भारतीय वेगवान धावपटू हिमा दास (वय १८ वर्षे) हिने आयएएएफ वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय अॅथलेट ठरली आहे. हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिले स्थान मिळविले.
हिमाने गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थान मिळविले होते.
आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने याच वर्षी आंतरराज्यीय स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
यापूर्वी २०१६मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. पण ट्रॅक प्रकारात सुवर्ण जिंकणारी हिमा ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअनशीपमध्ये यापूर्वी भारतासाठी थाळीफेकपटू सीमा पूनिया २००२मधील कांस्य आणि थाळीफेकपटू नवजीतकौर ढिल्लनने २०१४मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
हिमाच्या आधी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केलेली होती.
पीटी उषाने १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानापर्यंत मुसंडी मारली होती.
मिल्खा सिंहने १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. या दोघांव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला पदकाजवळ जाता आलेले नाही.
ईझ ऑफ डुइंग बिझनेसमध्ये आंध्रप्रदेश सर्वोत्तम
व्यवसाय व उद्योगधंदे करण्यासाठी (ईझ ऑफ डुइंग बिझनेस)सलग दुसऱ्या वर्षीआंध्रप्रदेश हे देशातील सर्वात अनुकूल राज्य ठरले आहे.
केंद्र सरकारचा औद्योगिक धोरण विभाग आणि जागतिक बँकेतर्फे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठीची जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसायसुलभ (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) मानांकन सूचीची ही तिसरी आवृत्ती आहे.
या सूचीमध्ये आंध्रच्या पाठोपाठ तेलंगणा दुसऱ्या व हरियाणा तिसऱ्या स्थानी आहे. तर मेघालय या यादीत अखेरच्या म्हणजेच ३६व्या स्थानी आहे
औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश तर नंतर ओडिशाचा क्रमांक लागतो.
२०१६मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात आंध्रप्रदेश व तेलंगणने संयुक्तपणे पहिले मानांकन मिळविले होते.
आपल्या राज्यांत अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी सर्व राज्यांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे मानांकन जाहीर केले जाते.
केंद्र सरकारचा औद्योगिक धोरण विभाग आणि जागतिक बँकेतर्फे प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील स्थितीचा आढावा घेतला जातो.
देशातील राज्यांनी व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीने काय कृती करायला हवी यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ३७२ मुद्दे सुचविले होते.
बांधकाम परवाने, कामगार नियमन, पर्यावरणविषयक परवानगी, जमिनीची उपलब्धता, माहितीची उपलब्धता, एक खिडकी योजना आदी निकषांचा यात समावेश होता.
व्यवसाय सुलभतेसाठी सुचविण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये बहुतांश राज्यांनी चांगली प्रगती केली आहे. एकूण १७ राज्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई केली आहे.
जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. १९० देशांमध्ये भारत १००व्या स्थानी आहे. या सूचीत पहिल्या ५० देशांमध्ये स्थान मिळविण्याचे उद्दिष्ट सरकारने आखले आहे.
या सूचीतील पहिली दहा राज्ये : आंध्र प्रदेश, तेलंगण, हरियाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बंगाल
अन्य वैशिष्ट्ये :
मालमत्तेच्या नोंदणीमध्ये छत्तीसगड अव्वल.
कामगार नियमनाच्या निकषात बंगालची कामगिरी सर्वोत्तम.
पर्यावरणविषयक नोंदणी व परवान्यांत कर्नाटक अव्वल.
जमिनीच्या उपलब्धतेत उत्तराखंड सरस.
बांधकाम परवाने देण्यात राजस्थान आघाडीवर.
आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी उत्तर प्रदेश सर्वोत्तम.
भारतातील २.३ कोटी मुले बालकामगार : क्राय
चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या सामाजिक संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत.
२०१५-१६च्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि २०१६चा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवातील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अहवालातील ठळक बाबी :
भारतात १५ ते १८ वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत. यापैकी १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे.
भारतामध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९२ लाख मुलामुलींचे विवाह झाले असून त्यातील २४ लाख मुली या माता बनल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले असून अपहरण झालेल्या मुलींमधील ६० टक्के मुली १५ ते १८ वयोगटातील आहेत.
तर २५ टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या १५ ते १८ वयोगटातील आहेत.
विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडण्याचे प्रमाण पाहता शिक्षणाच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याची गरज आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षणही मोफत देण्याची गरज या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर
२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सवलती असलेले धोरण जाहीर केले आहे.
यामध्ये वृद्धांची वयाची अट ६५ ऐवजी ६० केली जाणार आहे. मालमत्ता करासह अनेक करांत सवलती आणि विविध योजनांचा लाभही वृद्धांना देण्यात येणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या धोरणाचा पहिला भाग जाहीर केला असून, दुसऱ्या भागात आर्थिक सवलतींचा विचार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यासाठी एक समिती स्थापण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच येईल, त्यानंतर या धोरणाचा हा दुसरा भाग जाहीर केला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सवलती आणि अन्य सेवासुविधांसाठी वर्षाला अंदाजे १००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
बालरंगभूमीचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन
बालरंगभूमीचे जनक म्हणून ओळख असणारे जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास शिदंगी यांचे ११ जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.
बालरंगभूमीवरचे त्यांचे योगदान बघून नाटककार केशवराव दाते यांनी त्यांना ‘बालरंगभूमीचे जनक’ अशी उपाधी दिली होती.
शिंदगी यांनी अनेक कथा, कविता संग्रह, गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत.
श्रीनिवास शिंदगी यांनी २० नाटके लिहिली त्यापैकी १५ बालनाट्य आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे.
त्यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक नाटक गाजली आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेक जण पुढे कलाकार दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक झाले.
पुंगीवाला हे अजरामर बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणार पाहिले बालनाट्य आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केले होते.
मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्डच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनी ‘दहा लाखाचा धनी’ या नाटकाच्या वेळी केला.
त्यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारा वतन, वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार केला.
सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘भूमिपुत्रांचे वनपूजन’ हे संगीतमय बालनाट्य त्यांनी लिहिले. या बालनाट्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष वाड:मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला.
नटवर्य केशवराव दाते यांच्या प्रेरणेने त्यांनी सांगली येथे आद्य बाल रंगभूमीची स्थापना केली.
श्रीनिवास शिंदगी यांच्या कार्याची दखल घेऊन ‘झी २४ तास’ने २०१५साली त्यांना अनन्य सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा