चालू घडामोडी : ९ जुलै

जगातील सर्वात मोठ्या मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या नोएडातील विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन ९ जुलै रोजी पार पडले.
  • सुमारे ३५ एकर क्षेत्रात उभारण्यात येणारा हा जगातील सर्वाधिक मोबाइल हँडसेटचे उत्पादन करणारा प्रकल्प ठरणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
  • स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत ही जगातील दुसरी मोठी बाजारपेठ आहे. जगभरातील एकूण स्मार्टफोन विक्रीपैकी १० टक्के स्मार्टफोन भारतात विकले जातात. म्हणूनच सॅमसंगने भारतामध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • नोएडातील सेक्टर ८१मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी १९९५मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. या मूळ फॅक्टरीचा आता विस्तार करण्यात येणार आहे.
  • नोएडातील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सॅमसंगने ४९९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • ही कंपनी सध्या भारतात ६७ लाख स्मार्टफोन तयार करते. त्यापैकी ५० लाख फोनची निर्मिती ही नोएडाच्या या फॅक्टरीमधून होते.
  • फॅक्टरीचा विस्तार झाल्यानंतर दरवर्षी या फॅक्टरीमधून १ कोटी २० लाख फोन्स निर्माण करण्याचा कंपनीचा विचार आहे.
  • या फॅक्टरीत तयार होणारे फोन भारताबरोबरच युरोप, दक्षिण आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये निर्यात करण्यात येतील.
  • मोबाइलबरोबरच सॅमसंग रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन आणि इतर घरगुती उपकरणांची उत्पादनेही वाढविणार आहे.
  • सध्या सॅमसंगच्या एकूण उत्पादन निर्मितीपैकी १० टक्के निर्मिती भारतात होते. या विस्तारानंतर पुढील ३ वर्षात हा आकडा ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे.
  • या फॅक्टरीमुळे सध्या ७० हजार लोकांना रोजगार मिळाला असून ही संख्या दीड लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
  • सॅमसंगच्या एक नोएडामध्ये आणि दुसरी तामिळनाडूमधील श्रीपेरींबदरूमध्ये असे दोन प्रकल्प सध्या भारतात आहेत.
  • दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन सध्या ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते.

दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक

  • भारताचे दिव्यांग तिरंदाज राजेश कुमार, श्याम सुंदर आणि तारीफ यांनी दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
  • चेक प्रजासत्ताकमध्ये सुरु असणाऱ्या युरोपियन पॅरा आर्चरी चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने रोमानियाच्या संघाचा पराभव करत सुर्वणपदक पटकावले.
  • दिव्यांगाच्या तिरंदाजीत भारताला मिळालेले हे पहिलेच सुर्वणपदक आहे. दोन वर्षांनी टोकियोत होणाऱ्या दिव्यांगाच्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने हे सुवर्णपदक दिशादर्शक ठरणार आहे.
  • भारतीय संघातील राकेश हा मुळचा जम्मूमधील कटरा येथील असून, एका अपघातानंतर त्याच्या शरिराच्या कंबरेखालील भाग निष्क्रीय झाला.
  • एक हात निष्क्रीय असलेला राजस्थानचा श्याम सुंदर धनुष्याचा तीर आपल्या दाताने ओढतो आणि अचूक लक्ष्याचा अचूक वेध घेतो.

देशातील सहा संस्थांना प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचा दर्जा

  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सरकारी आणि तीन खासगी संस्थांना प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचा (इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स) दर्जा दिला आहे.
  • भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रतिष्ठित शिक्षण संस्था उपक्रम सुरु केला आहे.
  • देशातील १० सरकारी आणि १० खासगी अशा २० संस्थांची निवड करण्यात येणार आहे. त्यातील ६ संस्था जाहीर झाल्या असून, उर्वरित संस्थांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर होतील.
  • या ६ संस्थांमध्ये आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) या तीन सरकारी संस्थांचा समावेश आहे.
  • तसेच मणिपाल अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन (कर्नाटक), बिट्स पिलानी (राजस्थान) व जिओ इन्स्टिट्यूट रिलायन्स फाउंडेशन या ३ खाजगी संस्थांचा समावेश आहे.
  • मनुष्यबळ विकास मंत्रालय पुढील पाच वर्षात तिन्ही सरकारी संस्थांना १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. खासगी संस्था सरकारी निधीसाठी पात्र असणार नाहीत.
  • या संस्थांना नवे अभ्यासक्रम, विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश, विदेशी शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करण्याची पूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळणार आहे.
  • देशात आज ८०० विद्यापीठे आहेत. मात्र, यातील एकही संस्था जगातील पहिल्या १०० अथवा २००मध्ये नाही.
  • एप्रिल महिन्यात केंद्राकडून जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील १०० अव्वल शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयएससी बेंगळुरू पहिल्या, आयआयटी मुंबई तिसऱ्या व आयआयटी दिल्ली चौथ्या स्थानी आहे.
  • खासगी संस्थांमध्ये मनिपाल अॅकेडमी ही या यादीत १८व्या तर बिट्स पिलानी २६व्या क्रमांकावर आहे.
  • दुसऱ्या स्थानी असलेल्या आयआयटी मद्रासला मात्र प्रतिष्ठीत संस्थेचा मान मिळू शकलेला नाही.
  • रिलायन्स फाऊंडेशनच्या जिओ इन्स्टिट्यूटने मात्र अस्तित्वात येण्यापूर्वीच या सहा प्रतिष्ठित संस्थांमध्ये स्थान पटकावल्यामुळे वाद निर्माण झाले आहेत.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकर यांनी मागील वर्षी २० प्रतिष्ठित शिक्षण संस्थांची निवड करण्याची घोषणा केली होती.
  • त्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

रामायणातील स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस

  • नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली.
  • त्यांनतर आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे.
  • या एक्सप्रेसमुळे नोव्हेंबर महिन्यात अयोध्या ते कोलंबो असा प्रवास यात्रेकरुंना करता येईल. हा प्रवास १६ दिवसांचा असेल.
  • ही रेल्वे दिल्लीमधून सफदरगंज स्थानकावरुन प्रवासाला सुरुवात करेल. त्यानंतर प्रभू रामांच्या राजधानी अयोध्येतील विविध धार्मिक स्थानांना भेट देण्यात येईल.
  • त्यानंतर ही रेल्वे नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, शृंगवेरपूर, चित्रकूट असा प्रवास करत मंदाकिनीच्या तटनिकटी म्हणजे महाराष्ट्रात नाशिकमध्ये येईल.
  • नाशिकनंतर ही रेल्वे कर्नाटकात हंपी व पुढे रामेश्वरम येथे जाईल. यातील ज्या स्थळांमध्ये रेल्वे स्थानक नसेल त्या स्थळांच्या जवळील रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे जाईल.
  • या प्रवासासाठी भारतीय रेल्वे १५ हजार १२० रुपये आकारणार असून एकावेळेस रेल्वेत ८०० प्रवासी असतील.
  • ज्या प्रवाशांना श्रीलंकेत जायचे असेल त्यांना चेन्नईतून अधिक पैसे देऊन विमानाने जाता येईल. श्रीलंकेत पाच रात्री व सहा दिवसांच्या प्रवासासाठी ४७ हजार ६०० रुपये आकारण्यात येतील.

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या फूटबॉल संघाची सुटका

  • अपघाताने २३ जूनपासून थायलंडमधील गुहेत अडकलेल्या सर्व १२ फूटबॉल खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
  • जगभरातील विविध देशांनी या मुलांना वाचविण्यासाठी सहकार्य केले. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या मोहिमेत सहभाग घेतला.
  • या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले.
  • भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने थायलंडला रवाना केली.
  • पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तज्ञ असलेले प्रसाद यांनी गुहेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अडसर ठरलेले पाणी काढण्यासाठी मदत करत केली.
  • पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि सावर मुळे व त्यांच्या प्रशिक्षकांना वाचविण्यात अखेर यश आले आहे.
  • किर्लोस्कर ब्रदर्सची बँकॉकमध्येही शाखा कार्यरत असून थायलंडच्या सरकारबरोबर आजवर अनेकदा या कंपनीने काम केले आहे.
  • २०११साली बँकॉक येथे आलेल्या पुराच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठीदेखील किर्लोस्कर कंपनीने पंप दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा