चालू घडामोडी : २ जुलै

राहुल द्रविडचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला.
  • आयसीसीच्या या मानाच्या यादीत सहभागी होणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • आतापर्यंत ८७ खेळाडूंना हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले असून, यात अनिल कुंबळे, बिशनसिंह बेदी, कपिल देव आणि सुनील गावसकर या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
  • द्रविडसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग आणि इंग्लंडची महिला यष्टीरक्षक फलंदाज क्लेरी टेलर यांनाही आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये द्रविड १३,२८८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. (अनुक्रमे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिस यांच्यानंतर)
  • सध्या अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने ३४४ वनडे सामन्यांमध्ये नाबाद राहत ७१.२५च्या स्ट्राईक रेटने १०,८८९ धावा केल्या आहेत.

नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

  • केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात जागतिक पोलीस संघटना इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
  • नीरवचा भाऊ निशाल मोदी, त्याचा मामा मेहुल चौकसी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
  • जगभरातील १९२ देश इंटरपोलचे सदस्य आहेत. नोटिसमध्ये उल्लेख केलेली व्यक्ती कुठे आढळली तर तिला लगेच ताब्यात घेण्याची अथवा माहिती कळविण्याची विनंती त्या देशांना करण्यात आली आहे.
  • ही नोटीस २९ जूनपासून जारी करण्यात आली असून, त्यामुळे नीरवला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणे अवघड होणार असून त्याच्या अटकेसाठीही ही नोटीस महत्त्वाची आहे.
  • पंजाब नॅशनल बँकेमध्ये १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी भारतातून फरार झाले आहे.
  • सीबीआय व ईडीने नीरव मोदी व त्याच्या हस्तकांविरुद्ध फसवणूक, लबाडी, विश्वासघात व मनी लॉड्रिंगची आरोपपत्रे दाखल केली आहेत.

राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याचे निकष शिथिल

  • ग्रामीण भागातील वाढता असंतोष लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष शिथिल करत नवीन नियमावली जाहीर केली आहे.
  • यापूर्वी खरिपाच्या पेरणीत ऑगस्टअखेर सरासरीपेक्षा ३३.३३ टक्क्यांची घट झाल्यास दुष्काळ, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाल्यास गंभीर दुष्काळ असा निकष होता.
  • आता पेरणीत सरासरीच्या तुलनेत १५ टक्के घट झाल्यास दुष्काळ, तर सरासरीच्या तुलनेत पेरणीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्यास गंभीर दुष्काळ जाहीर केला जाईल.
  • त्यामुळे आता दुष्काळ जाहीर करणे व त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देणे, केंद्र सरकारकडून मदत मिळवणे सुलभ होणार आहे.

राजस्थान सरकारकडून ५ अतिमागास जातींना आरक्षण

  • राजस्थान सरकारकडून गुर्जर समाजासह गाडरिया, रेबारी, गाडिया लोहार आणि बंजारा या ५ जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.
  • आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास ७ जुलैला जयपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये निदर्शने करण्याचा इशारा गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने राजस्थान सरकारला दिला होता.
  • तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधीत मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत २ जुलैच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरक्षणाची घोषणा करण्याचा अल्टिमेटमही दिला होता.

काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या महिला कमांडो तैनात

  • काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या तरुणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) महिला कमांडोना तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
  • काश्मीर खोऱ्यात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांमध्ये अनेकदा तरुण मुलींचा समावेश असतो. या तरुणींवर कारवाई करण्यासाठी ५०० महिला कमांडोना तैनात करण्यात आले आहे.
  • श्रीनगरमध्ये ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर महिला कमांडोना शोपियन, पुलवामा, कुलगाम, बडगम आणि अनंतनाग या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.
  • सीआरपीएफच्या महिला युनिटला सर्व प्रकारची शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दहशतवादी हल्याला उत्तर देण्यासाठी त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगीही असणार आहे.
  • या महिला कमांडोना काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. संरक्षणासाठी त्यांना कमी वजनाचे बॉडी प्रोटेक्टर्स, हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट आणि शस्त्र देण्यात येणार आहे.
  • जर एखाद्या दहशतवादी कारवाईदरम्यान महिलांना दगडफेक करण्यास सुरुवात केली तर महिला कमांडो पुढे होत कारवाई करतील, तर पुरुष कमांडो त्यांना मदत करतील.
  • २०१६पासून काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी दगडफेकीच्या एकूण ३०० घटना घडल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा