अमेरिकास्थित मूडीज या संस्थेने भारताचे सार्वभौम ऋण मानांकन एका पायरीने वाढवून ‘बीएए२’ केले आहे.
मूडीजने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए३ वरुन बीएए२ असा बदल केला आहे.
आर्थिक व संस्थात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीची शक्यता अधिक चांगली झाली असल्याने मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे.
या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पतही सुधारणार आहे.
सुमारे १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात मूडीजकडून सुधारणा करण्यात आली आहे. याआधी २००४मध्ये मूडीजने भारताचे मानांकन सुधारून ‘बीएए३’ केले होते.
मूडीजने भारताचे मानांकन आता ‘बीएए२’ केले असले तरी हे मानांकन गुंतवणूक श्रेणीतील सर्वांत खालची पायरी आहे. याचाच अर्थ भारताला अजून खूप मजल मारावी लागणार आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी
महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
राज्यात सध्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल.
कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात येणार आहे.
नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ ते ६ महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
प्लास्टिक बंदीमुळे शीतपेय आणि पाण्याची बाटलीवर बंदी येणार आहे. अशा परिस्थितीत काचेचा बाटल्या हा पर्याय उपलब्ध असेल. तर प्लास्टिक पिशव्यांवरऐवजी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल.
महाराष्ट्र पर्यावरण मंत्री: रामदास कदम
हिंदी साहित्यिक कुंवर नारायण यांचे निधन
भारतीय साहित्यात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदीतील बुजुर्ग साहित्यिक कुंवर नारायण यांचे १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे १९ सप्टेंबर १९२७ रोजी कुंवर नारायण यांचा जन्म झाला. फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले.
बौद्ध समाजवादी नेता विद्वान आचार्य नरेंद्रदेव आणि गांधीवादी आचार्य कृपलानी यांचा कुंवर नारायण यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.
आचार्य कृपलानींबरोबर दिल्लीला त्यांच्या ‘निजिल’ या पत्रिकेच्या कामासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांची साहित्यिक आवड जोपासली गेली.
१९५६मध्ये त्यांचा ‘चक्रव्यूह’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते.
अज्ञेयजींच्या १९५९ मधील ‘तिसरा सप्तक’मध्ये कुंवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली.
पण १९६५ मध्ये ‘आत्मजयी’ हे दीर्घकाव्य सिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली.
परिवेश, हम तुम (१९६१), अपने सामने (१९७९), कोई दुसरा नहीं (१९९३), इन दिनो (२००२), हाशिये का गवाह हे त्यांचे इतर काव्यसंग्रहही प्रकाशित झाले.
त्यांनी कथा, समीक्षालेखन, चित्रपट, संगीत, कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे. खोल जीवनानुभव, विपुल अध्ययन, गंभीर चिंतन यामुळे त्यांचे साहित्य लक्षणीय बनले.
त्यांना हिंदुस्थानी पुरस्कार, प्रेमचंद पुरस्कार, पुणे पंडित पुरस्कार, व्यास सन्मान, साहित्य अकादमी, कबीर सन्मान, पद्मभूषण, वॉर्सा (पोलंड) विद्यापीठाचे सन्मानपदक असे अनेक सन्मान मिळाले.
इटलीमधील ‘प्रेमिओ फेरोनिया’ हा आंतरराष्ट्रीय लेखकाला दिला जाणारा सन्मान कुंवरजींच्या रूपाने प्रथमच एका भारतीय लेखकाला मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा