चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला विश्वविक्रमी सुवर्णपदक

  • अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर साईखोम मिराबाई चानूने विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • ४८ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो असे एकूण १९४ किलो वजन उचलत तिने हा विश्वविक्रम केला.
  • यापूर्वी फक्त कर्णम मलेश्वरीने १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते.
  • २२ वर्षानंतर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणारी मिराबाई चानू ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
  • या स्पर्धेत थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले.
  • डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. 
  • मीराबाईचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी पूर्व इम्फाळ येथे साईखोम कुटुंबात झाला. वेटलिफ्टिंग खेळाची प्रेरणा तिने मणिपूरची वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीकडून घेतली.
  • २०१४मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मीराने ४८ किलो वजनी गटात एकूण १७० किलो वजन उचलले होते. 
  • चानू २०१५च्या जागतिक स्पर्धेत नवव्या, तर २०१४च्या स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिली होती.
  • सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत चानूने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती पात्र ठरली आहे.

महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य

  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून (एनसीआरबी) प्रसिध्द करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वात भ्रष्ट राज्य ठरले आहे.
  • या अहवालानुसार, २०१६मध्ये देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या घटनांपैकी २२.९ टक्के (१,०१६) घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत.
  • २०१६मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या १,२७९ तर २०१४मध्ये १,३१६ घटना समोर आल्या होत्या. त्या तुलनेत २०१६मध्ये आकडेवारी (१,०१६) कमी झाल्याचे दिसत आहे.
  • या यादीत महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा क्रमांक लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत.
  • त्यानंतर केरळमध्ये ४३०, मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३८७ प्रकरणे समोर आली आहेत.
 गुन्हेगारीत उत्तर प्रदेश आघाडीवर 
  • तसेच या अहवालानुसार, २०१६मध्ये देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे.
  • उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी खूनाच्या सर्वाधिक ४,८८९ घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे २,५८१ खून पडले.
  • २०१६मधील देशातील एकूण गुन्ह्यांची संख्या ४८,३१,५१५ आहे. २०१५मध्ये ही संख्या ४७,१०,६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्यांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. 
  • सर्वाधिक हत्यांसह देशातील सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंदही उत्तर प्रदेशातच झाली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा क्रमांक लागतो.
  • उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे नोंदविले असले तरी गुन्ह्यांचे प्रमाण (प्रति एक लाख लोकसंख्या) देशात सर्वाधिक कमी म्हणजे १२८ इतके आहे. देशाची एकूण सरासरी २३३ आहे.
  • महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या २०१५मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे.
  • देशातील गुन्ह्यांचा वेध घेणारा हा सर्वकष वार्षिक अहवाल १९५३पासून नियमितपणे प्रसिद्ध केला जातो.
  • महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
 अहवालातील इतर ठळक मुद्दे 
  • फौजदारी गुन्ह्यांपैकी ७२.९ गुन्ह्यांमध्ये २०१६मध्ये आरोपपत्र दाखल केले, तर गुन्हे सिद्धतेचे प्रमाण ४६.८ टक्के इतके आहे.
  • खुनाच्या घटना कमी झाल्या. २०१५मध्ये ३२,१२७ जणांचे खून झाले होते, २०१६मध्ये ३०,४५० इतक्या घटना घडल्या.
  • दंगलींच्याही घटना कमी झाल्या. २०१५मधील ६५,२५५ घटनांची संख्या २०१६मध्ये ६१,९७४ वर आली.
  • २०१६मध्ये एकूण ३७ लाख ३७ हजार जणांना अटक करण्यात आली. ७ लाख ९४ हजार दोषी ठरविण्यात आले.
  • २०१६मध्ये ५,४९,००० जण बेपत्ता झाले. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातून (९४,९१९) होते. पण त्यापैकी २,२९,३८१ जणांना शोधण्यात यश आले.
  • १ लाख ११ हजारांहून अधिक बालके बेपत्ता झाली. त्याचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (१६,८८१) आहे.

बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे निधन

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे ३० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता.
  • महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वात इतर सात भिक्खूंनी डॉ. आंबेडकरांना अशोक विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यात भिक्खू प्रज्ञानंद यांचा समावेश होता.
  • बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म १८ डिसेंबर १९२८ रोजी श्रीलंकेत झाला होता. १९४२मध्ये वयाच्या १३व्या वर्षी ते भारतात आले.
  • प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहत होते. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती. या बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भदन्ते होते.
  • त्यांनी लखनऊतील भारतीय बौद्ध समिती, श्रावस्ती बुद्ध विहार, भारतीय बौद्ध शिक्षण परिषद यांचे अध्यक्षपद तर रिसालदार पार्क बुद्धविहाराचे आजीवन अध्यक्षपद भूषवले होते.

दक्षिण किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ

  • भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळात तामिळनाडू आणि केरळमध्ये एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
  • पुढील २४ तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर या चक्रीवादळात झाले आहे. बांगलादेशने या वादळाला ‘ओखी’ असे नाव दिले आहे.
  • या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे सध्या ७० ते ८० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग १०० किमी प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा