चालू घडामोडी : ८ नोव्हेंबर
राष्ट्रीय स्पधेत सायना-प्रणॉयला विजेतेपद
- भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
- अंतिम फेरीत सायनाने पी व्ही सिंधूवर २१-१७, २७-२५ अशी मात करत आपल्या कारकिर्दीतले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. सिंधूनेही ही स्पर्धा दोनदा जिंकलेली आहे
- याच स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच. एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर मात करुन विजेतेपदावर आपले नाव कोरले. प्रणॉयचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिले विजेतेपद ठरले.
- या हंगामात ४ सुपर सीरिज स्पर्धांची विजेतेपदे पटकावणारा किदम्बी श्रीकांतला प्रणॉयने अंतिम फेरीत २१-१५, १६-२१, २१-७ अशी मात दिली.
- मागील ४ पैकी ३ लढतींत श्रीकांतने प्रणॉयला नमविले होते. यावेळी मात्र प्रणॉयने श्रीकांतपेक्षा सरस खेळ केला आणि त्याची सलग १३ सामन्यांची विजयी घोडदौड रोखली.
- अश्विनी पोनप्पाने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
- मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सात्विक साईराज व अश्विनी जोडीने प्रणव चोप्रा व एन सिक्की रेड्डी जोडीवर २१-९, २०-२२, २१-१७ अशी मात केली.
- यानंतर अश्विनीने महिला दुहेरीत एन सिक्की रेड्डीच्या साथीने खेळताना सात्विक साईराज व चिराग शेट्टी जोडीवर १५-२१, २२-२०, २५-२३ असा विजय मिळवला.
आशियाई स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक
- जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धेतील हे तिचे पाचवे सुवर्णपदक ठरले.
- आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील मेरी कोमचे पहिले सुवर्ण आहे. अंतिम सामन्यात तिने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले.
- यापूर्वी मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात २००३, २००५, २०१० आणि २०१३ असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर २००८मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
- मेरी कोमने २०१२च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळवले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्णपदकेही तिच्या नावावर जमा आहेत.
- महिलांच्या ५७ किलो गटात भारताच्या सोनिया लॅथरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत तिला चीनच्या यिन जुन्हाआकडून पराभव पत्करावा लागला.
- तर भारताच्या सीमा पुनिया, एल. सरिता देवी (६४ किलो), प्रियांका चौधरी (६० किलो), लोवलीना बोर्गोहेम (६९ किलो) आणि शिक्षा (५४ किलो) या महिला खेळाडूंना कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
- या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ ब्राँझपदकांची कमाई केली.
ब्लू फ्लॅग लष्करी सरावामध्ये भारताचा सहभाग
- इस्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्रायली वायूदलाने आयोजित केलेल्या ‘ब्लू फ्लॅग’ या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे.
- हा सराव ११ दिवस चालणार असून, इस्रायलच्या वायूदलाच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा युद्धसराव आहे.
- या सरावामध्ये अमेरिका, ग्रीस, पोलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत आणि इस्रायलचा समावेश आहे. (इस्रायलच्या संरक्षण दलांनी एका सहभागी देशाचे नाव जाहीर केलेले नाही.)
- या सरावामध्ये भारताने आपल्या वायूदलातील सी-१३० जे हे ट्रान्सपोर्ट विमान पाठवले असून इतर देशांनी फायटर जेट, ट्रान्सपोर्ट विमाने तसेच इंधन भरणारी विमाने पाठविली आहेत.
- या सरावामध्ये १००० लोक सहभागी झाले असून त्यामध्ये वैमानिक, कमांडर्स तसेच तांत्रिक विभागात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
- ब्लू फ्लॅगचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ असून सर्वात पहिल्यांदा हा सराव २०१३ साली झाला होता.
- दर २ वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या सरावामध्ये भारत प्रथमच सहभागी होत आहे.
- या सरावामधून तांत्रिक प्रगतीची देवणघेवाण आणि मुत्सद्दी पातळीवरील संबंध सुधारावेत हा मूळ हेतू आहे.
होबोकेन शहराच्या महापौरपदी रवी भल्ला
- अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे.
- महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा