चालू घडामोडी : २८ जुलै
भारतातील एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट : यूएन एड्स
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्हीसंदर्भात कार्यरत असलेल्या सहयोगी संस्थेने (यूएन एड्स) जागतिक पातळीवरील ‘माइल्स टू गो’ हा अहवाल नुकताच जाहीर केला.
- या अहवालात २०१० ते २०१७ दरम्यानची एचआयव्ही संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे.
- जागतिक पातळीवर एचआयव्ही रोखण्यासाठी अपेक्षित वेगाने काम होत नसल्याची धोक्याची घंटा या अहवालाद्वारे वाजवण्यात आली आहे.
- नव्याने एचआयव्ही बाधितांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- जागतिक पातळीवर गेल्या सात वर्षांमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण केवळ १८ टक्क्यांनी कमी झाले.
- एचआयव्ही बाधितांची संख्या २०१०मध्ये २२ लाख होती. २०१७मध्ये ती १८ लाखांवर आली आहे. नव्या एचआयव्ही बाधितांपैकी ९७ टक्के रुग्ण पूर्व युरोप आणि मध्य आशियातील आहेत.
- एचआयव्हीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १ लाख ६० हजार वरून ६९ हजार इतके कमी झाले. तर एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण २३ लाखांवरून २१ लाखांवर आल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले.
- भारतासह कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांनी विशेष लक्ष दिल्यामुळे २०१०च्या तुलनेत २०१७मधील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. फिलिपिन्स आणि पाकिस्तानमध्ये मात्र एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढतेच आहे.
- भारतात २०१०मध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या नव्या रुग्णांचे प्रमाण जवळपास १ लाख २० हजार होते. २०१७मध्ये ते कमी होऊन जवळपास ८८ हजारांवर आले आहे.
फियाट-क्रायस्लरचे माजी सीईओ सर्गियो मार्कियोनी यांचे निधन
- फियाट-क्रायस्लर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सर्गियो मार्कियोनी यांचे २५ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे वय ६६ वर्षे होते.
- आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर या दोन्ही कंपन्यांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा स्थिरस्थावर करण्यात सर्गियो मार्कियोनी यांचा सिंहाचा वाटा होता.
- २००४मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे सीईओ पद स्वीकारले आणि त्यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोट्याच्या फेऱ्यातून बाहेर काढले.
- फियाट-५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली.
- मंदीसदृश परिस्थितीमुळे २००८मध्ये अमेरिकेतली क्रायस्लर कंपनी डबघाईला आली. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली.
- मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरलाही नव्या वाटेवर घेऊन गेली.
- मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.
- फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले आणि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक होते.
- त्यांनी सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. जुलै २०१८मध्ये त्यांनी आपल्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आणि काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणचे चलन कोसळले
- अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर घातलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या इराणचे चलन दिवसेंदिवस कोसळत आहे.
- २८ जुलै रोजी एका डॉलरच्या बदल्यात १.१२ लाख इराणी रिआल इतकी विक्रमी घसरण इराणच्या चलनाची झाली. त्यापूर्वी २७ जुलै रोजी एका डॉलरची किंमत ९८ हजार रिआल होती.
- जानेवारी २०१८मध्ये एका डॉलरची किंमत ३५,१८६ एवढी होती. गेल्या चार महिन्यांमध्ये इराणी रिआलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
- अर्थव्यवस्थेत होत असलेल्या पडझडीमुळे इराणी नागरिक चिंतीत झाले आहे. त्यामुळे आपली बचत आणि गुंतवणुकीला ते डॉलरच्या रूपात सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- मे २०१८मध्ये अमेरिकेने अणुकरारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणला पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागला.
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला १० पदके
- इस्तानबुल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १० पदकांची कमाई केली आणि त्यात ७ पदके महिलांनी जिंकली आहेत.
- पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू ठरली. तिने ५५ किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर ६-३ असा विजय मिळवला.
- राष्ट्रकुल विजेत्या बजरंग पुनियाने सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची (७० किलो गट) कमाई केली. महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
- ६१ किलो वजनी गटात संदीप तोमरवर इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने ८-२ अशी मात केली. त्यामुळे संदीपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महेशकुमार मलानी पाकिस्तानात संसदीय निवडणूक जिंकणारे पहिले हिंदू
- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत महेशकुमारमलानी संसदीय निवडणूक जिंकणारे पहिले हिंदू ठरले आहेत.
- सिंध प्रांतातील थरपरकरमधील खुल्या मतदारसंघातून त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीतर्फे निवडणूक लढविली होती.
- पाकिस्तानातील हिंदू राजस्थानी पुष्करना ब्राह्मण नेता मलानी यांनी ही निवडणूक एकूण १४ प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवून जिंकली आहे.
- मलानी यांच्या विरोधात हाफिझचा पक्ष अल्लाहु अकबर तहरीक, तहरीक-ए-लबेक पाकिस्तान या पक्षांचे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवार उभे होते.
- २०१३च्या निवडणुकीत देखील मलानी सिंध प्रांतातील पीएस-६१ ही विधानसभेची जागा जिंकणारे पहिले हिंदू ठरले होते. ते २००३ ते २००८ दरम्यान पीपीपीच्या आरक्षित जागेवरून संसद सदस्यही झाले होते.
- पाकिस्तानात २००२मध्ये कायद्यात बदल करून बिगर मुस्लीम नागरिकांना देखील मतदान आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आला होता.
- ५५ वर्षीय मलानी अल्कसंख्याक समुदायाचे नेते आहेत आणि त्यांनी निवडणूकीत एकूण ३७ हजार २४५ मते मिळवली. त्याचे प्रतिस्पर्धी अरब जकाउल्ला यांना १८ हजार ३२३ मते मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा