चालू घडामोडी : २५ जुलै
ख्यातनाम निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन
- आकाशवाणी पुणे केंद्राच्या ख्यातनाम निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे (वय ८८) यांचे हदयविकाराच्या झटक्याने २२ जुलै रोजी निधन झाले.
- नरवणे यांनी १० वर्षांहून अधिक काळ ऑल इंडिया रेडीओचे प्रादेशिक केंद्र अर्थात आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केले होते. त्यांच्या आवाजात अनेक वर्षे आकाशवाणीच्या सकाळी सातच्या बातम्यांचे प्रसारण होत असे.
- आकाशवाणीवरील आपल्या कारकिर्दीसह लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लघुकथा, लघुनिबंध लेखनासह त्या अनुवादही उत्तम करत.
- इंद्रधनू, ते अठरा सेकंद, लामणदिवा, जननी : माता, कन्या, मातृत्व, इतवा मुंडाने लढाई जिंकली : आदिवासी जीवनावरील कथा अशी त्यांनी लिहिलेली व अनुवाद केलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.
- त्या काळात नावाजलेल्या सत्यकथा, किर्लोस्कर, हंस, स्त्री, माणूस अशा अनेक नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते.
- त्यांच्या आजवरच्या कामगिरीबद्दल राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
अमेरिकेकडून भारताला सीएएटीएसए कायद्यातून सवलत
- अमेरिका सीएएटीएसए या विशेष कायद्यातून भारताला सवलत देणार आहे. या कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर निर्बंध आहेत.
- त्यामुळे भारताचा रशियाकडून एस-४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- एकूण ३९ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार असून भारत रशियाकडून एस-४००च्या पाच सिस्टीम विकत घेणार आहे.
- भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियाबरोबर हा करार केला असता तर भारतावर मेरीकेने आर्थिक निर्बंध लावले असते. पण आता हा धोका उरलेला नाही.
- भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या तीन देशांना सीएएटीएसए या विशेष कायद्यातून सवलत मिळणार आहे.
- एस-४००मुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये या व्यवहाराची बोलणी सुरु आहेत.
- शत्रूची क्षेपणास्त्रे, टेहळणी विमाने, स्टेलथ तंत्रज्ञानाने युक्त असलेली फायटर विमाने शोधून नष्ट करण्याची एस-४००ची क्षमता आहे.
- ऑक्टोंबर २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये गोव्यात बैठक झाली. त्यावेळी सर्व प्रथम एस-४००च्या व्यवहाराबाबत करार झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा