गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रिया सुरळीत आणि नेमकी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत केंद्र सरकारने डीएनए तंत्रज्ञान विधेयकाला मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञानाचा नियमन विधेयक २०१८ला मंजुरी दिली. हे विधेयक १८ जुलै रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे.
देशाच्या न्याय वितरण प्रणालीला समर्थन व बळकटी देण्याकरिता डीएनए आधारित न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, हा डीएनए आधारीत तंत्रज्ञान विधेयकाच्या अंमलबजावणीचा प्राथमिक उद्देश आहे.
गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी तसेच हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए आधारित तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेला जगभरात मान्यता आहे.
भारतातही याचा वापर करता यावा यासाठी डीएनए प्रयोगशाळांची मान्यता आणि नियमन बंधनकारक करण्यात आले आहे.
या नव्या कायद्यानुसार, डीएनए चाचण्यांच्या कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होऊ नये यासाठी या चाचण्यांचा निकाल आणि माहिती सुरक्षित, गुप्त ठेवता येणार आहे.
या विधेयकातील तरतुदीनुसार, डीएनए बँक स्थापन करण्यात येणार आहे. तसेच अशा पद्धतीची गुप्त माहिती फोडल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही यात आहे.
या विधेयकातील तरतुदींमुळे बेपत्ता व्यक्ती आणि अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
याकरिता राष्ट्रीय माहितीचा साठा करण्यासाठी राष्ट्रीय व प्रादेशिक डीएनए डेटा बँका स्थापन केल्या जाणार आहेत.
अशा पद्धतीची माहिती उघड केल्यास अथवा अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात येईल.
सरकारी बँकांच्या वाढत्या थकित कर्जाची समस्या सोडविण्यासाठी सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे पंचसूत्री आराखडा सादर केला आहे.
याशिवाय हा तिढा सोडविण्यासाठी स्वतंत्र सरकारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापण्याची सूचनाही या समितीने केली आहे.
सरकारी बँकांमधील वाढत्या थकित कर्जाच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पंजाब नॅशनल बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती
या समितीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार व बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक पी. एस. जयकुमार हे सदस्य आहेत. त्यांचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे.
मेहता समितीने थकित कर्जांची ५० कोटी रुपयांपर्यंत, ५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत तसेच ५०० कोटी रुपयांवरील अशी वर्गवारी करताना त्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत.
एनपीएचे वेगाने निराकरण करण्यासाठी विविध कर्जदात्या संस्थांमध्ये प्रभावी समन्वय आणि आदानप्रदानासाठी सुनील मेहता समितीने ‘प्रोजेक्ट सशक्त’ अंतर्गत ‘आंतर-कर्जदाता सामंजस्य’ आकृतीबंध सादर केला आहे.
सार्वजनिक बँकांमधील अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) डिसेंबर २०१७ अखेर ७.७७ लाख कोटी रुपये होती. तर सर्व बँकांची मिळून ८.९९ लाख कोटींची कर्जे थकित आहेत.
केरळ सरकारची प्लॅस्टिक कचऱ्यातून रस्तेबांधणीची योजना
केरळ सरकारने प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर करून रस्तेबांधणी करण्यासाठी विशेष योजना आखली आहे. शुचित्व सागरम (समुद्र स्वच्छ करणे) असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेनुसार मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण केले जाईल. त्या प्लॅस्टिकचे अतिशय बारीक तुकडे करून, त्यांचा वापर रस्तेबांधणीसाठी केला जाईल.
साधारणपणे १ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी १० लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. शिवाय डांबराच्या रस्त्यांपेक्षा प्लॅस्टिक वापरून रस्तेबांधणीसाठी साधारणपणे ८ टक्के कमी खर्च येतो.
याशिवाय प्लॅस्टिक डांबराप्रमाणे लवकर वितळत नाही आणि त्यामुळे रस्ते अधिक काळ टिकतात. डांबर ५० अंश सेल्शिअस तापमानाला तर प्लॅस्टिक ६५ अंश सेल्शिअस तापमानाला वितळू लागते.
केरळला प्रचंड समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्रातील प्लॅस्टिक कचऱ्याचा निचरा करणे वा त्याची विल्हेवाट लावणे या योजनेमागील मुख्य हेतू आहे.
रिलायन्सकडून जिओ गिगाफायबर ब्रॉडबँड सेवेची घोषणा
रिलायन्स इंडस्ट्रिजच्या मुंबईत सुरु असलेल्या ४१व्या सर्वसाधारण सभेमध्ये जिओ गिगाफायबर ही ब्रॉडबँड सेवा व जिओ २ नावाचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केल्या आहेत.
मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीने १५ ऑगस्ट रोजी ११०० शहरांमध्ये जिओ गिगाफायबर ही सेवा देण्याची घोषणा केली आहे.
फायबर टू दी होम (एफटीटीएच) तंत्रज्ञानावर आधारीत या सेवेमुळे ब्रॉडबँडच्या क्षेत्रामध्ये क्रांती होणार असून, आत्तापेक्षा कमी दरात वेगवान इंटरनेट सेवा मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय जिओने नवा जिओ-२ नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला असून, यात फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूबची सुविधा असणार आहेत.
रिलायन्स जिओ फोन-२ ची किंमत २,९९९ हजार रुपये असेल. तसेच ५०१ रुपये देऊन जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन-२ खरेदी करता येणार आहे.
गेल्या वर्षी रिलायन्स जिओने ४जी फोन लॉन्च केला होता. हा फोन खासकरून ग्रामीण भागातील लोकांसाठी पर्वणी ठरला होता.
रिलायन्सच्या जिओ टेलिकॉमने वर्षभरात २ कोटी अतिरिक्त ग्राहक जोडले आहेत. सध्या २५ मिलिअन जिओ फोन युजर्स भारतात आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रिजने वर्षभरात २०.६ टक्के अर्थात ३६,०७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, विक्रमी ४२,५५३ कोटी रुपयांचा जीएसटीदेखील भरला आहे.
कर्नाटकचे सरकारची शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे.
जेडीएस आणि काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानुसार, प्रत्येक शेतकऱ्याचे २ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र, प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे.
यासोबतच शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत घेण्यात आलेल्या कर्जावरही दिलासा देण्यात आला आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना सरकार २५,००० रुपये देणार आहे.
शेतकऱ्यांना अंशत: दिलासा देतानाच कुमारस्वामी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र वाढवले आहेत.
अर्थ खाते सांभाळणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी २,१३,७३४ कोटींच्या अर्थसंकल्पाची घोषणा केली. त्यात त्यांनी सेवा आणि कृषी क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
साईचे स्पोर्ट्स इंडिया असे नामांतर
स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून, या बदलानुसार साई आता स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल.
त्याचबरोबर खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही भरघोस वाढ केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केली आहे.
साईच्या कार्यपद्धतीतही अनेक बदल करण्यात येणार असून, नव्या स्पोर्ट्स इंडिया संस्थेची कार्यप्रणाली आणि पदे वेगळी असतील.
सध्याची काही पदे रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात येणाऱ्या पदांवर सध्या काही लोक कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्या जागी पुन्हा भरती करण्यात येणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा