चालू घडामोडी : १४ नोव्हेंबर

भारताची अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत चर्चा

  • मनिला येथे सुरु असलेल्या आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची बैठक झाली.
  • यातून सामाईक हितसंबंध जपण्यासाठी सुरक्षा सहकार्य वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
  • ‘आसियान’ संघटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आसियान शिखर परिषदेला अनेक देशांचे प्रमुख मनिलामध्ये आले आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुलही येथे उपस्थित आहेत.
  • दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला.
  • हिंदी आणि प्रशांत महासागरातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा विचार करून सहकार्य करण्यावर या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
  • सर्व देशांचे दीर्घकालीन हितसंबंध जपण्यासाठी हा परिसर मुक्त आणि खुला असण्यावर सर्व देशांचे एकमत झाले.
  • तसेच दहशतवाद, शस्त्रास्त्रांची तस्करी यामुळे या भागाला धोका आहे, याचाही विचार करण्यात आला.
  • प्रशांत आणि हिंदी महासागरामध्ये चीनच्या लष्करी हालचाली वाढत आहेत. चीनची वाढती महत्त्वाकांक्षा त्यातून दिसत आहे.
  • या बैठकीमुळे चीन चिंतेत असून, आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना आहे.
  • राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चार देशांनी एकत्र येणे हा चीनसाठी एकप्रकारचा धोकाच आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लोकशाही प्रधान देश आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. 
  • या चार देशांबरोबरच्या व्यावसायिक, व्यापारी संबंधांमध्ये चीनचा जास्त फायदा आहे. हे चारही देश एकत्रितपणे व्यापार संतुलन साधण्यासाठी चीनवर दबाव आणू शकतात.
  • तसेच हे चारही देश चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणासमोर आव्हान निर्माण करु शकतात. वन बेल्ट, वन रोड ही शी जिनपिंग यांचे महत्वकांक्षी योजना आहे.
 आसियान 
  • ASEAN (आसियान) : Association of Southeast Asian Nations
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  • स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर  ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  • १९९५ साली व्हिएतनाम, १९९७ साली लाओस व  म्यानमार आणि १९९९ साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

पेस-राजा जोडीला नोक्साविले स्पर्धेचे जेतेपद

  • भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस याने पूरव राजाच्या सोबतीने जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्साविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
  • अंतिम सामन्यात पेस-राजा यांनी ७-६, ७-६ अशी बाजी मारत कारेतानी-पॅट्रिक जोडीवर मत केली. पेस-राजा या जोडीचे हे पहिलेच जेतेपद ठरले.
  • यंदाच्या मोसमात पेसने चौथे चॅलेंजर विजेतेपद पटकावले असून, त्याने लिओन व इकले येथे कॅनडाच्या आदिल शम्सुद्दिनसह, तर टालाहासी येथे अमेरिकेच्या स्कॉट लिपस्कीसह बाजी मारली होती.
  • राजानेही दिविज शरणसह खेळताना बोर्डो चॅलेंजर जिंकले होते. तसेच चेन्नई ओपन स्पर्धेतही त्याने शरणसह अंतिम फेरी गाठली होती.

पंकज आडवाणीला १७वे विश्वविजेतेपद

  • भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आयएसएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक रसेल याला पराभूत करत कारकिर्दीतील १७ वे विश्वविजेतेपद पटकावले.
  • आडवाणीने रसेलला ६-२ असे पराभूत केले. त्याने गेल्यावर्षी बंगळुरूतदेखील विजेतेपद पटाकावले होते.

मोदी यांची आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राला भेट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्स दौऱ्याच्या निमित्ताने लॉस बॅनॉस येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रास (आयआरआरआय) भेट दिली.
  • यावेळी भाताच्या दोन नवीन प्रजातींचे बियाणे संस्थेच्या जनुक पेढीस दिले. भाताच्या या दोन्ही प्रजाती भारतीय आहेत. 
  • मोदी यांच्या नावाने त्या संस्थेत भात संशोधन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. ‘श्री. नरेंद्र मोदी रिसालियंट राइस फील्ड लॅबोरेटरी’ या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले.
  • भारत सरकारने वाराणसीत आयआरआरआय या संस्थेचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • या संस्थेची १७ देशांत कार्यालये असून १९६०च्या हरित क्रांतीनंतर भाताच्या नवीन प्रजाती विकसित करण्यात या संस्थेने मोठी भूमिका पार पाडली आहे.

झिम्बाब्वेमध्ये राजकीय संकट

  • झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना तेथील लष्कराने ताब्यात घेत देशाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्यामुळे तेथे राजकीय संकट निर्माण झाले आहे.
  • गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी रक्त न सांडता हे सत्ता परिवर्तन करण्यात आले आहे, असे लष्कराचे म्हणणे आहे.
  • गेल्या आठवड्यात मुगाबे यांनी उपराष्ट्रपती इमर्सन मनागाग्वा यांना पदच्युत केले होते. इमर्सन हे मुगाबे यांचे राजकीय वारस मानले जात होते.
  • मात्र नंतर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबेचे नाव या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ लागले.
  • त्यामुळे ग्रेस मुगाबे आणि इमर्सन यांचे दोन गट सत्ताधारी झानू पीएफ पक्षात तयार झाले आणि तणावाला सुरुवात झाली होती.
  • रॉबर्ट मुगाबे १९८० ते १९८७ या सात वर्षांसाठी ते झिम्बाब्वेचे पंतप्रधान होते आणि १९८७पासून ते आतापर्यंत सलग तीस वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदावर आहे.
  • त्याचप्रमाणे अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही रॉबर्ट मुगाबे यांनी सांभाळलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा