भारताने स्वदेशी बनावटीची आणि दूरपर्यंत मारा करणारी ‘निर्भय’ या सुपर सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राच्या यापूर्वी झालेल्या ४ पैकी फक्त १ चाचणी यशस्वी झाली होती.
या क्षेपणास्त्राची १३ मार्च २०१३ रोजी पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी ती अयशस्वी ठरली होती. नंतर १७ मार्च २०१४ रोजी दुसरी चाचणी यशस्वी झाली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूरच्या चाचणी केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.
या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून २०० ते ३०० किलोग्रॅमपर्यंत युद्धसामग्री घेऊन जाता येणार आहे. १ हजार किलोमीटरपर्यंतच्या शत्रूंच्या ठिकाणांना हे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते.
या टू स्टेज क्षेपणास्त्राची लांबी ६ मीटर व रुंदी ०.५२ मीटर आहे. या क्षेपणास्त्राचे पंख २.७ मीटरपर्यंत पसरतात. या क्षेपणास्त्राचे वजन १५०० किलो असून, त्याचा वेग ०.६ ते ०.७ मॅक इतका आहे.
आण्विक क्षमतेने सुसज्ज अशा या क्षेपणास्त्रामध्ये लक्ष्य अचूक भेदण्यासाठी उच्च दर्जाची स्वदेशी दिशादर्शक प्रणाली असून ती आरसीआयने तयार केली आहे.
या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक संगणकीय प्रणालीही बसवण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणादरम्यान संगणकाच्या कमांडनुसार क्षेपणास्त्राचे पंख खुलतात.
हे क्षेपणास्त्र टबरेफॅन व टबरेजेट इंजिनसह चालते. क्षेपणास्त्राचे रॉकेट बूस्टर अॅडव्हान्सड सिस्टीम लॅबोरेटरी यांनी तयार केले आहे.
राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताला २० पदके
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतासाठी सत्येंद्र सिंगने सुवर्ण आणि संजीव राजपूतने रौप्यपदक जिंकून दिले.
सत्येंद्र सिंग आणि संजीव राजपूत या दोघांनीही पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकारात पदके मिळवली.
५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत सत्येंद्रने ४५४.२ गुण मिळवले. एका गुणाच्या फरकाने राजपूत (४५३.३ गुण) दुसऱ्या स्थानी राहिला.
या दोन पदकांसह भारताची या स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या २०वर गेली आहे. त्यात ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्यपदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील भारताचे सुवर्णपदक विजेते नेमबाज:-
हिना सिधू (महिला १० मीटर एअर पिस्तूल)
पूजा घाटकर (महिला १० मीटर एअर रायफल)
अंकुर मित्तल (डबल ट्रॅप)
शाहझार रिझवी (१० मीटर एअर पिस्तूल)
प्रकाश नंजप्पा (५० मीटर पिस्तूल)
सत्येंद्र सिंग (५० मीटर रायफल थ्री पोजिशन्स)
भारतामधील महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता
भारतामधील १५ ते ४९ वयोगटातील ५१ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याची माहिती ‘जागतिक पोषण आहार २०१७’ या अहवालातून समोर आले आहे.
गेल्यावर्षी याच अहवालानुसार, भारतात हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या महिलांचे प्रमाण ४८ टक्के होते. यंदा ते ३ टक्क्यांनी वाढून ५१ टक्के झाले आहे.
भारतासह १४० देशांमधील महिला आणि मुलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या आधारे, कुपोषणाच्या समस्येवर भाष्य करणारा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणात समाविष्ट असलेले तीन महत्वाचे मुद्दे म्हणजे
अविकसित आणि कुपोषित मुलांचे प्रमाण.
माता होण्याच्या काळात महिलांमध्ये दिसून येणारी रक्ताच्या कमतरतेची समस्या.
अधिक वजन असलेल्या वयोवृद्ध महिला.
मागील वर्षी मे महिन्यात जिनेव्हा येथे जागतिक आरोग्य सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या १४० देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
नुकताच ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या वॉशिंग्टनस्थित संस्थेद्वारा ‘जागतिक भूक अहवाल २०१७’ प्रकाशित झाला.
त्यातही ११९ देशांच्या क्रमवारीत भारताची क्रमवारी गेल्या तीन-चार वर्षांत लक्षणीयरित्या घसरली असून, भारत आता १००व्या स्थानावर गेला आहे.
या यादीमध्ये भारताचे शेजारी असणाऱ्या चीन (२९), नेपाळ (७२), म्यानमार (७७), श्रीलंका (८४), बांगलादेश (८८) या देशांची स्थिती भारताहून खूप चांगली आहे.
दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर
दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संस्थेकडून (आयएमए) राज्यात ‘सार्वजिक आरोग्य आणीबाणी’ लागू करण्यात आली.
‘आयएमए’ने दिल्लीतील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा बंद ठेवाव्यात, असेही ‘आयएमए’ने सांगितले आहे.
त्यामुळे दिल्लीतील १९ नोव्हेंबरची नियोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची विनंतीही ‘आयएमए’कडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आली आहे.
इंडिया गेट आणि राजपथसह दिल्लीतील प्रमुख ठिकाणी करण्यात आलेल्या पाहणीत येथील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा