चालू घडामोडी : ३ जुलै
आंद्रेस इनिएस्टा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त
- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत स्पेनच्या आंद्रेस इनिएस्टाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- इनिएस्टा हा आपल्या सहकाऱ्यांना पास देण्याबाबत तसेच मधल्या फळीत समन्वय साधण्याबाबत चतुरस्र खेळाडू मानला जातो.
- मात्र रशियाविरुद्धच्या झालेल्या सामन्यात त्याला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. पूर्ण सामन्यात स्पेनला केवळ एकच गोल नोंदवता आला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनने हा सामना गमावला.
- इनिएस्टाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते.
- स्पेन फुटबॉल संघातील सर्वात यशस्वी मिडफिल्डरपैकी एक असलेल्या आंद्रेस इनिएस्टाने १३१ सामन्यांत स्पेनचे प्रतिनिधित्व केले आहे.
- बार्सिलोना क्लबच्या या माजी खेळाडूने २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत केलेल्या अप्रतिम गोलमुळेच स्पेनला विश्वचषक जिंकता आला होता.
- तसेच २००८ व २०१२च्या युरोपियन स्पर्धेतही त्याच्याच कामगिरीच्या जोरावर स्पेनला विजेतेपद मिळाले होते.
- पास देण्यातील अचूकता आणि चाली रचण्यातील कौशल्य यांमुळे इनिएस्टा बऱ्याच वर्षांपासून स्पेनच्या फुटबॉल संघातील एक महत्त्वाचा खेळाडू होता.
प्रीती तनेजा यांच्या पुस्तकाला डेस्मंड एलियट पुरस्कार
- भारतीय वंशाच्या तरुण लेखिका प्रीती तनेजा यांच्या ‘वुइ दॅट आर यंग’ या पुस्तकाला डेस्मंड एलियट पुरस्कार मिळाला आहे.
- कोणत्याही लेखकाच्या पहिल्या इंग्रजी कादंबरीकरिता १० हजार पौंडांचा हा पुरस्कार दिला जातो.
- ‘वुइ दॅट आर यंग’ ही कादंबरी शेक्सपीअरच्या ‘किंग लियर’ या शोकांतिकेवर असून, त्याला आताच्या काळातील पार्श्वभूमी आहे.
- ही कादंबरी फ्रान्स, डेन्मार्क, इस्रायल व जर्मनी या देशांत त्यांच्या भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. आता अमेरिका व कॅनडातही प्रसिद्ध होणार आहे. या कादंबरीला झलक प्राइज व फोलिओ प्राइज हे दोन पुरस्कार आधीच मिळाले आहेत.
- प्रीती तनेजा यांचा जन्म इंग्लंडमधला असून, त्यांचे आईवडील दोघेही भारतीय आहेत. वॉरविक विद्यापीठाच्या त्या स्नातक आहेत.
- इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले आहे. त्यांचे लेखन ‘द गार्डियन’ व ‘ओपन डेमोक्रसी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
- २०१४मध्ये त्यांच्या ‘कुमकुम मल्होत्रा’ या कादंबरीस गेटहाऊस प्रेस न्यू फिक्शन पुरस्कार मिळाला होता.
- व्हिज्युअल व्हर्सच्या संपादक व नव्या जगातील तरुण विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्या इंग्लंडमध्ये वंचितांसाठी काम करीत आहेत.
भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन
- भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे २ जुलै रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
- जयंत नाडकर्णी भारताचे १४वे नौदल प्रमुख होते. डिसेंबर १९८७ पासून नोव्हेंबर १९९०पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून यशस्वीपणे धुरा संभाळली.
- निवृत्तीनंतर ते पुण्यात वास्तव्याला होते. मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेचे काही काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
ॲरोन फिंचकडून टी-२०मधील ही सर्वाधिक धावांची खेळी
- ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ॲरोन फिंचने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० लढतीमध्ये १७२ धावांची तुफानी खेळी साकारत विश्वविक्रम रचला आहे. टी-२० क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावांची खेळी आहे.
- फिंचने या सामन्यात फक्त ७६ चेंडूमध्ये १६ चौकार आणि १० षटकार लगावत १७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
- यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम फिंचच्याच नावावर होता. यापूर्वी फिंचने इंग्लंडविरुद्ध ६३ चेंडूंमध्ये १५६ धावांची खेळी साकारली होती.
- याबरोबरच टी-२० क्रिकेटमध्ये दोनदा दीडशे धावांचा टप्पा ओलांडणारा फिंच हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
- या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ९ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
पत्रकार रजत शर्मा डीडीसीएच्या अध्यक्षपदी
- आप की अदालत या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहचलेले पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- पद्मभुषण पुरस्कारप्राप्त रजत शर्मा हे सध्या हिंदी वृत्तवाहिनी इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक आहेत.
- भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची या संघटनेच्या निरीक्षकपदी निवड झाली आहे. तर राकेश कुमार बन्सल यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा