चालू घडामोडी : १७ जुलै

शेतकऱ्यांसाठीच्या ‘आय मंडी’ ॲपचे मुंबईत उद्घाटन

 • शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांची तयार बाजारपेठ मिळवून देणारे ‘आय मंडी’ या मोबाईल ॲपचे मुंबईत उद्घाटन करण्यात आले.
 • शेतकऱ्यांना कर्ज सुविधेसह त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी इफ्को कंपनीने आय मंडी ॲप तयार केले आहे.
 • या ॲपमुळे देशभरातील ५.५ कोटी शेतकरी ग्राहकांशी संलग्न होणार असून त्यामध्ये ३० हजार गोदामांचाही समावेश आहे.
 • इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप लिमिटेड (इफ्को) ही केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू असलेली देशातील पहिली खतनिर्मिती सहकारी संस्था आहे.
 • या ॲपमध्ये शेती संबंधित उत्पादनांची माहिती असेल. तसेच ग्राहकांपयोगी वस्तूंची बाजारात विक्री करणे, पीक कर्जे, पीक विमा, गोदामे या सर्वांची माहितीही ॲपमध्ये असेल.

डॉ. कुसला राजेंद्रन यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पुरस्कार

 • नामांकित भूभौतिकशास्त्रज्ञ (जिओफिजिसिस्ट) डॉ. कुसला राजेंद्रन यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे.
 • महासागर विज्ञान, वातावरण तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
 • डॉ. कुसला राजेंद्रन बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आहेत.
 • भूकंपशास्त्र या विज्ञानातील अगदीच वेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम करण्याचे ठरवले. त्यांनी उपयोजित भूभौतिकशास्त्रात १९७९मध्ये रुरकी विद्यापीठातून एम-टेक केले आहे.
 • १९८१मध्ये सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज या संस्थेत त्यांनी काम सुरू केले. नंतर अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना विद्यापीठातून पीएचडी केली.
 • नंतर भारतात परतून येथील भूकंपाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. किल्लारी (१९९३) व भूज (२००१) भूकंपांच्या अभ्यासाआधारे त्यांनी काही पुस्तकेही लिहिली.
 • २००७मध्ये डॉ. राजेंद्रन इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या सेंटर फॉर अर्थ सायन्सेसमध्ये रुजू झाल्या.
 • भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. कुसला या त्यांचे पती सीपी राजेंद्रन (भूभौतिकशास्त्रज्ञ) यांच्यासमवेत याच क्षेत्रात काम करीत आहेत.

तिबेटमध्ये चीनने स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले

 • भारताला लागून असणाऱ्या सीमेवर तिबेटमध्ये चीनने आपल्या लष्कराच्या मदतीसाठी वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले आहे.
 • तिबेटमधील हुंझे काउंटीमधील युमाई शहरात हे वेदर स्टेशन असून संघर्ष, तणावाच्या परिस्थितीत चीनच्या लष्कराला या वेदर स्टेशनची मोठी मदत होणार आहे.
 • हे वेदर स्टेशन हवेतील तापमान, हवेचा दाब, वाऱ्याच वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता याचा आढावा घेईल.
 • भारताला लागून असणाऱ्या सीमांवर आणखी असे वेदर स्टेशन्स उभारण्याची चीनची योजना आहे.
 • या वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या माहितीचा वाहतूक आणि दळणवळणासाठी उपयोग होईल असे चीनकडून सांगण्यात येत आहे.
 • वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला मदत होईल तसेच चीनला सीमेवरील हालचालींचे नियोजनही करता येईल.
 • युद्धाच्या काळात मिसाइल डागणे तसेच विमानांचे टेकऑफ-लँडिंग यावर हवामानाचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या वेदर स्टेशनमुळे चीनला काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल.

सुपरमॅनचा पोशाख डिझाइन करणाऱ्या इवॉन ब्लेक यांचे निधन

 • सुपरमॅन, जिजस ख्रिस्ट सुपरस्टार यांसारख्या दमदार चित्रपटांच्या वेशभूषाकार इवॉन ब्लेक (Yvonne Blake) यांचे १७ जुलै रोजी वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले.
 • ब्रिटनमध्ये जन्मलेल्या स्पॅनिश वंशाच्या इवॉन रिचर्ड डोनर दिग्दर्शित ‘सुपरमॅन’ या चित्रपटामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. जगप्रसिद्ध ‘सुपरमॅन’चा पोशाख त्यांनीच डिझाइन केला होता.
 • या चित्रपटानंतर त्यांनी सुपरहिरोच्या पोशाखांवर आधारित एक कॉमिक बूकसुद्धा प्रकाशित केले होते.
 • १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपरमॅन २’ या चित्रपटातील कलाकारांसाठीही त्यांनी कपडे डिझाइन केले होते.
 • १९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रँकलिन शॅफनरच्या निकोलस अँड अॅलेक्झांड्रा या चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेसाठी इवॉन यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
 • इवॉन यांनी त्यांच्या करिअरमध्ये ४ प्रतिष्ठित गोया पुरस्कार पटकावले. त्याचप्रमाणे बाफ्ता आणि एमी पुरस्कारांसाठीही त्यांना नामांकन मिळाले होते. जुलै २०१६मध्ये त्यांची स्पॅनिश फिल्म अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

स्पॅनिश ग्रँड पिक्स कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक

 • स्पेनच्या माद्रिद शहरात शहरात झालेल्या स्पॅनिश ग्रँड पिक्स कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 • विनेश फोगटने कॅनडाच्या नताशा फॉक्सचा अंतिम फेरीत १०-०च्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.

पॉन्जी स्कीमद्वारे फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होणार

 • पॉन्जी स्कीम चालवून फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासंबंधी विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
 • अशाप्रकारच्या प्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कमही २५ लाख इतकी करण्यात येईल.
 • या विधेयकाचा उद्देश १९९९मध्ये बनलेल्या महाराष्ट्र जमाकर्ता (वित्तीय संस्थांचा) हितांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या अधिनियमात संशोधन करणे होता.
 • यापूर्वी या अधिनियमात संपत्ती जप्त करण्याची तरतूद नव्हती. परंतु आता फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांचे प्रवर्तक, संचालक, भागीदार व्यवस्थापक आणि सदस्यांची संपत्ती जप्त करता येईल.
 • याशिवाय तपास अधिकारी जी संपत्ती जप्त करेल, तसेच ती न्यायालयातून आदेश आणूनही विकता येणार नाही.
 • बिटकॉईनबाबतही फसवणुकीचे प्रकार वाढू लागले असल्याने, हा नवीन कायदा अशा प्रकरणातही लागू राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा