चालू घडामोडी : १ जुलै

आधार कार्डच्या व्हर्च्युअल आयडीची अंमलबजावणी सुरु

  • आधार कार्डचे तपशील सुरक्षित करण्यासाठी एप्रिलमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल आयडी’ची (व्हीआयडी) अंमलबजावणी १ जुलै सुरू झाली आहे.
  • व्हीआयडी हा १६ अंकी क्रमांक असून, आधार क्रमांकाऐवजी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे.
  • व्हीआयडीची अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना अंतर्गत व्यवस्था बदलण्याची सूचना केली होती. ही व्यवस्था बदलण्याची अंतिम मुदत ३० जून २०१८ होती.
  • बँकांशिवाय अन्य सेवा पुरवठादारांनाही आपल्या व्यवस्थेत बदल करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
  • व्हीआयडीची निर्मिती केल्यानंतर संबंधिताला आपला आधार कार्ड किंवा क्रमांक कोणत्याही त्रयस्थाला देण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे आधार कार्डचे तपशील गुप्त राहणे शक्य होणार आहे.
  • दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला व्हीआयडीचा फायदा होणार आहे.
  • याचा उपयोग बँकेत खाते उघडणे, सरकारी अनुदान प्राप्त करणे, तत्काळ पासपोर्ट तयार करणे आणि नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी करता येणार आहे.
  • १६ अंकी व्हीआयडी कम्प्युटरच्या मदतीने तयार करण्यात येतो. त्यामुळे तो गरजेप्रमाणे कधीही तयार करता येतो.
  • व्हीआयडी कितीही वेळा तयार करता येणार आहे. हा क्रमांक मर्यादित वेळेपुरताच वैध ठरणार आहे. त्यामुळे त्याचा गैरवापर करणे जवळपास अशक्य आहे.
  • तसेच, काम झाल्यानंतर हा व्हीआयडी आपोआप नाहीसा होणार आहे. यामुळे कोणतीही यंत्रणा संबंधिताचे आधार कार्डवरील गोपनीय तपशील पाहू अथवा त्याचा गैरवापर करू शकणार नाही. जेवढी माहिती आवश्यक आहे, तेवढीच संबंधिताला मिळणार आहे.
  • कोणाही व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे या हेतूने व्हीआयडीची निर्मिती हे उचललेले पहिले पाऊल आहे.
  • बँका व अन्य सेवांसाठी ही सुविधा ३१ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. सेवा कंपन्यांनी व्हीआयडीचा वापर ३१ जुलैपासूनच सुरु केला तर त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी आकारण्यात येणारा २० पैसे दंड भरावा लागणार नाही.
  • बँका व प्राप्तीकर खात्याला एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याची मुभा आहे. अन्य सेवा देणाऱ्या कंपन्यांना मात्र आधारमधील नाव, पत्ता व छायाचित्र इतकीच माहिती मिळेल.
  • आधारमधील माहिती सार्वत्रिक होऊ नये यासाठी आता संबंधित व्यक्तिची चेहऱ्यावरुन ओळख पटविण्याचे तंत्रही यूआयडीएआयने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा देशात सर्वत्र येत्या ऑगस्टपासून उपलब्ध होईल.
  • यूआयडीएआय : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपद

  • नेदरलँडच्या ब्रेडा शहरात सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत करत या स्पर्धेचे जेतेपद मिळविले. भारताला मात्र सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • ऑस्ट्रेलियाचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे १५वे विजेतेपद ठरले. भारताला मात्र इतिहासात एकदाही या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
  • निर्धारित वेळेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटने ठरला, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-१ अशी मात केली.
  • २०१६मध्ये लंडन येथे झालेल्या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारतावर पेनल्टी शूटआउटमध्ये मात केली होती.
  • चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे यंदाचे अखेरचे वर्ष होते, त्यामुळे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे भारतासाठी महत्वाचे होते.

टी. एम. विजय भास्कर कर्नाटकचे मुख्य सचिव

  • कर्नाटक सरकारने १९८३च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी टी. एम. विजय भास्कर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे.
  • सध्या ते अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहात आहेत. निवृत्त झालेले सध्याचे सचिव के. रत्नप्रभा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे केंद्राने मार्चमध्ये रत्नप्रभा यांना मुख्य सचिव म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
  • राज्य सरकारने त्यांना अजून तीन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती, मात्र ती फेटाळून लावण्यात आली.

व्यापार युद्धाची व्याप्ती वाढली

  • अमेरिकेने आयात कर वाढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आता कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर आयात कर लादला आहे.
  • अमेरिकेने जूनमध्ये कॅनडाच्या १२.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोलाद व ॲल्युमिनियमवर अनुक्रमे २५ व १० टक्के आयात कर वाढवला होता.
  • त्यामुळे कॅनडानेही अमेरिकेच्या २५० वस्तूंवर कर वाढवला असून त्यात फ्लोरिडा ज्यूस, विस्कॉन्सिन टॉयलेट पेपर, नॉर्थ कॅरोलिना घेरकिन्स यांचा समावेश आहे.
  • अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशात जशास तसे वागणे सुरू असून, त्यामुळे दोन्ही देशातील वातावरणही तापले आहे.

हरमीत सिंग पाकिस्तानमधील पहिले शीख वृत्तनिवेदक

  • हरमीत सिंग पाकिस्तानमधील पहिले शीख वृत्तनिवेदक ठरले आहेत. पब्लिक न्यूज या वाहिनीवर ते वृत्तनिवेदक म्हणून रुजू झाले आहेत.
  • हरमित सिंग हे खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चाकस्कर शहराचे रहिवाशी आहेत. सिंग यांनी फेडरल उर्दू विद्यापीठातून पत्रकारितेची पदवीव्युत्तोर पदवी घेतली आहे.
  • काही दिवसांपूर्वी मानमीत कौर या पहिल्या शीख पत्रकार म्हणून पाकिस्तानमध्ये कार्यरत झाल्या आहेत.

1 टिप्पणी: