चालू घडामोडी : २२ नोव्हेंबर
ब्राह्मोसची सुखोई विमानावरुन यशस्वी चाचणी
- भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची २२ नोव्हेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.
- आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा असा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
- सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. अशा आणखी दोन चाचण्या घेण्याचा भारताचा मानस आहे.
- जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून सोडता येऊ शकणारे ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र ठरले आहे.
- ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २.५ टन आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे.
- भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) व रशियाची ‘एनपीएमओ’ कंपनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राचे उत्पादन करते.
- हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या भेदू शकते. याशिवाय जमिनीखालील बंकर्स उद्धस्त करण्याची क्षमताही या क्षेपणास्त्रात आहे.
- ते लढाऊ विमानावर बसवून वाहून नेता यावे यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सने (एचएएल) त्यात सुयोग्य बदल केले.
- जून २०१६मध्ये भारत ३४ देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.
- त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या ४५० किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना
- मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे.
- केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. २०१७मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
- गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली.
- मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही.
- अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.
- अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू करण्यात आली आहे.
- अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.
झिम्बाब्वेतील मुगाबे यांची राजवट संपुष्टात
- झिम्बाब्वेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी अखेर २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
- त्यामुळे १९८०साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरू झालेली ३७ वर्षांची मुगाबे यांची राजवट संपुष्टात आली आहे.
- जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले शासक व ‘ग्रँड ओल्ड मॅन ऑफ आफ्रिकन पॉलिटिक्स’ म्हणून ओळखले जाणारे मुगाबे नेमके कुठे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.
- गेले आठवडाभर देशात त्यांच्याविरुद्ध उठाव सुरु असताना मुगाबे लष्कराच्या नजरकैदेत राहून सत्तेला चिकटून बसले होते.
- उपराष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मानान्गावा यांना मुगाबे यांनी अचानक पदच्यूत केल्यापासून झिम्बाब्वेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
- मुगाबे यांची पत्नी ग्रेस या अध्यक्षपद मिळवण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र मानान्गावा यांना लष्कर, राजकीय नेते आणि सामान्य जनतेतून मोठा पाठिंबा होता.
- यामुळे सत्ताधारी झानु-पीएफ पक्षाने मुगाबे यांना पक्षाध्यक्ष पदावरून दूर करून राष्ट्राध्यक्ष पदावरून स्वत:हून पायउतार होण्याची विनंती केली होती.
- परंतु ती झुगारत मुगाबे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत राष्ट्राला उद्देशून भाषण कले व त्यात सत्ता न सोडण्याचे संकेत दिले.
- त्यामुळे झानु-पीफ पक्षाने दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरु केली होती. परंतु ती पूर्ण होण्याआधीच मुगाबे यांनी आपला राजीनामा सादर केला.
- आठवडाभराच्या या उलथापालथीनंतर ‘क्रोकोडाइल’ म्हणून ओळखले जाणारे इमॅन्युअल मानान्गावा झिम्बाब्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा