चालू घडामोडी : १३ जुलै
आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी यांचे निधन
- शांतता, मानवता आणि शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी यांचे वयाच्या ९९व्या वर्षी वृद्धापकाळामुळे ११ जुलै रोजी निधन झाले.
- दादा वासवानी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु व काका साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या साधू वासवानी मिशनचे प्रमुख होते. अहिंसा आणि प्राणीमात्रांवर प्रेमाचा संदेश देणाऱ्या दादांचे जगभरात असंख्य अनुयायी आहेत.
- मृदू स्वभावाचे आणि अत्यंत साधी राहणी असणारे दादा वासवानी हे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांना सिंधी समाजामध्ये विशेष महत्वाचे स्थान आहे.
- त्यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. लहानपणासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता.
- सध्याच्या पाकिस्तानमधील सिंध प्रातांत २ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव.
- अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. त्यानंतर एलएलबीची पदवीही संपादन केली होती.
- भौतिकशास्त्रातील त्यांच्या प्रबंधांची नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते.
- त्यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. आयुष्यभर त्यांनी स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार गेला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते.
- देशभरात त्यांनी १८ शाळा काढल्या, तसेच सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल, तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.
- त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत.
- त्यांनी अहिंसा, प्रेम व धर्म या विषयांवर लंडनच्या संसदेत, ऑक्सफर्डच्या जागतिक धर्मगुरू परिषदेत, शिकागोत आयोजित धर्मसंसदेत तसेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शांतता परिषदेत त्यांचे विचार मांडले होते.
- अध्यात्म, सामाजिक, शैक्षणिक, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मोठे कार्य केले. जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे त्यांना स्वतःचे अध्यात्मिक गुरू मानत.
- जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अलिबाबा ग्रुपचे संस्थापक चीनचे जॅक मा यांना श्रींमतीमध्ये मागे टाकले आहे.
- रिलायन्स उद्योग समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानींनी अनेक नवनवीन घोषणा केल्या. त्यानंतर कंपनीच्या समभागात तेजी आल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली.
- १३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजार बंद होण्यावेळी अंबानी यांची एकूण संपत्ती ४४.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ब्लुमबर्ग बिलेनियर इन्डेक्सनुसार चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे जॅक मा यांची संपत्ती ४४ अब्ज डॉलर्स आहे.
- चालू वर्षात अंबानी यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. तर २०१८मध्ये जॅक मा यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर्सने घटली आहे.
- समभागातील तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारातील भांडवली हिस्सा १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला तर तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य ७ लाख कोटीच्या पुढे गेले.
- टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस)नंतर १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश होणारी, रिलायन्स ही दुसरी भारतीय कंपनी ठरली आहे.
- देशातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सची जिओ या कंपनीने क्रांती केल्यानंतर आता ई व्यापार क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
- ऑगस्टपासून देशातील ११०० शहरांमध्ये अतिवेगवान ब्रॉडबॅन्ड सेवा देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
भारतीय वंशाचे प्रसिद्ध पत्रकार महेंद्र कौल यांचे निधन
- भारतीय वंशाचे प्रसिद्ध प्रसारक व पत्रकार महेंद्र कौल यांचे ११ जुलै रोजी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
- १९२३मध्ये श्रीनगरमध्ये जन्मलेल्या कौल यांनी आपल्या कारकिर्दीला रेडियो काश्मीरसह सुरुवात केली आणि ऑल इंडियन रेडिओसह प्रसारक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
- बातम्या देण्याबरोबरच काश्मीरमधील परिस्थितीविषयी अनेक कार्यक्रमही त्यांनी सादर केले. पुढे ते अमेरिकेत गेले, तेथे ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’मध्ये त्यांनी काम केले.
- आपल्या कामाचा ठसा उमटवून ते लंडनला गेले. तेथे त्यांना बीबीसीच्या हिंदी सेवेत काम करण्याची संधी मिळाली. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी तेथे काम केले.
- बिगरइंग्रजी श्रोत्यांसाठी ‘नई जिंदगी, नया जीवन’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते सादर करीत. याला तुफान लोकप्रियता त्या काळात मिळाली. हा कार्यक्रम १९६८ ते ८२ अशी सुमारे १४ वर्षे बीबीसीवरून प्रसारित झाला.
- याच कार्यक्रमात मार्गारेट थॅचर, भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, राज कपूर, दिलीप कुमार, नर्गीस अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांना घेता आल्या.
- लंडनमधील लोकांना तंदुरी खाद्यपदार्थाची लज्जत चाखता यावी यासाठी १९६६मध्ये पहिला तंदूर त्यांनीच आयात केला होता.
- पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानाची पारितोषिके मिळाली.
- ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा किताब मिळवणारे ते पहिले विदेशस्थ भारतीय ठरले. नंतर ‘ड्युक ऑफ एडिंबर्ग पुरस्कार’देखील त्यांनी पटकावला.
कायली जेन्नर सर्वात कमी वयात अब्जाधीश
- फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या अमेरिकेतील ६० अत्यंत श्रीमंत महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल आणि नीरजा सेठी यांनी स्थान पटकावले आहे.
- स्वत:च्या कष्टांनी अब्जाधीश बनलेल्या महिलांची ही यादी (अमेरिकाज सेल्फ-मेड बिलेनिअर वुमेन) फोर्ब्जने जाहीर केली आहे.
- यादीत जयश्री उल्लाल यांनी १८वे स्थान मिळविले असून, त्यांची संपत्ती १.३ अब्ज डॉलर आहे. तर २१व्या स्थानावरील सेठी यांची संपत्ती १ अब्ज डॉलर आहे.
- नीरजा सेठी सिन्टेल या माहिती व तंत्रज्ञान सल्लागार कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. १९८०मध्ये सेठी यांनी त्यांचे पती भारत देसाई यांच्यासोबत मिशिगन येथे ही कंपनी फक्त २००० डॉलर गुंतवून स्थापन केली होती.
- सिन्टेलचा २०१७मध्ये महसूल ९२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर होता. या कंपनीचे २३ हजार कर्मचारी असून यात बहुसंख्य भारतीय आहेत.
- जयश्री उल्लाल या २००८पासून अरिस्टा नेटवर्क्स या संगणक नेटवर्किंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २०१७मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल १.६ अब्ज अमेरिकन डॉलर होता.
- या यादीत रिॲलिटी टीव्ही कलाकार आणि जोखीम घेऊन उद्योग सुरू केलेली २१ वर्षीय कायली जेन्नर १९व्या स्थानी आहे.
- तिने फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मागे टाकत सर्वात कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे.
- कायली जेन्नरने वयाच्या १०व्या वर्षी ‘कीपिंग अप विद द कर्दाशियन’ या रिॲलिटी शोमधून पदार्पण केले होते.
- तिने २ वर्षापूर्वी फक्त २९ डॉलरची गुंतवणूक करत ‘काइली कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली होती. आज या कंपनीचे ६३ कोटी डॉलरचे प्रॉडक्ट जगभरात विकले जातात.
- फोर्ब्स मासिकानुसार, बिजनेस आणि टिव्ही प्रोग्राममुळे काइलीच्या कंपनीचे मुल्य ९० कोटी डॉलर आहे.
डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डरच्या नियमात मोठा बदल
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डीमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आणि बँकेने काढलेल्या धनादेशावर देणारा व घेणारा अशा दोन्ही व्यक्तींची नावे नोंदविणे बंधनकारक केले आहे.
- यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येईल आणि मनी लाँड्रिंगद्वारे होणाऱ्या काळ्या पैशांच्या व्यवहारांना आळा बसेल अशी आशा आरबीआयला आहे.
- आतापर्यंत डिमाण्ड ड्राफ्टवर केवळ फक्त ज्या व्यक्तीला अथवा संस्थेला रक्कम पाठवायची आहे, त्याचेच नाव प्रसिद्ध केले जात होते.
- डिमाण्ड ड्राफ्टसह पे ऑर्डर आणि बँकर्स चेकच्या संदर्भात १५ सप्टेंबर २०१८पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
संशोधक ब्रायन गिट्टा यांना अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार
- युगांडाचा संशोधक २४ वर्षीय ब्रायन गिट्टा याने रक्ताची चाचणी करण्यासाठी शोधलेल्या उपकरणाला अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे.
- ब्रिटनच्या रॉयल अकॅडमी फॉर इंजिनीअरिंगचा हा पुरस्कार असून तो तंत्रज्ञानाचा मानवी विकासासाठी वापर करण्यासाठी दिला जातो. ब्रायन हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण संशोधक आहे.
- संगणक अभियंता असलेल्या ब्रायन यांनी शोधलेल्या या उपकरणामुळे रक्त न काढता मलेरियाची चाचणी करणे शक्य आहे.
- या उपकरणाचे नाव ‘माटिबाबू’ आहे. त्याचा स्वाहिली भाषेतील अर्थ ट्रीटमेंट म्हणजे उपचार असा आहे.
- मलेरिया म्हणजे हिवताप हा युगांडात जास्त आढळणारा रोग आहे. ब्रायनने शोधलेले उपकरण कुणीही वापरू शकेल असे व किफायतशीर आहे.
- हे उपकरण रुग्णाच्या बोटांना लावले जाते. यात रक्तपेशींचा रंग, आकार व संहती लगेच कळते. ते वापरण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज लागत नाही.
- या शोधात ८० टक्के अचूक निष्कर्ष मिळतात. पुढे ते प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
- अभियांत्रिकीच्या माध्यमातून वैद्यकातील प्रश्न सोडवताना मानवी विकासाला स्पर्श करणारे हे संशोधन मानवतेसाठी विशेषतः आफ्रिकेतील मागास व विकसनशील देशांसाठी वरदान आहे.
मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी विनायक सामंत
- मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनने विल्कीन मोटा यांची मुंबईच्या १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.
- माजी प्रशिक्षक समीर दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती.
- सामंत यांनी राजस्थानचे माजी खेळाडू प्रदीप सुंदरम आणि मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांच्यावर मात करत मुंबईचे प्रशिक्षकपद मिळवले.
- स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाचा मोठा दबदबा आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मुंबईने पटकावले आहे.
- विनायक सामंत यांनी मुंबईकडून १०१ प्रथमश्रेणी सामने खेळले असून, त्यात त्यांनी ३,४९६ धावा केल्या आहेत. नाबाद २०० ही सामंत यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार
- जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मकता वाढीस लागण्यासाठी आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) आणण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करीत आहे.
- या मंत्रालयाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.
- १९७९मध्ये भूतानच्या राजाने सर्वप्रथम देशाच्या विकासाचा पर्यायी निर्देशक म्हणून ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली. २००८ मध्ये भूतानच्या राज्यघटनेत या संकल्पनेचा समावेश करण्यात आला.
- भूतानच्या पावलावर पाऊल ठेवत व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांत आनंद मंत्रालयांची स्थापना केली.
- भारतात ऑगस्ट २०१६मध्ये सर्वप्रथम मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. तर एप्रिल २०१८मध्ये आंध्रप्रदेशात आनंद निर्देशांकानुसार विकासाचे मापन सुरू करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा