  • १५ जून २०१५ रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.
  • यापूर्वी इन्फोसिसच्या नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी यांनीही आपली अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा