चालू घडामोडी : २० जुलै

अविश्वास प्रस्ताव मतदानात रालोआ सरकार विजयी

  • विरोधी पक्षांनी एकत्र येत १८ जुलै रोजी सुरु झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर केला.
  • लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे व त्यावर लोकसभेत २० जुलै रोजी चर्चा होईल असे जाहीर केले. नियमांनुसार लोकसभेच्या सभापतींना हा ठराव १० दिवसांमध्ये चर्चेसाठी आणावा लागतो.
  • केंद्रातील मोदी सरकार विरोधातील हा पहिलाच अविश्वास प्रस्ताव असून, लोकसभेच्या ५०हून अधिक सदस्यांनी अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला.
  • तेलगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार के के श्रीनिवास यांनी शून्य प्रहारात रालोआ सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला.
  • टीडीपीच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळला होता.
  • आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याचे कारण पुढे करत टीडीपी मार्च २०१८मध्ये रालोआमधून बाहेर पडला होता.
  • रालोआचे लोकसभेत ३१० खासदार असल्याने संख्याबळामध्ये रालोआ सरकारला कोणताच धोका नव्हता. अशावेळी अविश्वास प्रस्ताव हा फक्त सरकारविरोधात सांकेतिक विरोध दर्शवण्याचे माध्यम ठरला.
  • २० जुलै रोजी तेलुगू देसम पक्षाचे नेते जयदेव गाला यांनी अविश्वासदर्शक ठराव लोकसभेत मांडला. मोदी सरकारने आंध्र प्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप त्यांनी केला.
  • कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोमदार भाषण करीत सरकारवर टीकास्त्र सोडले; त्याला उत्तर देताना मोदी यांनी राहुल यांच्या आरोपांच्या चिंध्या करताना सरकारची बाजू मांडली.
  • रालोआ आणि विरोधी आघाडीतील संख्याबळातील प्रचंड तफावतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अविश्‍वास ठराव सहज जिंकत लोकसभेत बहुमत सिद्ध केले. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने १२६ तर विरोधात ३२६ मते मिळाली.
  • या अविश्वास प्रस्तावावर एकूण ४५१ सदस्यांनी मतदान केले. तर जवळपास ९२ खासदार मतदानादरम्यान अनुपस्थित होते.
  • भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने, तसेच ओडिशातील बिजू जनता दलाने या मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली.
  • अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून लोकसभेचे कामकाज सलग १२ तास चालले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.
  • यापूर्वी शेवटचा अविश्वास ठराव २००३साली सोनिया गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात आणला होता. मात्र तो मंजूर करण्यात विरोधी पक्षांना अपयश आले होते.

हिंदीतील प्रसिद्ध गीतकार व कवी नीरज यांचे निधन

  • हिंदीतील प्रसिद्ध गीतकार, कवी, साहित्यिक पद्मभूषण गोपालदास सक्सेना ऊर्फ नीरज यांचे १९ जुलै रोजी वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.
  • घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.
  • त्यांचा अखेरचा काळ अत्यंत कठिण गेला. ते आजारपणाला प्रचंड वैतागले होते. त्यामुळे त्यांनी स्वेच्छा मरणाची इच्छाही व्यक्त केली होती.
  • नीरज यांचा जन्म ४ जानेवरी १९२५ रोजी उत्तर प्रदेशच्या इटावामधील गावात झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट गाणी दिली.
  • नीरज यांना १९९१साली पद्मश्री, तर २००७साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना ३ वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
  • दर्द दिया है, आसावरी, मुक्तकी, कारवां गुजर गया हे काव्यसंग्रह, लिख लिख भेजत पाती हे पत्रलेखन, पंत-कला, काव्य और दर्शन या समीक्षा ही त्यांची ग्रंथसंपदा.
  • नीरज यांची गाजलेली काही गाणी: रंगीला रे तेरे रंग में, ए भाय जरा देख के चलो, बस यही अपराध मैं हर बार करता हूं, पैसे की पहचान यहां, शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, दिल आज शायर है गम आज नग्म्मा है, फूलों के रंग से, चुडी नहीं ये मेरा दिल है, लिखे जो खत तुझे, खिलते हैं गुल यहाँ

एअरबसच्या हेलिकॉप्टर व्यवसाय प्रमुखपदी आशीष सराफ

  • अमेरिकी बोइंगची ही कट्टर स्पर्धक असलेल्या फ्रेंच कंपनी एअरबसच्या हेलिकॉप्टर व्यवसाय विभागाचे प्रमुख म्हणून आशीष सराफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सराफ जानेवारी २०१६पासून कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून औद्योगिक विकास तसेच भागीदारी विभागाची जबाबदारी हाताळत होते.
  • थर्मेक्स, डेलॉइटसारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्य करणाऱ्या सराफ यांचा एकूणच संरक्षण क्षेत्रातील हवाई साधने, उपकरण निर्मिती क्षेत्रातील अनुभव मोठा आहे.
  • टाटा समूहाचे संरक्षण क्षेत्रातील अंग असलेल्या भागीदारीतील कंपनीतही ते काही काळ कार्यरत होते.
  • नागपूर व पुण्याच्या अनुक्रमे विश्वेश्वरैय्या एनआयटी व सिम्बॉयसेस आयबीएमचे पदवीधर असलेलेल्या सराफ यांनी विदेशातील अनेक विद्यापीठातून उच्च व्यावसायिक शिक्षण घेतले आहे.
  • सराफ हे हवाई क्षेत्रातील कार्यात उच्च गुणवत्ता राखणारी उत्पादने विकसित करणारे उत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही गौरविले गेले आहेत.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जूनमधील सर्वोच्च एअरबस विमानांची विक्री नोंदविली आहे.
  • एअरबसकडे सध्या १००हून अधिक हेलिकॉप्टर असून वैद्यकीय तसेच पर्यटन सुविधा पुरविणाऱ्या व्यवसायातही सराफ यांचे मार्गदर्शन कंपनीला लाभणार आहे.
  • मेक इन इंडियाला प्रेरित होऊन भारतातील संरक्षण क्षेत्रातील व्यवसायात स्थान भक्कम करण्याच्या दृष्टीने एअरबसने सराफ यांची महत्त्वाच्या पदावर ही नियुक्ती केलेली आहे.

जलदगती न्यायालये स्थापण्यात महाराष्ट्राला दुसरे स्थान

  • गंभीर गुन्ह्यांसह महिला, वयोवृद्ध आणि मुलांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांचे काम वेगाने होण्यासाठी महाराष्ट्राने सर्वात जास्त जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करून दुसरे स्थान मिळवले आहे.
  • महाराष्ट्रात १०० जलदगती न्यायालये असून, या संख्येमध्ये राजस्थान पहिल्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत जलदगती न्यायालयांच्या काही वाढ केलेली नसली तरीही त्याचे हे स्थान कायम आहे.
  • जलदगती न्यायालय स्थापन्याचे काम पूर्णपणे राज्याचे आहे. देशात २०१५मध्ये अशी २८१ न्यायालये होती. ती २०१६मध्ये ५२४ तर २०१७मध्ये ७२७ झाली.
  • जलदगती न्यायालयांच्या स्थापनेसाठी आर्थिक प्रोत्साहनात वाढ केली गेली आहे. करात सवलतीच्या रुपात मिळणारा निधी ३२ वरून ४२ टक्के केला गेला आहे. राज्यांनी या न्यायालयांच्या संख्येत वाढ करावी, असे आवाहनही केंद्राने केले आहे.
  • २०१५-२०१७ दरम्यान राजस्थान, ओडिशा, मिझोराम, मेघालय, कर्नाटक, केरळ व मध्य प्रदेशमध्ये एकाही अशा न्यायालयाच्या स्थापनेची माहिती केंद्राकडे आलेली नाही. पंजाबने २०१५मध्ये असे एक न्यायालय स्थापन केले.

नवोदित खेळाडूंसाठी सचिन तेंडुलकरची अकॅडमी

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिडलसेक्स क्रिकेटसह नवोदित खेळाडूंसाठी क्रिकेट अकॅडमी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सचिन तेंडुलकर आणि तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी ९ ते १४ वर्षीतील मुलांना प्रशिक्षण देणार आहे.
  • नॉर्थवूड येथील मर्चंट टेलर यांच्या शाळेत तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी ६ ते ९ ऑगस्टदरम्यान आपला पहिला क्रिकेट कॅम्प आयोजित करणार आहे. तर मुंबईत नोव्हेंबरमध्ये कॅम्प पार पडेल.
  • ज्यांना क्रिकेटमध्ये रस आहे पण सुविधा उपलब्ध नाहीत, अशा देशातही हे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करणे हे या अकॅडमीचे मुख्य ध्येय असेल.
  • सर्वच खेळांचा प्रचार करायचा असल्यामुळेच अकॅडमीच्या नावात क्रिकेट शब्द नाहीये, असे सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा