पनामानंतर ‘पॅराडाइज पेपर्स’ घोटाळा
- १८ महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा करणाऱ्या जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राने काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केला आहे.
- ९६ मीडिया ऑर्गनायजेशनच्या मदतीने इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आयसीआयजे) पॅराडाइज पेपर्स नावाचे दस्ताऐवज उजेडात आणले आहेत.
- पॅराडाइज पेपर्समध्ये १.३४ कोटी दस्तऐवजांचा समावेश असून, बर्म्युडामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत.
- काही बोगस कंपन्या आणि फर्म जगभरातील श्रीमंतांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करत असल्याचे या घोटाळ्यातून उघड झाले आहे.
- जगभरातील १८० देशांचा या घोटाळ्यात समावेश असून, या यादीत भारत १९व्या क्रमांकावर आहे.
- या घोटाळ्यात अभिनेते, राजकारणी आणि उद्योगपती अशा ७१४ भारतीयांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.
- नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे.
- या घोटाळ्यात जागतिक पातळीवर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो, इंग्लंडची राणी एलिझाबेथ-२ यांचेही नाव आहे.
- पनामा पेपर्सची चौकशी करण्यासाठी एप्रिल २०१६मध्ये स्थापन करण्यात आलेला ‘मल्टी एजंसी ग्रुप’ पॅराडाइज पेपर्स प्रकरणाची चौकशी करणार आहे.
- मल्टी एजन्सी ग्रुपमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डारयेक्टर टॅक्सेस (सीबीडीटी), प्राप्तिकर विभाग, ईडी, फायनँशियल इंटेलिजन्स युनिट आणि आरबीआय यांच्यासह अन्य काही संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
- हा ग्रुप पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आलेल्या त्या ७१४ व्यक्ती आणि संस्थ्यांच्या प्राप्तिकर परताव्यांचा तपास करेल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- या धक्कादायक गौप्यस्फोटांनंतर बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीनेही पॅराडाइज पेपर्स प्रकरणी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
- सेबी विविध सुचीबद्ध कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांद्वारे निधीची झालेली कथित हेराफेरी आणि कंपनी संचालनामधील उणिवांचा तापास करणार आहे.
पॅराडाईज पेपर नक्की आहे काय?
- १ कोटी ३४ लाख कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जगभरातील कंपन्या आणि व्यक्तींचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले.
- यामधील बहुतांश कागदपत्रे बर्म्युडामधील कायदेशीर सेवा पुरवणारी कंपनी अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी ट्रस्टशी संबंधित आहेत.
- अॅपलबाय आणि एशियासिटीकडून अनेक कंपन्या आणि श्रीमंत व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो.
- कर चुकवेगिरी करुन हा पैसा परदेशात वळवला जात असल्याने त्यासाठी ‘टॅक्स पॅराडाईज’ हा शब्द वापरला जातो.
- त्यामुळेच या आर्थिक गैरव्यवहाराला ‘पॅराडाईज पेपर्स’ असे नाव देण्यात आले आहे.
कोणी केला तपास?
- जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणाचा तपास झाला.
- या वर्तमानपत्राने त्यांच्याकडे असणारी माहिती इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसोबत (आयसीआयजे) शेअर केली.
- ‘पॅराडाईज पेपर्स’चे भारतीय कनेक्शन उजेडात आणण्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’ने महत्त्वाची भूमिका बजावली.
‘पॅराडाईज पेपर्स’मधून काय उघडकीस आले?
- भारतातील बलाढ्य कंपन्या आणि बड्या व्यक्तींची नावे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आली आहेत.
- देशात कर न भरता तो पैसा परदेशातील बोगस कंपन्यांमध्ये कसा गुंतवला जातो, हे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून समोर आले.
- विशेष म्हणजे भारतीय कंपन्या आणि व्यक्तींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी परदेशात स्थापन करण्यात आलेल्या बोगस कंपन्या भारतातून नियंत्रित केल्या जात असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून दिसून आले.
कसे व्हायचे आर्थिक गैरव्यवहार?
- बर्म्युडातील अॅपलबाय कंपनी भारतासह जगभरातील अनेकांचा करचोरीतून आलेला पैसा हाताळत असल्याचे उघडकीस आले आहे.
- ही कंपनी भारतातून बाहेर जाणारा काळा पैसा परदेशांमधील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवत असल्याचे तपासातून समोर आले.
- धक्कादायक बाब म्हणजे भारतातून निर्माण होणारा हा काळा पैसा परदेशातील कंपन्यांमध्ये गुंतवल्यावर तो पुन्हा भारतीय कंपन्यांमध्ये वळवला जात असे.
भारताला काय तोटा झाला?
- परदेशातील बोगस कंपन्यांनी कर्जाची उभारणी केल्यावर त्यांच्याकडून हमी देण्यासाठी भारतीय कंपन्यांच्या मालमत्तांचा वापर केला जात होता.
- विशेष म्हणजे भारतातील नियामकांना याची कोणतीही माहिती न देता ही प्रक्रिया पार पाडली जात होती.
- यासोबतच परदेशातील बोगस कंपन्यांची मालकी बदलण्याचा अर्थ या कंपनीतील भारतीय कंपनीच्या समभागांची मालकी बदलणे असा असतानाही त्याबद्दल भारत सरकारला कोणताही कर दिला गेला नाही.
जगातील सगळ्यात मोठे विमानतळ चीनमध्ये
- जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येणार आहे.
- या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. ५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युबिक मीटर्स काँक्रिट त्यासाठी वापरण्यात आले आहे.
- विमानतळाचा आकार अतिप्रचंड आकाराच्या फुलासारखा असून, ते दक्षिण डॅक्सिंग जिल्ह्यात आहे.
- हे विमानतळ चायना सदर्न एअरलाइन्स आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानांसाठी तळ म्हणून वापरले जाईल. येथे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणेही हाताळली जातील.
- या विमानतळाची क्षमता जास्तीतजास्त १०० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७२ दशलक्ष प्रवाशांना तेथे सेवा मिळेल.
सौदी अरेबियात भ्रष्टाचारविरोधी मोहिम
- सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे.
- अटक झालेल्यांमध्ये ट्विटर, अॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे.
- राजपुत्र सलमान यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर मोहीम राबविण्याचे आदेश दिले असून त्यासाठी एका विशेष भ्रष्टाचारविरोधी आयोगाची नेमणूक केली आहे.
- या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे (क्राउन प्रिंस) मोहम्मद बिन सलमान हे स्वत: आहेत.
- सार्वजनिक मालमत्ता वाचविणे, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासन करणे हे आयोगाचे लक्ष्य आहे.
- या आयोगाने केलेल्या कारवाईत सुमारे ११ राजपुत्रांना, ४ विद्यमान मंत्र्यांना, अनेक माजी मंत्र्यांना तसेच अब्जोपती उद्योजकांना ताब्यात घेण्यात आले.
- सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे.
- या संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांची खासगी विमानेही जप्त करण्यात आली आहेत.
- या आयोगाने भ्रष्टाचाराच्या जुन्या प्रकरणांची चौकशी सुरू केली असून, या मोहिमेमुळे सौदीमध्ये खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा