सरकारने जाहीर केलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या (उद्योगस्नेही वातावरण) आकडेवारीनुसार, आंध्रप्रदेश हे राज्य सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य ठरले आहे.
आंध्रप्रदेश खालोखाल तेलंगणा राज्य दुसऱ्या स्थानी आहे. तर मेघालय या यादीत अखेरच्या म्हणजेच ३६व्या स्थानी आहे. २०१६मध्येही आंध्रप्रदेश आणि तेलंगणा हे दोन्ही राज्ये अग्रस्थानी होती.
आंध्रप्रदेश व तेलंगणानंतर हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.
औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश तर नंतर ओडिशाचा क्रमांक लागतो.
बिझिनेस रिफॉर्म एक्शन प्लॅन (बीआरएपी) अंतर्गत उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीची ही तिसरी आवृत्ती आहे.
पहिल्या वर्षी क्रमवारीत केवळ ७ राज्यांनीच सरकारने सुचवलेल्या ५० टक्के सूचना लागू केल्या होत्या. दुसऱ्यांदा १८ राज्यांनी तर यंदा २१ राज्यांनी या सूचना लागू केल्या.
गेल्या अर्थसंकल्पात सरकारने राज्यांनी पूर्ण करायचे ३७२ कृती बिंदू निश्चित केले होते. त्यात बांधकाम परवाना, पर्यावरण नोंदणी, जमीन उपलब्धता आणि एक खिडकी प्रणालीमधील नियमन इत्यादी घटकांचा समावेश होता.
गुंतवणूदारांना आकर्षित करणे आणि व्यवसाय व व्यापारासाठीचे वातावरण सुधारण्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा वाढविणे हा सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे.
राज्यातील सरकारे हे इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत अनेक प्रक्रियांऐवजी एक खिडकी पद्धतीवर काम करत आहेत.
जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. १९० देशांमध्ये भारत १००व्या स्थानी आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो रियाल माद्रिदमधून बाहेर
पोर्तुगालचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्पॅनिश क्लब रियाल माद्रिदमधून बाहेर पडत इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
२००९साली रोनाल्डो रियाल माद्रिद संघात दाखल झाला होता. रोनाल्डोने गेल्या नऊ वर्षात रियाल माद्रिदसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
रोनाल्डो हा रियाल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू आहे. या क्लबकडून खेळताना त्याने ४३८ सामन्यांमध्ये ४५१ गोल केले आहेत.
माद्रिद क्लबला त्याने ४ युएफा चॅम्पियन्स लीग, ३ क्लब वर्ल्ड कप, २ ला लीगा, २ कोपा डेल रे, २ स्पॅनिश सुपर कप आणि २ युएफा सुपर कपची जेतेपदे पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
याशिवाय रोनाल्डोने चारवेळा बॅलन डीओर पुरस्कार तर तीनवेळा गोल्डन बूट जिंकण्याचा मानही मिळवला आहे.
समलैंगिकता गुन्हा की अधिकार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
समलैंगिकता हे कायद्यान्वये गुन्हा असलेल्या आयपीसीच्या ३७७ कलमास घटनाबाह्य ठरविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. नरीमन, न्या. एम. खानविलकर, न्या. वाय. व्ही. चंद्रचूड आणि न्या. इंदु मल्होत्रा यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.
२००९मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने, एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत आपीसीच्या कलम ३७७ अन्वये समलैंगिक संबंधास अवैध ठरवले.
अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश
युएस न्यूज अँड वर्ल्डने जगातील सर्वात शक्तिशाली २५ देशांची यादी जाहीर केली असून, या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे.
या यादीत रशिया दुसऱ्या व चीन तिसऱ्या स्थानावर असून, भारताचा १५वा क्रमांक आहे. या यादीत पाकिस्तानला २२वे स्थान मिळाले आहे.
संबंधित देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या देशावर या देशाचा पडणारा प्रभाव, लष्कर आणि नेतृत्वाच्या आधारावर हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
युएस न्यूज अँड वर्ल्ड ही संस्था जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर दरवर्षी जगातील २५ शक्तिशाली देशांची यादी अहवालाद्वारे सादर करते.
अमेरिका व रशियाची अर्थव्यवस्था अत्यंत प्रभावी असून त्यांच्याकडे मोठी लष्कर यंत्रणा आहे. रशियाकडून लष्करावर सर्वाधिक खर्च करण्यात येतो.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासमोर वाढती लोकसंख्या व गरिबी या मोठ्या समस्या आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा