चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर
मधुकर नेराळे यांना जीवन गौरव पुरस्कार
- राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार मधुकर पांडुरंग नेराळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
- तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रूपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- मधुकर पांडुरंग नेराळे यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली.
- मधुकर नेराळेंनी सुरूवातीच्या काळात पंडित राजारामजी शुक्ला यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले.
- त्यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर १९६५ पासून १९९४पर्यंत होते. १९६९साली स्वत:चे जसराज थिएटर स्थापन केले.
- या संस्थेमार्फत त्यांनी गाढवाचं लग्न, आतून किर्तन वरुन तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदे गं अंबे उदे, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र, काजळी यासारख्या वगनाटयांचे सादरीकरण करून भूमिका केल्या.
- त्यांनी मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले.
- मधुकर नेराळे आणि मंडळी या कलापथकांने अनेक आकाशवाणी केंद्रावर व प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांनी कार्यक्रम सादर केले.
- १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात त्यांनी लोककलेचे कार्यक्रम सादर केले.
- १९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
- मुंबई लक्षद्विप दैनिक परिवार तर्फे समाज भूषण पुरस्कार, दुरदर्शन मुंबई तर्फे कलारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
- त्यांच्या तमाशा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकारने जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
- अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा २९ नोव्हेंबर रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले.
- या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो.
- उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
- याआधी १५ सप्टेंबरला उत्तर कोरियाने शेवटची क्षेपणास्त्र चाचणी केली होती. यानंतर दोन महिने या भागात शांतता निर्माण झाली होती. मात्र उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण पसरले आहे.
- जगातील कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती सध्या उत्तर कोरियाकडून सुरु आहे.
- जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी उत्तर कोरियाचे हे कृत्य हिंसक असल्याचे म्हटले असून, त्यांनी याप्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा