राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रांमधील चार व्यक्तींना संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
राज्यसभेत २५० सभासद असून, त्यातील १२ सदस्यांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून पंतप्रधानांच्या सल्ल्याने करत असतात.
पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह, रघुनाथ महापात्रा यांची चार जणांची नियुक्ती राज्यसभेत केली आहे.
अभिनेत्री रेखा, अनू आगा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि के. पराशरन यांची कारकीर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त सदस्यांचा कालावधी ६ वर्षे असेल.
राज्यसभेच्या १२ नियुक्त सदस्यांपैकी शरद यादव यांची एक जागा वगळता ११ जणांच्या नेमणुका मोदी सरकारने केल्या आहेत.
या नेमणुकानंतर राज्यसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ ११० झाले आहे. उपसभापतीपदाच्या विजयासाठी त्यांना एकूण १२३ मतांची गरज आहे.
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद
थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सिंधू पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानच्या नोझोमी ओकुहाराने या सामन्यात सिंधूवर २१-१५, २१-१८ असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले.
२०१२मध्ये सायना नेहवालने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
पी. व्ही. सिंधू आणि नोजोमी ओकुहारा यांच्यात आतापर्यंत ११ सामने झाले असून ५ सामन्यात सिंधूने तर ६ सामन्यात ओकुहाराने विजय मिळविला आहे.
त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वि. ल. धारुरकर
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा गावाचे पुरातत्त्व विद्येचे गाढे अभ्यासक आणि पत्रकार डॉ. वि. ल. धारुरकर यांची त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे.
सुरुवातीला वृत्तपत्रात मजकुराचे भाषांतर करणाऱ्या धारुरकर यांनी इतिहासाच्या पुरातत्त्व शाखेत प्रावीण्य मिळवत वेरुळ लेण्यातील जैन शिल्पांचा अभ्यास केला. याच विषयात त्यांनी पीएचडीदेखील संपादन केली.
‘सिंधू संस्कृतीतील कलेचा उत्कट आविष्कार’ या विषयीही त्यांनी संशोधन केले आहे. त्यांनी पुरातत्त्व विभागातही काही काळ काम केले.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पत्रकारितेवरील त्यांची वेगवेगळी ३६ पुस्तके प्रकाशित आहेत. ‘सावरकरांची पत्रकारिता’ हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले.
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या सर्व विषयांचा आवाका असणाऱ्या धारुरकर यांनी वेगवेगळ्या देशांत त्यांची संशोधने सादर केली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८३ ते २०१६ या काळात शिकवताना त्यांनी पत्रकारितेतील अनेक विद्यार्थी घडवले.
याच विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचा अभ्यासक्रम आखण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
विचारांशी बांधिलकी जपत इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणून त्यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते. त्यामुळेच त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली त्यांची निवड समर्थनीय आहे.
आंध्रप्रदेशमध्ये अण्णा कॅन्टिन योजना सुरु
पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तमिळनाडूमधील ‘अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर ‘अण्णा कॅन्टिन’ शहरी भागांमध्ये सुरू केली आहेत.
राजधानी अमरावतीमध्ये आधी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही योजना, ११ जुलैपासून शहरी भागातही सुरू करण्यात आली.
चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून, पुढील महिन्यापर्यंत २०० अण्णा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
तमिळनाडूमध्ये गरिबांना स्वस्तात न्याहारी आणि भोजन उपलब्ध व्हावे म्हणून जयललिता यांनी सर्वप्रथम ‘अम्मा कॅन्टीन’ ही योजना सुरू केली होती.
१ रुपयांमध्ये ईडली, ५ रुपयांमध्ये भोजन या योजनेत उपलब्ध होते. गोरगरीबांना खुश करणारी जयललिता यांची ही योजना यशस्वी झाली.
तमिळनाडूमध्ये पुन्हा सत्ता मिळण्यात अम्मा कॅन्टीन योजनेचा अण्णा द्रमुकला फायदा झाला होता. त्यामुळे अम्मांचा हा प्रयोग अन्य राज्यांनीही सुरू केला आहे.
‘अम्मा कॅन्टीन’च्या धर्तीवर आतापर्यंत ७ राज्यांमध्ये स्वस्त भोजन योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
यात राजस्थान (अन्नपूर्ण रसोई योजना), दिल्ली (आम आदमी कॅन्टीन), मध्य प्रदेश (दीनदयाळ रसोई), ओडिसा (आहार योजना), कर्नाटक (इंदिरा कॅन्टीन), आंध्र प्रदेश (अण्णा कॅन्टीन) या राज्यांचा समावेश आहे.
स्वस्त दरात न्याहरी आणि भोजन उपलब्ध करून देण्याची योजना राबविल्याने राज्यांच्या तिजोरीवर बोजा पडतो.
या योजनेसाठी तमिळनाडू सरकार दरवर्षी २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करते. आंध्र प्रदेशात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा