भारताचा धावपटू मोहम्मद अनास याही याने झेक रिपब्लीक येथील ४०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
ही शर्यत ४५.२४ सेकंदात पूर्ण करत मोहम्मद अनासने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळविताना अनसने ४५.३१ सेकंदांचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यापूर्वीचा ४५.३२ सेकंदाचा विक्रम त्याच्याच नावावर होता.
मिल्खा सिंगनंतर राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.
भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अनासने ४२ वर्षांनंतर भारताला चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते.
याच स्पर्धेत महिलांची ४०० मीटर शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारताच्या आर. पुवम्मानेही सुवर्णपदक जिंकले.
तर पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत ४०० मीटरमधील माजी राष्ट्रीय विक्रमवीर आरोक्य राजीवने २०.७७ सेकंद वेळ देत कांस्यपदक जिंकले.
सचिन राठी आणि दीपक पुनियाला सुवर्णपदक
आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे कुस्तीपटू सचिन राठी (७४ किलो वजनी गट) आणि दीपक पुनियाने (८६ किलो वजनी गट) सुवर्णपदक जिंकले.
सचिन राठीने फ्रीस्टाइल कुस्तीत मंगोलियाचा पहेलवान बॅटअर्डेन ब्यामबासुरेन याला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
दीपकने अंतिम फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अजथ गजबीय याच्यावर विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले.
दीपकने यापूर्वी २०१६मध्ये आशियाई कॅडेट व आशियाई कुमार स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१७मध्ये या दोन्ही स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.
त्याचबरोबर याच स्पर्धेत भारताच्या सूरज कोकाटे (६१ किलो वजनी गट), मोहितने (१२५ किलो वजनी गट) कांस्यपदकाची कमाई केली.
सुनील छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा २०१७ या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ जाहीर कण्यात आला आहे.
छेत्रीने नुकताच आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.
पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला २०१७ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
एआयएफएफच्या २०१७चे अन्य पुरस्कार:
बेस्ट ग्रासरुट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुरस्कार : केरळ एफ.ए.
सहायक रेफ्री पुरस्कार : सुमंत दत्ता
सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार : सी. आर. कृष्णा
फखर झामन पाकिस्तानचा पहिला द्विशतकवीर
झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या फखर झामनने द्विशतक रचले. द्विशतक रचणारा पाकिस्तानचा तो पहिला खेळाडू ठरला.
पाकिस्तानकडून यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम सईद अन्वर यांच्या नावावर होता. त्यांनी १९९७मध्ये भारताविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या.
फखर झामन क्रिकेटविश्वातील सहावा द्विशतकवीर ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केले आहे.
या सामन्यात झामनने १५६ चेंडूंत २४ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर नाबाद २१० धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.
त्याचबरोबर पाकिस्तानचे सलामीवीर फखर झामन आणि इमाम उल हक यांनी ३०४ धावांची भागीदारी रचत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेचे सलामीवीर सनथ जयसूर्या आण उपुल थरंगा यांच्या नावावर होता. त्यांनी २००६साली लीड्स येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात २८६ धावांची भागीदारी केली होती.
या सामन्यात झामनने नाबाद २१० धावांची खेळी साकारली, तर इमामने ११३ धावा करत झामनला चांगली साथ दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा