चालू घडामोडी : ४ जुलै

राज्य सरकारकडून लवकरच ३६ हजार पदांसाठी महाभरती

 • राज्य शासनाच्या विविध विभागांतील तसेच निमशासकीय कार्यालयांतील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • गट ब (अराजपत्रित) आणि गट क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समित्यांच्या समन्वयातून एकाच दिवशी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याने, सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्याचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे या जागा भराव्यात अशी कर्मचारी व अधिकारी संघटनांची मागणी आहे.
 • त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्त जागांपैकी ७२ हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी पूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळे स्थापन करण्यात आली होती.
 • आता या मंडळांच्या कक्षेतील ही पदे भरण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, प्रादेशिक स्तरावर प्रादेशिक विभाग प्रमुख आणि राज्यस्तरावर विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली निवड समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
 • माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेला महापरीक्षा कक्ष पदभरतीच्या परीक्षांचे आयोजन करणार आहे.
 • या महाभरतीची जाहिरात ३१ जुलैपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून भरती प्रक्रिया सुरु होईल.
 • यापुढे राज्य शासनाचे सर्व विभाग, कार्यालये, शासनाची सार्वजनिक उपक्रमे, मंडळे, महामंडळे, संचालनालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरतीच्या परीक्षा या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ

 • पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नरेंद्र मोदी यांनी २०१४साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे.
 • सरकारने २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) दीडपटीने वाढ जाहीर केली आहे. तर धानाच्या हमीभावात प्रति क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे.
 • हमी भाव वाढवल्याने सरकारवर १२,००० कोटी रूपयांचा भार पडणार आहे. तर कर्जबाजारीपणा, नापिकीने होरपळलेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळेल.
 • गेल्या दहा वर्षातील पिकांच्या हमीभावातील ही पहिलीच एवढी मोठी वाढ आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
 • यापूर्वी धानाच्या एमएसपीत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षी क्विंटलला ५० रुपये वाढ, २०१६-१७मध्ये ६० रुपये तर २०१७-१८मध्ये ८० रुपये वाढ देण्यात आली होती.

उत्तराखंड न्यायालयाकडून पशू, पक्ष्यांना कायदेशीर व्यक्तीचा दर्जा

 • उत्तराखंड उच्च न्यायालयाने हवा, पाणी आणि जमिनीवर राहणारे विविध पशू, पक्षी आणि जलचर प्रजातींना कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे.
 • सजीव माणसाप्रमाणेच त्यांना सर्व अधिकार असतील असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने उत्तराखंडच्या नागरिकांना या प्राणीमात्रांचे संरक्षक व पालक म्हणून घोषित केले आहे.

मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना अटक

 • मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना पदाचा गैरवापर आणि राज्य विकास निधी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 • नजीब यांनी १ मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (१एमडीबी) या निधीत २००९मध्ये ७० कोटी डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
 • मलेशियाचे सध्याचे ९२ वर्षीय पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मे २०१८मध्ये नजीब यांचा निवडणुकीत पराभव केला होता. तेव्हापासूनच त्यांच्याविरोधात चौकशीचे सत्र सुरू झाले होते.
 • या आरोपांमुळे रजाक यांना २० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच त्यांना जामिनासाठी १० लाख मलेशियन रिंगिट द्यावे लागणार आहेत.

शोएब मलिकच्या टी-२०मध्ये २००० धावा

 • पाकिस्तानचा ज्येष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिक टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.
 • भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात शोएबने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा पल्ला त्याने ९९ सामन्यांमधील ९२ डावांमध्ये पूर्ण केला आहे.
 • झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या तिरंगी मालिकेदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणाराही शोएब मलिक हा जगातील पहिला खेळाडूठरला आहे.
 • ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर हा १०० एकदिवसीय सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. तर इंग्लंडचा कॉलिन काऊड्री हा १०० कसोटी सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता.
 • आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
  • मार्टिन गप्टील (न्यूझीलंड) : २२७१ धावा
  • ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) : २१४० धावा
  • शोएब मलिक (पाकिस्तान) : २०२६ धावा
  • विराट कोहली (भारत) : १९९२ धावा
  • रोहित शर्मा (भारत) : १९४९ धावा

1 टिप्पणी: